२०२४ च्या अत्यंत चुरशीच्या लोकसभा निवडणुकीत, विविध एक्झिट पोलनुसार, भारतीय जनता पक्ष (BJP) च्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला लक्षणीय बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. १ जून २०२४ रोजी मतदानाचा अंतिम टप्पा संपल्यानंतर, संपूर्ण देश आतुरतेने अधिकृत निकालांची वाट पाहत आहे. ४ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल अधिकृतपणे जाहीर होतील.
रिपब्लिक टीव्ही-पी मार्क पोलच्या अंदाजानुसार एनडीएला ३१५ ते ३६८ जागा मिळतील, तर काँग्रेस प्रणित इंडी आघाडीला ११८ ते १६१ जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील NDA २०१४ पासून सत्तेत आहे आणि या एक्झिट पोलच्या निकालांवरून असे सूचित होते की ही युती सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येऊ शकते. एक्झिट पोलच्या सर्वेक्षणानुसार भाजपचा चेहरा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी एका टर्मसाठी पुनरागमन करण्याची शक्यता आहे. २०१४ च्या निवडणुकीत NDA ने ३३६ जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीला केवळ ६० जागा मिळाल्या होत्या ज्यात काँगेसला फक्त ४४ जागा होत्या.
२०२४ लिक्सभा निवडणुकांच्या एक्झिट पोलचे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणेकडील केरळ या राज्यात भारतीय जनता पक्षाला २ ते ३ लोकसभा जागांसह २७% मतांचा वाटा मिळवण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे राजकीय दृष्ट्या प्रबळ डाव्या आघाडीला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF ला भाजपने कडवे आव्हान दिले आहे.
महाराष्ट्राच्या एक्झिट पोल आकडेवारीनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) राज्यातील ४८ जागांपैकी ३२-३५ जागा जिंकण्याचा अंदाज आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर २० ते २३ जागा जिंकेल. दुसरीकडे, काँग्रेस पक्ष, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांचा समावेश असलेली इंडी आघाडी १२ ते १५ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस स्वबळावर ६ ते ९ जागा जिंकेल असा अंदाज आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट यानंतर महाराष्ट्रात झालेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान सुमारे सहा आठवडे चालले होते. ज्यामुळे ती १९५१-५२ नंतरची दुसरी सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणूक ठरली. देशातील अनेक भागांमध्ये कडक उन्हाळ्यात पार पडलेल्या सात टप्प्यातील निवडणुकीत सुमारे एक अब्ज लोक मतदानासाठी पात्र ठरले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा अंदाजित विजय ही युतीसाठी महत्त्वपूर्ण यश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा दाखला असेल.