Monday, June 24, 2024

मोदी यांची दहा वर्ष: आत्मविस्मृतीकडून आत्मभानाकडे आणि आत्मतुच्छतेकडून आत्मगौरवाकडे

Share

नरेंद्र मोदी सरकार येण्यापूर्वी देशभक्ती हा जणू काही अपराध मानला जात होता. मोदी यांनी या मानसिकतेमधून देशाला बाहेर काढले. मोदी यांचा दहा वर्षांचा कार्यकाल म्हणजे आत्मविस्मृतीकडून आत्मभानाकडील प्रवास. मोदी यांनी देशाला आत्मतुच्छतेच्या विळख्यातून मुक्त केले आणि आत्मगौरवाकडे नेले. मोदी यांचे हेच सर्वात मोठे यश मानावे लागेल.

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळास दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ त्यांनी २६ मे २०१४ या दिवशी घेतली. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे परीक्षण होणे अत्यंत सहाजिक आहे. निरोगी लोकशाहीमधे अशा चर्चा होणे आवश्यक असते. मोदींच्या यशापयाशाचे अनेक मुद्दे मांडले जातील. मोदी समर्थक आणि मोदी विरोधक हिरीरीने आपली बाजू मांडतील. त्या निमित्त अनेक दाखले दिले जातील आणि त्याचा मुख्य रोख व्यक्तिशः मोदींकडेच राहील. परंतु, प्रश्न साधा आहे. दहा वर्षांच्या काळात मोदींनी देशाला काय दिले?

या प्रश्नाच्या उत्तरादाखल पुन्हा एकदा अनेक योजना, धोरणे, प्रगती, वगैरे माहितीचा पाऊस पाडण्यात येईल. परंतु, भौतिक प्रगती पलिकडे जाऊन मोदी यांच्या कार्याचे परीक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तिशः विचार केला तर मोदी हे भारतातील सर्वात यशस्वी राजकारणी मानावे लागतील. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोदी यांनी स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित केले. गेली दोन दशकाहून अधिक काल मोदी यांच्या राजकीय प्रगतीचा आलेख चढता राहिला आहे. परंतु, अशा प्रकारचे विश्लेषण मोदी यांनासुद्धा आवडणार नाही.

मोदी यांच्या कार्यकाळातील प्रगतीचे अनेक भौतिक दाखले देशभर बघायला मिळतात. अगदी चंद्रावर सुद्धा भारतमातेचा झेंडा साऱ्या देशाने बघितला. या सर्वांचे महत्त्व निर्विवाद आहे. परंतु हे थक्क करणारे आणि अनपेक्षित बदल कशामुळे झाले, हा खरा कळीचा प्रश्न आहे.

मोदी यांचे सर्वात मोठे यश म्हणजे त्यांनी साऱ्या देशाची मानसिकता बदलली. देशाची बदललेली मानसिकताच मोदी यांच्या यशाचे खरे रहस्य आहे. मोदी यांच्या काळात भारतीयांच्या आत्मसन्मानाची पुनःस्थापना झाली. देश पराभूत मानसिकतेमधून बाहेर पडून आत्मगौरवाकडे वाटचाल करू लागला. निराशा आणि हतबलतेची जागा उत्साह आणि चैतन्याने घेतली. वैफल्य पळून गेले आणि जनमनात प्रबळ आशा निर्माण झाली.

देशाच्या मानसिकतेमधे झालेला हा बदल अत्यंत निर्णायक आहे. पराभूत, आत्मविस्मृत आणि वैफल्यग्रस्त असलेली कोणतीही व्यक्ती अथवा देश कधीही प्रगती करू शकत नाही. मोदी यांनी नेमका हाच चमत्कार करून दाखविला. २०१४ पूर्वीची देशाची मानसिकता आठवून बघितली तर मोदी यांनी देशाच्या मानसिकतेमधे केलेला बदल क्रांतिकारकच आहे. या बाबत, मोदी विरोधकांकडे फारसे लक्ष देण्याचे कारण नाही. त्यांचा `political agenda’ वेगळा आहे. या अजेंड्याच्या अंमलबाजावणीमधे मोदी एका कणखर पहाडासारखे उभे आहेत. मोदी यांना मिळणारा पाठिंबा त्यांना तर आहेच परंतु त्यांनी घेतलेल्या वैचारिक कार्यक्रमाला सुद्धा आहे. परिणामी, मोदीविरोधकांचा दीर्घकालीन कार्यक्रम जणू काही उधळून गेला आहे.

मोदी यांनी देशाची मानसिकता बदलली म्हणजे नेमके काय केले? १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मर्यादित होते. पहिली बाब म्हणजे, या स्वातंत्र्यामुळे भारताचे विभाजन अथवा फाळणी झाली होती. दुसरी बाब अशी की, हे स्वातंत्र्य फक्त ब्रिटीश राजवटीपासून मिळाले होते. ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी भारताचा मुस्लिम टोळ्यांशी आणि घुसखोरांशी संघर्ष चालू होता. या संघर्षाची परिणती म्हणून देशाची फाळणी झाली. भारताच्या दृष्टीने ही अत्यंत मोठी जखम होती आणि आहे. पाकिस्तानची निर्मिती झाली तरी भारताचा मुस्लिम राजवटीने निर्माण केलेल्या संस्कृती आणि मानसिकतेशी संघर्ष चालूच होता.

ब्रिटीश राजवटीने निर्माण केलेली मानसिक गुलामी आजसुद्धा आपण अनुभवत असतो. हा प्रभाव इतका खोलवर आहे की, सारे भारतीय आत्मविस्मृत झाले होते. ही आत्मविस्मृती इतकी गंभीर आहे की भारतीय समाज स्वतःला क्षुद्र समजत होता. भारतच भारताला तुच्छ मानत होता. यालाच दुसऱ्या शब्दांत ‘colonial mind set’ किंवा वसाहतवादी मानसिकता म्हटले जाते. वसाहतवादी दृष्टिकोण म्हणजे प्रतिष्ठा आणि बुद्धिमानतेचे लक्षण मानले गेले.

मोदी हे रा. स्व. संघाचे प्रचारक होते. त्यामुळे या विषयाबाबत त्यांचे विचार सर्वज्ञात आहेत. मोदी यांनी या वसाहतवादी मानसिकतेलाच सुरुंग लावला. तथाकथित बुद्धिमानाना (ज्यांचा उल्लेख ‘खान मार्केट गॅंग’ असा केला जातो) असे निर्णय भलतेच झोंबले. त्यांनी खूप आकांडतांडव केले. मात्र मोदी यांनी त्यांना बिलकूल भीक घातली नाही.

