Tuesday, August 18, 2026

ट्रम्प यांची भारताच्या निवडणूक प्रणालीला पसंती; ‘सेव्ह अमेरिका कायदा’ मंजूर करण्याची मागणी

Share

भारताची निवडणूक प्रक्रिया ही जगातील सर्वांत मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया मानली जाते. याच कारणांमुळे ती ट्रम्प यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांना आकर्षक वाटते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या मतदार ओळखपत्र प्रणालीचा दाखला देत, अमेरिकेतही सक्तीचे छायाचित्र ओळखपत्र (फोटो आयडी) लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या समाजमाध्यमावर याबाबत एक पोस्ट केली आहे.

ट्रम्प काय म्हटले आहे?

“भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आमच्या प्रशासनाला विचारले होते की, वैध फोटो आयडीशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा होऊ शकतात? भारताच्या मागील निवडणुकीत ६४ कोटी ६० लाखपेक्षा अधिक मतदारांनी मतदान केले! त्यापैकी एक टक्क्यांहूनही कमी मतदारांनी टपालाद्वारे (मेल-इन) मतदान केले आणि प्रत्येक मतदाराकडे वैध फोटो ओळखपत्र असणे बंधनकारक होते. आम्ही आता ‘सेव्ह अमेरिका कायदा’ मंजूर करायलाच हवा.”

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकी प्रशासनाशी झालेल्या चर्चेदरम्यान हा प्रश्न उपस्थित केला होता, असे ट्रम्प यांनी नमूद केले. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनीही ट्रम्प यांच्या भूमिकेला पाठिंबा देत, भारताच्या मोठ्या प्रमाणातील आणि सुव्यवस्थित निवडणूक प्रक्रियेचे कौतुक केले आहे.

सातत्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांसाठी हा मोठा धक्का ठरु शकतो.

https://twitter.com/PoornimaNimo/status/2089565223275618407/video/1

‘सेव्ह अमेरिका कायदा’ नेमका काय आहे?

‘सेफगार्ड अमेरिकन व्होटर एलिजिबिलिटी अ‍ॅक्ट’ (SAVE Act) या कायद्यानुसार, अमेरिकेत मतदार नोंदणीसाठी नागरिकत्वाचा पुरावा सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण देशभरात एकसमान मतदार ओळखपत्र प्रणाली लागू करणे आणि टपालाद्वारे होणाऱ्या मतदानावर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालणे, हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे. हे विधेयक अमेरिकी प्रतिनिधीगृहात (हाऊस) मंजूर झाले असले, तरी सिनेटमध्ये डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन पक्षांमध्ये याबाबत मतभेद असल्याने ते अद्याप प्रलंबित आहे. काँग्रेसकडून मंजुरी न मिळाल्यास कार्यकारी आदेशाद्वारे (एक्झिक्युटिव्ह ऑर्डर) हा नियम लागू करण्याचे संकेतही ट्रम्प यांनी यापूर्वी दिले होते.

अन्य लेख

संबंधित लेख