मुंबई : मुंबईतील ग्रंथप्रेमी आणि साहित्य रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहर जिल्ह्याचा ‘जिल्हा ग्रंथोत्सव’ येत्या २७ व २८ मार्च २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील ऐतिहासिक मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि वाचनविषयक उपक्रमांनी हा दोन दिवसीय सोहळा संपन्न होणार आहे.
ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी, २७ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या भव्य ग्रंथदिंडीने उत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत अधिकृत उद्घाटन सोहळा पार पडेल. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शब्दांचे देणे’ हा विशेष कार्यक्रम आणि ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत वाचकांना त्यांच्या आवडत्या लेखकांशी संवाद साधता येईल.
२८ मार्च रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. याच सत्रात ‘वाचनयात्रा आनंदयात्रा’ या विषयावर तज्ज्ञांचा परिसंवाद आणि वाचक गौरव सोहळा पार पडेल. दुपारच्या सत्रात ‘कथामंजिरी’ या कार्यक्रमातून नामवंत लेखकांच्या कथांचे अभिवाचन आणि सादरीकरण केले जाईल.
या दोन दिवसांत शासकीय प्रकाशनांसह विविध खासगी प्रकाशक आणि विक्रेत्यांचे स्टॉल्स उपलब्ध असतील. यामध्ये सर्व वयोगटांसाठी विविध विषयांवरील पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील. महोत्सवाच्या समारोप सत्रात जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकारी आणि सेवकांचा गौरव करण्यात येणार आहे.
“मुंबईतील नागरिक, विद्यार्थी आणि ग्रंथप्रेमींनी या ग्रंथोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन वाचन संस्कृतीचा हा उत्सव साजरा करावा,” असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड यांनी केले आहे.