एक उदाहरण बघू. १९५० च्या प्रथम प्रजासत्ताक दिनापासून संचलन केले जाते. या संचलनाची समाप्ती म्हणून एक समारंभ केला जातो. या सोहळ्याला ‘Beating Retreat’ असे म्हटले जाते. या कार्यक्रमात ‘Abide With Me’ अशी एक धून वाजविली जायची. ही धून एक भजन म्हणून मानली जाते. हे भजन फ्रान्सीस लाइट नावाच्या एका धर्मगुरुने लिहिले आहे. हे भजन ख्रिश्चन समाजात लोकप्रिय असल्याचे सांगितले जाते. प्रश्न असा आहे की, या भजनाचा भारतीयांशी काय संबंध होता किंवा आहे? किती भारतीयांना हे भजन माहीत आहे? हे भजन लिहिणारा फ्रान्सिस लाइट भारतीयांना माहीत आहे का? या भजनाचा भारतीय माती किंवा संस्कृतीशी काय संबंध आहे? भारतीय भावविश्वात या भजनाचे स्थान काय आहे? सात दशकांपासून ही धून आंधळेपणाने वाजविली जात होती. किंबहुना, इंग्लंडचे अंधानुकरण करण्याच्याच नादात त्याचा समावेश केला होता. वसाहतवादी मानसिकतेचा हा एक अस्सल नमुना होता. मोदी सरकारने दोन वर्षांपूर्वी हे भजन थांबविले. त्याची जागा सर्व भारतीयांच्या अंगावर रोमांच उभे करणाऱ्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या अजरामर गीताने घेतली. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर खान मार्केट गॅंगमधील बुद्धिवादी जणू काही चवताळून उठले. त्यांचा आवेश असा होता की, मोदी सरकारने जणू काही राष्ट्रगीतच बदललेले आहे. मोदी सरकारने त्याकडे बिलकुल बघितले नाही आणि निर्णय कायम ठेवला. हा दाखला कदाचित किरकोळ वाटू शकतो. परंतु, मोदी सरकारची घट्ट वैचारिक बांधिलकी यामधून दिसून येते. मोदी सरकारने वसाहतवादाची अशी अनेक स्मारके गाडून टाकली. भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्जची निशाणी आपण वर्षानुवर्षे का वागवत होतो? म्हणूनच दिल्लीतील रेसकोर्स रोडचे नामकरण लोककल्याण मार्ग असे करण्यात आले. वसाहतवादाची ही सारी निशाणी संपवून टाकण्याचा विडा मोदी यांनी जणू काही उचलला आहे. ही सारी निशाणी भारतीय जनतेच्या मनावर नकारात्मक परिणाम घडवित असे. ही निशाणी आमचा आत्मविश्वास खच्ची करीत होती. त्याचा आमच्या प्रेरणा आणि कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम झाला होता आणि अवघा देश हतबल अवस्थेत पोचला होता. वसाहतवादाची चिन्हे पुसण्याचे असे अनेक निर्णय मोदी सरकारने घेतले. वर्षानुवर्षे केंद्रीय अर्थसंकल्प संध्याकाळी सादर केला जात असे. काय कारण होते? भारतातील संध्याकाळी लंडनमधे सकाळ होते. स्वातंत्र्यानंतर हीच प्रथा चालू ठेवणे मानसिक गुलामगिरीचे गंभीर लक्षण होते. मोदी यांनी त्याला फाटा दिला आणि मानसिक स्वातंत्र्याचा धडा घालून दिला.

१९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य केवळ राजकीय स्वरूपाचे होते. ते सर्वांगीण नव्हते. १९४७ नंतर सर्वांगीण स्वातंत्र्यावर विचार होणे अपेक्षित होते. परंतु युरोपीयन विचारांनी भारलेल्या काॅंग्रेस नेतृत्वाला याचे गांभीर्यच समजले नाही. किंबहुना काॅंग्रेसने या परकीय कल्पना भारतावर लादल्या. हा सारा प्रकार गोल वर्तुळात चौकोनी खुंटी बसविण्याचा होता आणि त्याची फार मोठी किंमत देशाला मोजावी लागली.

ब्रिटीश राजवटीबरोबरच मुस्लिम आक्रमकांमुळे निर्माण झालेले प्रश्न होते. ब्रिटीश राजवटीचे परिणाम प्रामुख्याने बौद्धिक आणि मानसिक स्वरूपाचे होते. या उलट मुस्लिम राजवटीने केलेले अनन्वित अत्याचार आणि धर्मांतर यामुळे झालेल्या जखमा हिंदू समाज शतकानुशकते बाळगत होता. हिंदू समाजावर केलेल्या अत्याचारबद्दल मुस्लिम समाजाला कधीही अपराधी वाटले नाही. किंबहुना सत्ता गेली तरी आजही हा समाज सत्ताधारी असल्याच्याच मनोभूमिकेत आहे. आजही मुस्लिम समाज ‘We are born to rule India’ या उर्मट, अहंकारी आणि दादागिरीच्याच भूमिकेत आहे. भारतातील अतिरेकी कारवाया, काश्मीरचा प्रश्न, देशांतर्गत दंगली आणि सामाजिक तणाव वगैरे अनेक प्रश्नांच्या मुळाशी मुस्लिम समाजाची मानसिकताच आहे. दुर्दैवाने, काॅंग्रेसच्या मुस्लिम अनुययाच्या धोरणामुळे हिंदू समाजावर घोर अन्याय होत होता. भाजपचा २०१४ सालचा विजय एका अर्थाने हिंदू समाजाचा विस्फोट होता. हिंदू समाजाने आपली तीव्र भावना २०१४ मधे प्रकट केली होती.

