Wednesday, December 4, 2024

सोशल मीडियावर कार्यकर्त्यांचे ‘वॉर’

Share

विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे सर्वच दिग्गज नेत्यांनी आपापले उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करत दाखल केले. आता माघारीनंतर सर्वच लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने जोर चढेल. मात्र, त्याआधीच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाच्या गर्दीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

गावागावांतील कार्यकर्ते आमने- सामने आले असून, शक्तिप्रदर्शनाच्या ठिकाणी असलेल्या उपस्थित गर्दीवरून कार्यकर्त्यांकडून दावे- प्रतिदावे केले जात आहेत. प्रत्येक उमेदवाराकडून सोशल मीडियासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली जात आहे. यामाध्यमातून प्रचार सुरु आहे. कार्यकर्त्यांनाही आले ‘अच्छे दिन’ विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तसेच छाननी संपली. तत्पूर्वीच कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन आले आहेत. त्यात सर्वसामान्यांपासून ते कार्यकर्त्यांच्या मैफली आता ढाबे, चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्यांवर रंगत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

निवडणुकीतील प्रचाराला अजून वेळ असला तरी आपल्या बाजूने कार्यकर्त्यांची फौज असावी यासाठी उमेदवारही कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला असून, त्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. विधानसभा निवडणुकीत आणखी रंग भरणे बाकी आहे. मात्र, आतापासूनच कार्यकर्ते आपला उमेदवार कसा सक्षम आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ उमेदवारांचे कार्यकर्ते आपापल्या परीने जसा होईल तसा प्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे, सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करीत आहेत. काही उमेदवारांनी वॉर रूम तयार केली आहेत. या माध्यमातून काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लगेच – त्या पोस्टला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या उमेदवाराच्या टीमकडून पोस्ट व्हायरल केली जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख