कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाभोवती निर्माण झालेल्या वादाला आता एक नवीन आणि चिंताजनक वळण मिळाले आहे. या आंदोलनात ओतला गेलेला पैसा, त्याचे नियोजन आणि कथित परदेशी संबंध यावरून आधीच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच एका नव्या गौप्यस्फोटाने शंकेची नवी पाल चुकचुकू लागली आहे.
अमेरिकेच्या नवी दिल्लीतील दूतावासाने सीजीपीच्या प्रस्तावित मेळाव्याच्या आधीच आपल्या नागरिकांसाठी एक मार्गदर्शक सूचना (Advisory) जारी केली होती. या सल्लागारीमुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून त्याची स्पष्ट उत्तरे शोधून काढणे आवश्यक आहे.
दूतावासाने आपल्या नागरिकांना दिलेल्या सूचनापत्रात, अमेरिकन नागरिकांना दिल्लीतील अशा विशिष्ट भागात जाणे टाळावे, असे नमूद केले आहे. या भागात आंदोलन होण्याची शक्यता आहे, असे दूतावासाने म्हटले होते. हा इशारा हिंसाचार भडकल्यानंतर दिलेला नव्हता.
कोणतेही आंदोलन होण्याआधीच म्हणजे १७ जुलै रोजीच ती सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. तीत गडबड-गोंधळ होण्याची शक्यता असलेली ठिकाणे स्पष्टपणे नमूद होती. त्यामुळे दूतावासाला एवढी अचूक माहिती आधीच कशी मिळाली, असा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो. इतके अचूक अंदाज व्यक्त करण्याची कला अमेरिकी दूतावासाकडे कशी काय आली, असाही प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
भारतातील अमेरिकी दूतावासाच्या वेबसाइटवरही प्रसिद्ध झालेल्या या सूचनेनुसार, ‘२० जुलै रोजी मध्य दिल्लीत, विशेषतः जंतरमंतर, संसद आणि किसान घाट परिसराभोवती मोठ्या प्रमाणात लोक जमण्याची शक्यता आहे. सुरक्षा उपायांमुळे वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो,’ असे स्पष्ट म्हटले होते.
हे आंदोलन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी होईल, असेही या इशारापत्रात नमूद केले आहे. याशिवाय, २१ जुलै रोजी किसान घाटावरही निदर्शने होण्याची अपेक्षा असून २५० राष्ट्रीय शेतकरी संघटनांची आघाडी दिल्लीत दाखल होणार असल्याचे त्यात म्हटले होते. तसेच, या संभाव्य निदर्शने आणि अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला देत आठ मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या.
जगभरातील दूतावास आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी करत असतात. यात विशेष काही नाही. परंतु, जेव्हा एखादी ॲडव्हायझरी राजकीय आंदोलनाची व्याप्ती, मार्ग आणि त्याचा होणारा संभाव्य प्रभाव अचूकतेने आधीच सांगते, तेव्हा साहजिकच बरेच प्रश्न उपस्थित होतात. ही माहिती केवळ जाहीर घोषणांवर आधारित होती, असे वाटत नाही. दूतावासाला भारतीय अधिकाऱ्यांकडून पूर्वसूचना किंवा गुप्त माहिती मिळाली होती? की त्यांच्याकडे इतर काही माहितीचे मार्ग होते?
या ॲडव्हायझरीच्या वेळेमुळे एका नव्या मोठ्या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. हे आंदोलन उत्स्फूर्त नाही, असे आधीपासूनच म्हटले जात होते. या आंदोलनामागचे राजकीय खेळ दिसतच होते. तसेच, या आंदोलनाच्या मागे अनेक परकीय शक्ती तसेच परदेशी पैसा असल्याचेही म्हटले जात होते. अनेक शक्ती या आंदोलनाच्या मागे आहेत. तसा पाठिंबाही अनेक व्यासपीठांवर व्यक्त होत आहे. या साऱ्याचा आणि दूतावासाने काढलेल्या निवेदनाचा नेमका संबंध काय, हे स्पष्ट व्हायला हवे आहे.
सीजीपी आंदोलनातला हा दुसरा ‘अमेरिकन संबंध’ आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके २०२२ मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते. त्यांनी बोस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्स (जनसंपर्क) मध्ये मास्टर पदवी घेतली. तिथे त्यांच्या अभ्यासाचा मुख्य भर डिजिटल कम्युनिकेशन आणि जनमतावर होता. अमेरिकेत जाण्यापूर्वी दीपके यांनी आम आदमी पार्टी (AAP) सोबत काम केले होते. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील त्यांनी सोशल मीडियात काम केले. त्यांनी स्वतःच हे सांगितले आहे.
जून २०२६ मध्ये, ते सीजीपीच्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेतून भारतात आले. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांचा ‘आप’शी कोणताही घटनात्मक किंवा व्यावसायिक संबंध राहिला नव्हता, असे ते म्हणतात. मात्र, ते चार वर्षे अमेरिकेत होते. आणि तिथून अचानक भारतात अवतरले आहेत.
दीपके यांच्याप्रमाणे, सोनम वांगचुक यांनाही अनेक वादांना सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या परदेशी संबंधांबद्दल सार्वजनिक व्यासपीठांवर वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. त्यांच्या शैक्षणिक उपक्रमावरही आक्षेप घेतले गेले. त्यांच्या संस्थेला आवश्यक सरकारी मान्यता नाही आणि त्यांनी दिलेली प्रमाणपत्रे औपचारिक शिक्षणासाठी वैध नाहीत. यूपीए आणि एनडीए या दोन्ही सरकारांच्या काळात त्यांच्या संस्थेला ‘फॉरेन कंट्रीब्यूशन (रेग्युलेशन) ॲक्ट’ (FCRA) च्या उल्लंघनाच्या नोटिसा मिळाल्या आहेत.
या साऱ्या इतिहासाकडे पाहिले तर अमेरिकेच्या दूतावासाने आधीच जाहीर केलेल्या सूचनांच्या मागे बरेच काही लपलेले असावे, असे दिसते. या साऱ्याचा तपशिलात जाऊन शोध घेतला तर भारतविरोधी कारवाया कुठे आणि कशा चालतात, यावर बराच प्रकाश पडू शकेल…