मोदी यांनी या भावनेचा आदर करीत अनेक निर्णय घेतले. त्यामध्ये कलम ३७०, तिहेरी तलाक, अयोध्येत श्रीराम मंदिर, समान नागरी कायदा, हिंदू धर्मस्थळांची सुधारणा, पाकपुरस्कृत अतिरेकी कारवायांवर निर्बंध आणि surgical strike वगैरे अनेक निर्णयांचा समावेश होता. मोदी यांनी मुस्लिम अनुययाच्या धोरणाला पूर्ण फाटा देऊन केवळ राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून गेली दहा वर्षे राज्य केले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच हिंदू समाजाला `आपले सरकार’ आल्याचे अनुभूती आली. मोदी यांच्या अनेक निर्णयांकडे मोदी विरोधक मुस्लिम विरोधाच्या भूमिकेतून बघतात. वास्तवात तो आत्मसन्मान जागृत करण्याचा प्रयत्न आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे या प्रवासाचा कळसाध्याय होता. अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे खरे तर दुसऱ्या स्वातंत्र्याची पहाट आहे. अयोध्या राम मंदिराला ब्रिटिशांच्या बौद्धिक गुलामगिरीने आणि मुस्लिमांच्या दादागिरीने विरोध केला होता. परंतु या कशाचीही पर्वा न करता मोदी यांनी राम मंदिर उभारणीतील सर्व अडथळे दूर केले आणि भारताचा एका नव्या युगात प्रवेश झाला.

या साऱ्या वाटचालीमुळे देशवासीयांच्या मानसिकतेमधे कमालीचा आणि अविश्वसनीय बदल झाला. रस्ते, उड्डाणपूल, विकास, कल्याणकारी योजना, लष्कर, रेल्वे, इस्रो आणि विमाने यामधील बदल आज दृश्य स्वरूपात दिसतात. हे दृश्य बदल बदललेल्या भारतीय मानसिकतेचे प्रकटीकरण आहे. त्याकडे केवळ भौतिक दृष्टिकोनातून बघणे म्हणजे आत्मवंचना ठरेल. मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारतात एक नवीन ऊर्जा आणि चैतन्य निर्माण झाले.

या चैतन्य आणि उर्जेचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजे भारताने चंद्रावर केलेली स्वारी. या बदललेल्या मानसिकतेमुळेच भारताने कोविडसारख्या गंभीर महामारीला यशवी तोंड दिले. मोदी यांच्या थाळी वाजविण्याच्या आवाहनाची टिंगल केली जाते. तथापि, या एका सामूहिक कृतीमुळे सारा देश गंभीर संकटाला सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या सज्ज झाला. अन्य देशात न दिसलेले एकीचे अभूतपूर्व दर्शन भारतात झाले.

मोदी सरकार येण्यापूर्वी देशभक्ती हा जणू काही अपराध मानला जात होता. मोदी यांनी या मानसिकतेमधून देशाला बाहेर काढले. मोदी यांचा कार्यकाल म्हणजे आत्मविस्मृतीकडून आत्मभानाकडील प्रवास. मोदी यांनी देशाला आत्मतुच्छतेच्या विळख्यातून मुक्त केले आणि आत्मगौरवाकडे नेले. मोदी यांचे हेच सर्वात मोठे यश मानावे लागेल.

सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख