Friday, October 18, 2024

विरोधकांचे खोटे नरेटिव्ह जनतेत जाऊन उघडे पाडणार : चंद्रशेखर बावनकुळे

Share

मुंबई : भाजपची (BJP) महाराष्ट्र आणि मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. “लोकसभा निवडणूक प्रचारात मविआ, इंडी आघाडीने खोट्या नरेटिव्ह द्वारे जनतेची दिशाभूल करून दलित, आदिवासी समाजाची मते मिळवली. हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते आगामी काळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाणार आहेत,” अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शुक्रवारी (14 जून)दिली. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष (मुख्यालय) माधव भांडारी, खा.डॉ.भागवत कराड, खा. मेधा कुलकर्णी, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले की, विरोधकांना उघडे पाडून आगामी विधानसभा निवडणुकीत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नव्या जोमाने काम करून महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होईल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. बावनकुळे म्हणाले की, लोकसभा निवडणूक निकालाबाबत विचार करण्यासाठी प्रदेश पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत घरोघरी जाऊन मविआ, इंडी आघाडीचा खोटा प्रचार जनतेपर्यंत नेऊन मतदारांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोदी सरकारने मागच्या 10 वर्षांत जातपात,धर्म यापलिकडे जाऊन केलेला सर्वसमावेशक विकास, आगामी पाच वर्षात मोदी सरकारचे विकसित भारताचे लक्ष्य जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत . आगामी काळात महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे 48 नेते भेट देऊन जनतेच्या मनातील गैरसमज दूर करणार आहेत. तसेच नवमतदार नोंदणी अभियानही हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती बावनकुळे चंद्रशेखर यांनी दिली.

केवळ दलित व मागास वर्गाचीच नव्हे तर विरोधकांनी महिलांची देखील फसवणूक केली. महिलांच्या खात्यात दरमहा 8,500 रुपये ‘खटाखट’ जमा होतील असे खोटे आश्वासन देऊन महिलांना भुलवले. आता विरोधकांच्या खासदार आणि नेत्यांच्या घरासमोर 8,500 रुपयांच्या मागणीसाठी महिलांची झुंबड उडल्याचे आपण बघतोच आहोत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

संविधानाला सर्वोपरि मानत संविधानासमोर नतमस्तक होऊन भाजपा-एनडीए सरकारच्या तिस-या कार्यकाळाची सुरुवात करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता विकसित भारत घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे वांरवार सांगितले होते. विरोधकांनी खोटेनाटे पसरवून मागास आणि दलितांच्या मनात भय पसरवले. मात्र आता कुठल्याही प्रकारचे भय त्यांच्या मनात नसल्याचे बावनकुळे म्हणाले. संकल्पपत्रातील प्रत्येक आश्वासनाच्या पूर्तीसाठी महायुती आणि भाजपा- एनडी सरकार वचनबद्ध आहे हा विश्वास जनतेच्या मनात पुन्हा नव्याने निर्माण करण्यासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता व मंत्री पुढील काळात झटणार असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.

अन्य लेख

संबंधित लेख