Friday, March 27, 2026

अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्रीवर कडक बंदी

Share

अक्कलकोट (सोलापूर) : श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या अक्कलकोट नगरीत आता दर गुरुवारी मांस विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड आणि सर्व नगरसेवकांनी मिळून हा महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला असून, अक्कलकोट नगरपरिषद प्रशासनाने याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे.

अक्कलकोट हे केवळ सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर देशातील एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः गुरुवारी स्वामींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि शहराचे धार्मिक पावित्र्य टिकून राहावे, या उद्देशाने गुरुवारी चिकन, मटण आणि मासे विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला शहरातील मांस विक्रेत्यांनीही धार्मिक भावना लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यापूर्वी अक्कलकोटमध्ये वाढत्या मावा व्यसनामुळे अनेक तरुण बरबाद होत होते. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी शहरात ‘मावाबंदी’चा यशस्वी निर्णय घेतला होता. त्यानंतर आता मांस विक्री बंदीचा हा दुसरा मोठा निर्णय अक्कलकोटच्या सामाजिक आणि धार्मिक प्रतिमेला उंचावणारा ठरत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी भक्तांकडून गुरुवारी मांस विक्री बंद करण्याची मागणी केली जात होती. नगरपरिषदेने ही मागणी पूर्ण केल्याने अक्कलकोटकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे अक्कलकोट शहर आता स्वच्छ आणि सात्विक वातावरणासाठी एक आदर्श धार्मिक स्थळ म्हणून पुढे येत आहे.

नगरपरिषदेच्या या निर्णयाची चर्चा आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सुरू असून, इतर धार्मिक स्थळांवरही अशा प्रकारचे नियम लागू करावेत, अशी मागणी काही सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख