Saturday, December 21, 2024

३ ऑक्टोबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा दिन’ म्हणून साजरा होणार; राज्य सरकारचा निर्णय

Share

मुंबई : ३ ऑक्टोबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा दिन’ (Marathi Classical Language Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोशल मीडिया प्लॅफॉर्म ‘एक्स’वर दिली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी जगभरातील मराठी माणसांकडून अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी केंद्र सरकारने अखेर मान्य केली. त्यानंतर राज्य सरकारने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या निर्णयाचे राज्यभरात स्वागत होत आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाने महाराष्ट्राचे आणि जगभरातील मराठीजनांचे अभिनंदन केले. तसेच जो विषय इतके वर्ष प्रलंबित होता, त्याला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे आभार व्यक्त करणारा ठराव यावेळी करण्यात आला. दरम्यान, ३ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख