Wednesday, January 15, 2025

हुतात्मा वीर लक्ष्मण नायक

Share

मलकानगिरीचे गांधी म्हणून ज्यांना गौरवण्यात आले ते वीर लक्ष्मण नायक हे वर्तमान ओडिसाच्या भूमीया या जनजाती समाजातील होते. २२ नोव्हेंबर १८९९ या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि अवघ्या ४४ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जल, जमीन, जंगल याच्या संरक्षणासाठी आणि त्याबरोबरीने इंग्रजी हुकूमत संपविण्यासाठी क्रांती व शांती मार्गाचा अवलंब करत आपल्या जनजाती बांधवांना सोबत घेऊन शेवट पर्यंत संघर्ष केला.

वीर लक्ष्मण नायक यांची अशी पक्की धारणा होती की, जर चंद्र आणि सूर्य हे शाश्वत आणि सत्य आहेत तर भारताचे स्वातंत्र्यही त्याप्रमाणे शाश्वत व सत्य आहे आणि ते आम्हाला मिळणारच. आपल्या जनजाती बांधवांच्या उपजीविकेचे साधन जंगल, जल व जमीन हेच आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी त्यांनी इंग्रजांशी दोन हात केले.

मलकानगिरीच्या क्षेत्रामध्ये स्थानिक जनजाती समाज हा अत्यंत गरीब व अन्नधान्यापासूनही वंचित असताना त्यांच्यामध्ये गुलामी तोडण्याचे स्फुल्लिंग त्यांनी चेतवले आणि एक क्रांतिकारी दल निर्माण केले, ज्याच्या आधाराने त्यांनी अनेक वर्ष इंग्रजांना मलकानगिरी क्षेत्रामध्ये आव्हान निर्माण केले.

१९३० ते ४० ह्या दशकात प्रभावी जनजाती नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. ह्याच कालखंडात महात्मा गांधींच्या मार्फत विविध आंदोलने देशभरात सुरू होती. काँग्रेसने त्यांना आपल्यामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. त्यांच्या पाठिंब्याने काँग्रेसतर्फेही वन क्षेत्रामध्ये आंदोलनाच्या विविध योजना राबवल्या जाऊ लागल्या.

या साऱ्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांची महात्मा गांधी यांच्या सोबत झालेली भेट त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करून गेली व त्यांनी गांधीजींच्या मार्गाने आपला प्रवास पुढे सुरू केला.
काँग्रेसच्या आंदोलनामध्ये जनजातींचा सहभाग वाढू लागला. स्वतः लक्ष्मण नायक हे चरखा घेऊन गावागावात शिक्षणाचा प्रचार करू लागले. त्यामुळे त्यांना लोक मलकानगिरीचे गांधी म्हणून संबोधू लागले.

१९४२ च्या चलेजाव आंदोलनामध्ये आपल्या कुशल नेतृत्वाच्या आधाराने त्यांनी मलकानगिरी क्षेत्रात असंतोष निर्माण केला. परंतु आता मार्ग क्रांती ऐवजी शांतीच्या मार्गाने सुरू झालेला होता. महात्मा गांधीजींच्या आदेशानुसार ऑगस्ट १९४२ मध्ये चले जाव आंदोलनात त्यांनी सथीली पोलीस स्टेशनच्या समोर शांतीपूर्ण आंदोलन केले. परंतु पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार करत त्यांच्या पाच सहकाऱ्यांना ठार केले. पुढे त्यातून जन प्रक्षोभ अधिकच उसळलला.

जर वीर लक्ष्मण नायक यांचा प्रभाव कमी केला नाही तर या क्षेत्रामध्ये आपणाला फार काही करता येणार नाही हे ओळखून इंग्रजांनी कपटाने त्यांना एका खोट्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली. कोणतीही चौकशी न करता २९ मार्च १९४३ ला त्यांना ब्रह्मपूर जेलमध्ये फासावर चढवले.

अत्यंत गरीब व विपरीत परिस्थितीमध्येही, साधनसामग्री नसतानाही त्यांनी अनेक वर्ष इंग्रजांच्या विरोधामध्ये स्थानिक जनजातींना घेऊन संघर्ष उभा केला आणि आपले नेतृत्व प्रस्थापित केले. ज्याची दखल महात्मा गांधींना घ्यावी लागली. त्यांचा विश्वास संपादन करत प्रति मलकानगिरी गांधी म्हणून ते इतिहासामध्ये अमर झाले. त्यांच्या विरोचित हौतात्म्याला त्रिवार वंदन.

शरद चव्हाण
(लेखक जनजाती कल्याण आश्रमाचे क्षेत्र प्रचारक आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख