Thursday, May 16, 2024

वारसा जतनाचे महत्त्वपूर्ण कार्य

Share

आपल्या देशाचा, संस्कृतीचा, समाजाचा वारसा टिकून रहावा, त्याची ओळख जगाला व्हावी, त्याचे जतन व्हावे, हा वारसा सांगणाऱ्या ज्या वस्तू परदेशात गेल्या त्या परत मिळवून त्यांची सन्मानाने पुनर्स्थापना या दृष्टीने भारतात गेल्या दहा वर्षात लक्षणीय काम झाले आहे. १८ एप्रिल हा दिवस ‘जागतिक ऐतिहासिक स्थाने आणि स्थळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने.

ऐतिहासिक स्थाने आणि वास्तू कोणताही देश, धर्म, समाज, संस्कृती आणि स्थानिक भाषेचा जिवंत पुरावा असतात. या ऐतिहासिक इमारती, ज्या काळात निर्माण केल्या गेल्या त्या काळातील जीवनपद्धती, मूल्ये यांविषयी आपल्याला मोलाची ऐतिहासिक माहिती केवळ स्वतःच्या अस्तित्वातूनच पुरवतात. अनादी काळापासून मनुष्यप्राणी आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपल्या अस्तित्वाची झलक म्हणून किंवा मार्गदर्शन म्हणून विविध प्रकारे आपली छाप सोडत आला आहे. पृथ्वीवरील विविध मानवी समुहांच्या इतिहासातील या घटकाचे मोल लक्षात घेवून १९८३ साली संयुक्त राष्ट्रांची या विषयात काम करणारी संस्था, युनेस्कोच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार १८ एप्रिल हा दिवस ‘जागतिक ऐतिहासिक स्थाने आणि स्थळ दिवस’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

Konark Sun Temple
Konark Sun Temple

युनेस्कोने जगभरातील विविध स्थानांचा अभ्यास करून अनेक ऐतिहासिक स्थाने आपल्या यादीत समाविष्ट करून घेतली आहेत. जानेवारी २४च्या आकडेवारीनुसार जगभरात १६८ देशांतील एकूण ११९९ जागतिक वारसा स्थाने आतापर्यंत या यादीमध्ये आलेली आहेत. त्यापैकी ९३३ सांस्कृतिक, २२७ नैसर्गिक तर ३९ मिश्र स्थळे आहेत. भारतात युनेस्कोच्या यादीतील ४२ स्थळे आहेत.

या ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व केवळ भूतकाळ आणि वर्तमानापुरतेच सीमित नसते. भविष्यातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचे, मार्गदर्शन करण्याचे काम या या निर्जीव जागा करीत असतात. त्यामुळे त्यांचे जतन करणे, गरजेनुसार त्यांचे पुनरुज्जीवन करणे, अतिक्रमण हटवणे, विद्रुपीकरण थांबवणे, या स्थळांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे इत्यादी अत्यंत महत्त्वाचे कार्य १६ नोव्हेंबर १९४५ या दिवशी इंग्लंडमध्ये स्थापन झालेली युनेस्को ही संस्था अविरतपणे करत आहे.

Kaziranga National Park, Assam
Kaziranga National Park, Assam

भारतीय ठेव्याची अतोनात तोडफोड
गेल्या हजार वर्षात अमूल्य आणि अस्सल अशा भारतीय ठेव्याची अतोनात तोडफोड मुघल आतंकवादी, लुटारुंकडून केली गेली. शेकडो मंदिरे लुटली गेली, फोडून टाकली गेली. मंदिरातील आराध्यदेव खंडित केले गेले. अशी शेकडो खंडित मंदिरे आपल्याला भारतभर पहावयास मिळतात. अर्थात आता नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही देवळे पुनर्स्थापित करता येतील का यावर चिंतन, प्रयोग सुरू झाले आहेत.

कलाकृती चोरून परदेशात
पुढे ब्रिटिश काळात, भारताच्या अनेक मंदिरांतून आणि पुरातन स्थळांतून मौल्यवान मूर्ती आणि कलाकृती चोरून युरोपात नेल्या गेल्या. या कलाकृतींमध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांच्या देवतांच्या मूर्ती समाविष्ट आहेत, ज्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अनेक मूर्ती ब्रिटीश अधिकाऱ्यांनी वैयक्तिक संग्रहासाठी किंवा म्युझियमसाठी इंग्लंडला नेल्या. उदाहरणार्थ, तमिळनाडूच्या चोल राजवंशाच्या काळातील ब्राँझची नटराज मूर्ती. ब्रिटीशकाळात या मूर्तींची चोरी अतिशय नियोजित आणि सुसंघटित प्रकारे केली जात असे. यात ब्रिटीश अधिकारी स्थानिक साहाय्यकांच्या मदतीने या चोऱ्या करत. त्यामुळे ब्रिटिश राजवटीच्या काळात युरोपात या मूर्ती आणि इतर कलाकृती विविध ठिकाणी लिलावांमध्ये उच्च किमतीला विकल्या गेल्या.

सरकारच्या प्रयत्नांना यश
भारतीय कलेची साक्ष देणाऱ्या या वस्तू आता जगभरातील संग्रहाललेय, खासगी संग्रहालये आणि विद्यापीठांमध्ये दिसून येतात. त्याचे कारण हेच. केवळ ब्रिटीश म्युझियममध्येच अशा २००० मूर्ती बघायला मिळतात. यावरून जगभरातील ही संख्या किती मोठी असेल याची कल्पना आपण करू शकतो. आता भारत सरकार या मूर्तीं परत मिळवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना काही प्रमाणात यश देखील मिळत आहे. परंतु अशा प्रकारच्या मूर्तींना परत स्वदेशी आणण्याची प्रक्रिया आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीमुळे अतिशय जटिल आणि किचकट आहे. विविध देशांच्या सरकारांची सहमती आणि सहकार्याशिवाय हे घडू शकत नाही. या प्रक्रियेमध्ये अनेक वर्षे लागू शकतात आणि त्यात विविध आव्हाने आणि कायदेशीर अडचणी समाविष्ट असतात. तरीही भारत सरकारने प्रयत्नपूर्वक गेल्या काही वर्षांत ३२४ कलाकृती परत मिळवल्या आहेत.

Artifacts in British Museum
Artifacts in British Museum

इतकी आक्रमणे झाली, हिंदू समाजाचे, भारत या राष्ट्रपुरुषाचे दमन करण्याचे आत्यंतिक प्रयत्न हजार वर्षे सतत होत राहिले. परंतु भारतीय, हिंदू समाजाने आपली अस्मिता, आपला धर्म, संस्कृती, आपले तत्वज्ञान मातीमोल होऊ दिले नाही. अनादी काळापासून चालत आलेल्या या समाजाची ही जीवनविषयक अनुभूतीच आपला, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी प्राणपणाने राखून ठेवलेली वारसा आहे. मूर्ती, वास्तू, पुस्तके इत्यादी तर मूर्त स्वरूपात आहेत. त्यांची कदाचित जगाच्या बाजारात किंमतही काढली जाईल. पण खरा भारतीय वारसा इथल्या मातीतल्या श्रद्धा, विश्वास, जीवनपद्धती, मूल्ये, भाषा, संकल्पना, तत्वज्ञान अश्या अमूल्य गोष्टींच्या अमूर्त स्वरूपात प्रत्येक भारतीयाच्या अंतरात्म्यात वसलेला आहे. हा ठेवा कोणी चोरू शकत नाही, उद्ध्वस्त करू शकत नाही किंवा त्याची किंमत सांगू शकत नाही.

आपल्याला वारसा हक्काने मिळालेल्या या ‘विरासतीची खऱ्या अर्थाने किंमत ओळखली तरच विकासाचा मार्ग’ दिसू शकतो. गेल्या दहा वर्षांत हा अनुभव भारतीयांनीच नाही तर सगळ्या जगाने भारताच्या रूपात घेतला आहे.

अमिता आपटे
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आणि आंतरराष्ट्रीय तसेच ईशान्य भारतातील प्रश्नांच्या अभ्यासक आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख