Friday, September 13, 2024

अयोध्येतील अनुभवकथनाची कथा

Share

अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्यातील अनुभव पुण्यातील स्थापत्य अभियंता अश्विनी कवीश्वर यांनी गेल्या सहा भागांमध्ये सांगितले. हे अनुभव त्या लोकांना सांगतात, त्याबद्दल त्या म्हणतात, राममंदिर निर्माण कार्यामधील सुंदर अनुभव सांगता सांगता मला श्रोत्यांच्या मधला ‘राम’ अनुभवायला मिळाला आणि श्रोत्यांना अयोध्येत असल्याची अनुभूती मिळाली.

II श्रीराम II

१९९० सालच्या कारसेवेमध्ये भाग घेतल्यापासून मी अनेक कारसेवकांशी बोललो, भेटलो, कार्यकर्त्यांशी संवाद केला, राममंदिर कधी आणि कसे बनणार ह्या विषयी चर्चा केल्या…, परंतु राममंदिर निर्माण कार्यामध्ये भाग घेतलेल्या कुणाला आतापर्यंत भेटलो नाही आणि म्हणून तुम्हाला आवर्जून भेटायला आलो…

एका जेष्ठ कारसेवकांच्या बरोबर झालेल्या भेटीचे हे प्रास्ताविक आणि त्या नंतर त्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मी केलेले अनुभवकथन… अशा पद्धतीने सुरु झालेली अनुभवकथनाची ही कथा… !!

त्या नंतर एकातून एक ठरत गेलेले अनेक कार्यक्रम माझे अनुभव विश्व आणखी समृद्ध करून गेले.

आपल्याला आलेले आनंददायी अनुभव अनेकांना सांगितले की ते द्विगुणित होतात, हा अनुभव मला येत गेला. ही श्रीरामांची कृपा आणि ते ऐकताना सगळेच राममय होतात ही पण त्यांचीच कृपा !!

अनुभव ऐकत असताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वहात असतात. ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ बोलले तरी अजून काही अनुभव सांग नां… असा प्रेमळ आग्रह होतो.

माझे अनुभव कथन झाले की, कित्येक जण नंतर भरभरून व्यक्त होतात, अनुभव ऐकताना कितीतरी वेळा अंगावर रोमांच उभे राहिले, असे सांगतात, तर काही जण अक्षरशः निशब्ध होऊन, भरल्या डोळ्याने फक्त हात हातात धरून उभे राहतात आणि शब्दांच्या मर्यादा ओलांडत काहीच न बोललेलं… थेट अंतरात्म्यापाशी नेऊन पोचवतात…

अयोध्येला इतक्या वेळा जाऊन आले म्हणून, ह्या कार्यात सहभागी होता आले म्हणून भावुक होऊन नमस्कार करतात आणि त्याच वेळेला मला लाखमोलाचे आशीर्वादही देतात.

“मंदिर किती सुंदर आणि भव्य होते आहे हे तर दिसतेच आहे. परंतु त्या निर्माण कार्याच्या पाठीमागची निर्णयप्रक्रिया, त्यातली भावना आणि त्याच बरोबर निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे, कामगारांचे, कारागिरांचे समर्पित भाव समजल्यानंतर हे मंदिर अजूनच जास्त भावले” असे अगदी मनापासून सांगणारे श्रोते भेटतात.

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे I
मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे II

अशा ह्या देखण्या हातांना आणि त्यांच्या कडून घडलेल्या निर्मितीला श्रोते पुनः पुन्हा वंदन करतात .

हे सगळे ऐकताना मंदिरात बसलो आहोत असे जाणवले आणि नकळत आमच्या पायातून चपला काढल्या गेल्या असेही काहीजण सांगतात, तर काहींना ह्या जागेवर जणू काही होम किंवा यज्ञ झाला असून त्यामुळे वास्तु पवित्र झाली आहे असे वाटू लागते.

काहींना श्रीरामांवर काव्य स्फुरते तर काहींनी ह्या अनुभव कथनावरच काव्य रचले.

तू सांगितलेले अनुभव ही आमच्यासाठी अनुभूतीच होती आणि आम्ही सर्वच आता राममय झालो आहोत, अशा अतिशय भावूक प्रतिक्रिया “याचसाठी केला होता अट्टाहास…” ह्याची पोचपावती देऊन जातात.

काहींना मंदिर निर्माणकार्यातल्या दगड, माती आणि विटांमधला ‘राम’ जाणवला तर काहींना तिथल्या कार्यरत असलेल्या माणसांच्या मधला ‘रामभक्त’ भावला.

अनेक श्रोते हे अनुभव ऐकता ऐकता राम भेटीची अनुभूती कशी मिळाली आणि आम्ही पण प्रत्यक्ष अयोध्येमध्येच आहोत असे वाटले असे आवर्जून सांगतात, तर काही श्रोते कार्यक्रम संपून २ दिवस झाले तरी आम्ही तितकेच मंत्रमुग्ध आहोत असे निरोप पण मोबाइलवर, पत्राद्वारे आवर्जून पाठवतात.

काही जण अत्यंत प्रांजळपणे कबूल करतात की “मला हे मंदिर होतंय ही चांगली गोष्ट आहे, इथपर्यंत माहिती होतं. परंतु आता मात्र अयोध्येत जायची ओढ लागली आहे.” अनेकांनी हेही सांगितलं की संपूर्ण वेळ मला एका वेगळ्या भाव विश्वामध्ये असल्याचे जाणवले, अंगावर रोमांच होते, डोळ्यात पाणी होते आणि अशी भावना मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवली !!

अनुभव कथन ऐकल्यानंतर अयोध्येत जाऊन आलेल्या प्रत्येकाने तिथून आवर्जून फोन केले आणि तुम्ही सांगितलेला प्रत्येक अन् प्रत्येक शब्द आम्हाला इथे आठवतो आहे, जिवंत वाटतो आहे असे आवर्जून सांगितले.

राममंदिर निर्माण कार्यामध्ये अनुभवलेले सुंदर अनुभव सांगता सांगता मला श्रोत्यांच्या मधला ‘राम’ अनुभवायला मिळाला आणि श्रोत्यांना अयोध्येत असल्याची अनुभूती मिळाली. रामरायाची महती अजून ती काय वर्णावी !!

ही सर्व आणि सर्व केवळ रामरायाची कृपा एवढेच पुन्हा पुन्हा मनात येते आणि मग पुन्हा त्याच्याच चरणी नतमस्तक होते… !!

अश्विनी कवीश्वर
१७-०४-२०२४
रामनवमी
(लेखिका स्थापत्य अभियंता असून वरिष्ठ उप महाव्यवस्थापक या पदावर त्या काम करतात.)

अन्य लेख

संबंधित लेख