Friday, September 20, 2024

मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अमूल्य

Share

परभणी : भारतीय स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यासह तीन संस्थाने एकसंघ देशात विलीन होण्यास तयार नव्हती. निजामाच्या जाचातून मुक्त होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ (Swami Ramanand Tirtha) यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात दिलेल्या लढ्यातील योगदान अमूल्य असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा परभणी (Parbhani) जिल्ह्याचे पालक मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी सांगितले. परभणी येथील राजगोपालचारी उद्यान येथे आज मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या ७६ व्या (Marathwada Liberation Day) वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी पालक मंत्री संजय बनसोडे बोलत होते.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबविण्यासोबतच; जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मदत दिली जाईल, असे सांगून राज्य शासन सर्वसामान्यांच्या हित आणि विकासासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा जिल्ह्याचे पालक मंत्री संजय बनसोडे यांनी प्रतिपादन केले.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होता. त्यामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, निजामाच्या राजवटीतून मुक्त करून भारतीय संघराज्यात सामील करून घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरु करण्यात आला. त्यामुळे या स्वातंत्र्य सैनिकांचे अमूल्य योगदान असल्याचे पालकमंत्री बनसोडे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात परभणी जिल्ह्याचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील हजारो तरुण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या लढयात सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी झुंज दिली. प्रसंगी अनेकांनी मृत्युलाही कवटाळले. परभणी जिल्ह्यातील चारठाणा, वालूर, ब्राम्हणी, माळसोन्ना यासह अनेक गावा-गावातून मुक्ती संग्रामाचा लढा स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. विनायकराव चारठाणकर, मुकुंदराव पेडगावकर, दादासाहेब चारठाणकर, शंकरराव खळीकर, हरिहरराव कहाळेकर, श्रीनिवासराव बोरीकर यांच्या बरोबरीने इतर नेत्यांचीसुध्दा कामगिरी उल्लेखनीय आहे. लढ्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचेही योगदान महत्त्वपूर्ण होते. गीताबाई चारठाणकर, शांताबाई पेडगावकर यासह अनेक महिलांनी अनन्यसाधारण कामगिरी बजावल्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्ती संग्रामचे हे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अखेर 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त होवून भारतीय संघ राज्यात विलीन झाला. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेचा त्याग सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे. या त्यागाची जाणीव ठेवूनच मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृ‍तिक व कृषिविषयक सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्य गरज त्यांनी व्यक्त केली.

मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची जाणीव ठेवून या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. यावेळी संजय बनसोडे यांनी स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच संजय बनसोडे यांनी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार यांची भेट घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अन्य लेख

संबंधित लेख