Thursday, March 12, 2026

साहित्याचा जागर; लेखिका ज्योत्स्ना देवधर जन्मशताब्दी निमित्त ‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Share

मुंबई : सुप्रसिद्ध मराठी लेखिका ज्योत्स्ना देवधर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या अजरामर साहित्याचे सादरीकरण आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित निवडक गाण्यांचा ‘अक्षर ज्योत’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर), विलेपार्ले (पूर्व) येथील पु. ल. देशपांडे सभागृहात संपन्न होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमात ज्योत्स्ना देवधर यांच्या साहित्याचे अभिवाचन प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री, अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि दिप्ती भागवत करणार आहेत. तसेच, गायक नचिकेत देसाई आणि अर्चना गोरे त्यांच्या आयुष्याशी निगडित निवडक गीते सादर करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा मोडक करणार असून, संहिता विकास परांजपे व दुहिता सोमण यांनी तयार केली आहे. स्वरवंती क्रिएशन्स यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी माहिती दिली की, या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. मराठी साहित्य आणि संस्कृती प्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या साहित्यिक मेजवानीचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख