Tuesday, December 3, 2024

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रेचे स्वप्न साकार

Share

आयुष्यात एकदा तरी काशी, अयोध्या, चार धाम, ज्योतिर्लिंग यासारख्या पवित्र तीर्थक्षेत्री जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते, पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, तसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने नंतर आता महाराष्ट्र सरकारनं ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत 60 वर्षांवरील नागरिकांना देशभरातील तब्बल 66 तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे. तर जाणून घेऊया काय आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना.

या योजने मध्ये महाराष्ट्र राज्य आणि भारतातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकदाच लाभ घेता येणार आहे.

तसेच, या योजनेअंतर्गत प्रवास खर्चाची कमाल मर्यादा ही प्रती व्यक्ती तीस हजार रुपये इतकी आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवासाची सोय इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल.

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची पात्रता काय आहे ते बघूया –

  • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांचे वय 60 वर्षे आणि त्यापुढे असले पाहिजे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं.
  • प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगानं ग्रस्त नसावं.

या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार नाही ते जाणून घेऊया –

  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, असे सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. मात्र, 2.50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले कंत्राटी कर्मचारी मात्र या योजनेसाठी पात्र ठरतील.
  • ट्रॅक्टर वगळता ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यानं पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुनं नसावं.

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र

  • लाभार्थ्याचे आधार कार्ड/रेशनकार्ड.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतंही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.)
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असणं अनिवार्य) किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र.

योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा?

पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ही प्रक्रिया विनामूल्य आहे.
ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. अर्जदारानं स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल.

लाभार्थ्यांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात येणार्‍या समितीद्वारे केली जाणार आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांचा जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाणार असून लॉटरीद्वारे (लॉट्सचे संगणकीकृत ड्रॉ) प्रवाशांची निवड केली जाईल. या प्रवासाची व्यवस्था शासनाद्वारे निवडलेल्या अधिकृत टुरिस्ट एजन्सी द्वारे करण्यात येणार आहे.

ह्या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिक घेतील यात काहीच शंका नाही.

अन्य लेख

संबंधित लेख