Tuesday, December 3, 2024

दिवसभरात चार स्लॉट; एकावेळी दोनशे लोक प्रदर्शन पाहू शकतील – पालकमंत्री शंभूराज देसाई

Share

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) येथे शिवशस्त्रशौर्यगाथा अंतर्गत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह (WaghNakh) शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. छत्रपती ‍शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श झालेली वाघनखे सातारा नगरीत येणे ही संपूर्ण जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचं पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, हिंदवी स्वराज्यावरील मोठे संकट ज्या वाघनखांच्या माध्यमातून त्यांनी नष्ट केले ती वाघनखे प्रत्यक्ष पाहण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. ही वाघनखे सात महिने सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये राहणार आहेत. याची तिकीटे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. दिवसभरातून चार स्लॉट उपलब्ध आहेत. एकावेळी दोनशे लोक हे प्रदर्शन पाहू शकतील. प्रशासनाने यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. याचा सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.

यावेळी मंत्री देसाई यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करुन छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्याचा मान सातारा जिल्ह्याला दिल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे विशेष आभार मानले.

अन्य लेख

संबंधित लेख