Thursday, October 10, 2024

पुणे जिल्ह्यातील हवेली, आंबेगाव, बारामती आणि इंदापूर पाणीपुरवठा योजनांना गतीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

Share

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील घेरा, सिंहगड, प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी आणि इंदापूर तालुक्यातील बोरी या गावांच्या पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना भेट देऊन, तेथील भौगोलिक परिस्थिती आणि शाश्वत जलस्त्रोतांचा सखोल अभ्यास करावा. तसेच, भविष्यातील 50 वर्षांची गरज लक्षात घेऊन सर्वोत्तम व्यवहार्य पर्यायासह तातडीने प्रस्ताव सादर करावा. या योजनांचे काम त्वरित मार्गी लावण्यासाठी अधिकारी तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नवीन प्रस्ताव तयार करताना धरणातून बंद पाईपद्वारे पाणी आणणे, नवीन साठवण तलाव बांधणे, तसेच सध्याच्या साठवण तलावांची दुरुस्ती यांसारखे पर्याय विचारात घ्यावेत. अशुद्ध पाणी गुरुत्वनलिका, उद्धरणनलिका, पंपिंग मशिनरी, जलशुद्धीकरण केंद्र, शुद्ध पाणी ऊर्ध्वनलिका, उंच जलकुंभ, संतुलनटाकी आणि वितरण व्यवस्थेसह सौरऊर्जा अशा अपारंपरिक स्त्रोतांचा समावेश करून अंदाजपत्रकासह परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. शासनस्तरावर प्रस्तावाचा सखोल अभ्यास करून तातडीने प्रशासकीय मान्यता दिली जाईल. या गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना त्वरित गती देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

अन्य लेख

संबंधित लेख