Saturday, March 21, 2026

“माऊलींचे विचार आत्मशांतीसाठी आवश्यक”; सोलापूरमध्ये ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ सोहळ्याचा दिमाखदार प्रारंभ

Share

सोलापूर : “संत ज्ञानेश्वर माऊली हे जगातील सर्वात कमी वयाचे आध्यात्मिक बालसाहित्यिक आहेत. त्यांचे साहित्य मानवी मनाला शांती आणि समाधान देणारे असून, आजच्या धावपळीच्या जीवनात आत्मशांती मिळवण्यासाठी माऊलींचे विचार अत्यंत आवश्यक आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापूरमधील सरस्वती विद्यामंदिर येथे ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ या विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून या सोहळ्याचे उद्घाटन झाले.

यावेळी बोलताना मंत्री शेलार म्हणाले की, “मानवता हा एकच धर्म आहे, हे जगाला पटवून देण्यासाठी माऊलींनी अतिशय सोप्या भाषेत ज्ञानेश्वरीचे लेखन केले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत माऊलींचे हे वैश्विक विचार जगभरातील विविध देशांत पोहोचविण्याचे कार्य केले जाईल.” आमदार सुभाष देशमुख यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, ‘पसायदान’ आणि माऊलींच्या अभंगांमधील नवसंजीवनी देणारी ताकद भारताबाहेरही पोहोचवणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. यामध्ये बार्शी, उत्तर सोलापूर आणि धाराशिव येथील भजनी मंडळांचा समावेश होता. मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते या अनुदानाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

गायक गणेश शिंदे आणि संमती शिंदे यांनी आपल्या बहारदार गायनाने हा सोहळा मंत्रमुग्ध केला. कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, मोहन डोंगरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शहाजी पवार, शाळेचे संचालक प्रशांत बडवे, देवसर तसेच अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने सोलापूरकर रसिक उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख