Saturday, December 21, 2024

कलासक्त चित्रकार, शिल्पकार : रवींद्र मेस्त्री

Share

रवींद्र मेस्त्री यांनी आपल्या चित्र आणि शिल्पकलेतून अनमोल कलाकृती निर्माण केल्या. एखाद्याचे व्यक्तिमत्व शब्दांपेक्षाही शिल्पातून उत्कटपणे मांडता येते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रवींद्र मेस्त्री यांनी घडवलेली शिल्पे. रवींद्र मेस्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख…

कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये असणार्‍या खरी कॉर्नर जवळ चित्रपटाचे चित्रीकरण करणार्‍या कॅमेर्‍याची प्रतिकृती आहे. कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी चित्रपटाचे चित्रीकरण करणारा पहिला भारतीय बनावटीचा कॅमेरा बनवला. त्याची ही प्रतिकृती. कॅमेराच्या उजव्या बाजूला जुन्या पद्धतीचे एक टुमदार घर आहे. हे घर बाबुराव पेंटर यांचेच. चित्रकला, चित्रपट निर्मिती आणि शिल्पकला बाबुराव पेंटर यांचे प्रभुत्व होते. या घरातून आणखी एक प्रतिभावान कलावंत पुढे आला ते म्हणजे बाबुराव पेंटर यांचे पुत्र रवींद्र मेस्त्री. मूळचे चित्रकार असणारे रवींद्र पुढे शिल्पकार म्हणून नावारूपाला आले. त्यांनी घडवलेली शिल्प आजही त्यांच्या कलेची साक्ष देतात.

तसा कोल्हापूरला पहिल्यापासूनच कलेचा वारसा लाभला आहे. ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अल्लादिया खां, चित्रपट निर्माते लेखक आणि दिग्दर्शक भालजी पेंढारकर, प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत आणि सूर्यकांत मांढरे, ऑस्करला गवसणी घालणार्‍या नैपथ्यकार भानू अथैया, प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके, कवी जगदीश खेबुडकर, अशा अनेक कलावंतांची मांदियाळी म्हणजे कोल्हापूर आहे. याचे मुख्य कारण कलासक्त मनाचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. महाराजांनी आपल्या दरबारामध्ये शास्त्रीय गायक, वादक, चित्रकार यांना सन्मानाचे स्थान दिले आणि या कलावंतांनी करवीर संस्थानात अनेक कलाप्रकार सुरू केले. कलाकार घडवले. राजर्षी शाहू महाराजांनी आबालाल रेहमान यांच्यातील चित्रकलेचे कौशल्य ओळखून त्यांना पाश्चात्य चित्रशैलीचे शिक्षण स्वखर्चातून दिले. आबालाल रहमान यांनी ही शैली इथे रुजवली. त्यातूनच चित्रकलेतील ‘कोल्हापूर स्कूल’ उदयाला आले. यातून पुढे दत्तोबा दळवी, आनंदराव पेंटर, बाबुराव पेंटर असे निष्णात चित्रकार घडले. दृश्याला अनुकूल चित्र असणे हे कोल्हापूर स्कूलचे वैशिष्ट्य आहे. रवींद्र मेस्त्री यांची चित्रे आणि शिल्पे याच विचारातून साकारल्याचे दिसून येते.

रवींद्र मेस्त्री यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1928 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. बाबुराव पेंटर यांनी रवींद्र यांच्यातील कलागुण ओळखून त्यांना मुंबई येथील जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकण्यासाठी पाठवले. 1948 ते 1950 या कालावधीत त्यांनी जे जे स्कूलमध्ये शिक्षण घेतले. बाबुराव पेंटर यांनी गांधी मैदानातील महात्मा गांधींचा भव्य पुतळा बनवण्याचे काम हाती घेतले होते. त्यांना मदत करण्यासाठी रवींद्र पुन्हा कोल्हापुरात आले. याच दरम्यान बाबुराव पेंटर यांचे निधन झाल्यामुळे पुढे हे काम रवींद्र यांनी पूर्ण केले. अचानक कुटुंबाची जबाबदारी आल्याने त्यांनी जे जे मधील शिक्षण सोडून व्यावसायिक काम करण्यास सुरुवात केली. 1956 मध्ये त्यांनी बाहेरून परीक्षा देत जे.जे स्कूलची जीडी आर्ट ही पदवी संपादन केली. त्यांच्या चित्रामधील रंगछटा आणि त्या पाठीमागील विचार हे वैशिष्ट्यपूर्ण असत. स्त्री, किर्लोस्कर, मौज अशा नामांकित नियतकालिकात त्यांची चित्रे प्रसिद्ध होत. रवींद्र मेस्त्री यांचे स्नेही पातुरकर यांच्या आग्रहावरून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग रेखाटले होते. पुढे रवींद्र मेस्त्री हे शिल्पकलेकडे वळाले.

कोल्हापुरात प्रवेश करताना कावळा नाका येथे महाराणी ताराराणी यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा आहे. घोड्याच्या दोन पायांवर हे संपूर्ण शिल्प उभारले आहे. या शिल्पामध्ये महाराणी ताराराणी यांच्या हातामधील तलवार आकाशाच्या दिशेने आहे. आभाळा एवढ्या आव्हानांना तोंड देत ताराराणींनी कोल्हापूरची गादी स्थापन केली. त्यांचा पराक्रम, इतिहास आणि त्यांचे झुंजार व्यक्तिमत्त्व या शिल्पातून प्रकट होते. रवींद्र मेस्त्री यांनी पन्हाळा किल्ल्यावरील बाजीप्रभू देशपांडे यांचे शिल्प साकारलेले आहे. बाजीप्रभूंच्या चेहर्‍यावरील आवेश, हातामधील खंडा प्रकाराच्या तलवारीची पकड, त्यांची देहबोली यातून घोडखिंडी मधील रणसंग्राम आपल्यासमोर उभा राहतो. याच किल्ल्यावर वीर शिवा काशीद यांचाही पुतळा आहे. ही देखील रवींद्र मेस्त्री यांची कलाकृती. घोडखिंडीचा रणसंग्राम भर पावसात झाला होता पावसात भिजल्यानंतर कपडे शरीराला ज्या प्रकारे चिकटतात त्याच पद्धतीने शिवा काशिद यांच्या शिल्पावरील कपड्यांची रचना दिसते. त्यांच्या हातात असणारे विटा नावाचे शस्त्र देखील हुबेहूब आहे. शहरातील हुतात्मा बागेत रवींद्र यांनी विवेकानंदांचा पुतळा साकारला आहे. येथील बिद्री साखर कारखान्याच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीचा प्रसंगही शिल्पातून रवींद्र यांनी उभारला आहे. मंत्रालयाच्या असेम्बली हॉलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक ही शिल्पे देखील रवींद्र मेस्त्री यांनी बनवलेली आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची अनेक शिल्पे रवींद्र मेस्त्री यांनी बनवली जी आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी बसवण्यात आली आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे शासनाने अधिकृत केलेले पहिलं चित्र देखील रवींद्र मेस्त्री यांनी बनवले आहे. जे आज कोल्हापुरातल्या शाहू स्मारक भवन मध्ये आहे.

शिल्प असो किंवा चित्र त्यातील बारकाव्यांना रवींद्र मेस्त्री फार महत्त्व द्यायचे. याबाबत चित्रकार अनिल उपळेकर एका लेखामध्ये लिहितात, विद्यार्थ्यांना शिकवताना रवींद्र मेस्त्री हे बारकाव्यांवर लक्ष देण्यास सांगत. चित्रा मधले झाड हे आपल्या मनातील असू नये, तर प्रत्यक्ष झाड चित्रामध्ये यावे यासाठी झाडाची रचना, त्या वृक्षाचे वैशिष्ट्य हे सर्व चित्रात उतरले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. त्यांनी साकारलेल्या कोणत्याही शिल्पामध्ये पोत, देहबोली, ठेवण या बाबींचा बारकाईने विचार केला गेला असल्यास दिसून येते. त्यामुळेच त्यांनी साकारलेली शिल्पे उत्कट आणि जिवंत वाटतात.

रवींद्र मेस्त्री यांनी जे. कृष्णमूर्ती आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला होता. रवींद्र यांच्या व्यक्तिमत्त्वावर देखील याचा प्रभाव होता. ते अत्यंत नम्र, मितभाषी आणि शिस्तप्रिय स्वभावाचे होते. त्यांचा अधिकाधिक वेळ हा घरातील स्टुडिओमध्ये कलाकृती साकारण्यात जायचा. त्यांचे बोलणेही अत्यंत मुद्देसूद आणि लाघवी होते. त्यांनी काही नाटकांसाठी नैपथ्यही केले होते.

मुळातच कलासक्त असणार्‍या कोल्हापूरकरांना रवींद्र मेस्त्री यांचा अभिमान वाटतो. रवींद्र मेस्त्री यांच्या सहवासात चित्रकला आणि शिल्पकला शिकलेले अनेक जण आज त्या त्या क्षेत्रात प्रतीथयश आहेत. त्यांच्या कलाकृतींच्या रूपाने आजही या कलावंताच्या स्मृती जपल्या गेल्या आहेत.

प्रतिनिधी
(महाराष्ट्र नॉलेज सेंटर)

अन्य लेख

संबंधित लेख