मनोज जरांगे च्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारां मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांसाठी ऐनवेळी भूमिका बदलली. आपण राज्यात एकही उमेदवार देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं असून काही ठिकाणी पाडापाडी करायची, अशा शब्दात मराठा समजाला आवाहन केलं आहे. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेचा नेमका कोणाला फायदा होईल, यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत. राजकीय वर्तुळातही जरांगेंच्या भूमिकेची चर्चा होत आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना, मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे केले असते तर भाजपला फायदा झाला असता, असे म्हटले होते.
आता, अजित पवारांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल, असे म्हणत ते कसंही हेही अजित पवारांनी समजावून सांगितलं. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामधून घोषणांचा वर्षाव करण्यात आला आहे.याच अनुषंगाने पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, बारामतीचा मतदार माझा परिवार आहे. बारामतीच्या विकासात माझा खारीचा वाटा आहे, तसेच सुप्रिया सुळे यांचा देखील मोठा वाटा असल्याचे अजित पवार म्हणाले.
काल महायुतीच्या प्रचाराचा नारळ आम्ही फोडला आहे. आमचा युतीचा जाहीरनामा येणार आहे. पण पक्षाचा जाहीरनामा येत आहे. ज्या भागात आमचे उमेदवार आहेत, तिथं वेगळे जाहिरनामे असतील. महाराष्ट्रमधील सगळ्यात जास्त निधी बारामतीत आणल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीला पहिले सौरऊर्जा शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच कॅन्सर हॉस्पिटलही उभारणार आहे, लॉजेस्टिक पार्क उभारणार आहे. शिक्षण, दर्जेदार रस्ता, शेतीच्या विकासाचा वादा, सामाजिक विकासाचा वादा पूर्ण करणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले.