Thursday, October 10, 2024

“गाव गोळा करण्यासाठी केलेला नाच म्हणजे हा अग्रलेख”; सामनाच्या अग्रलेखावर शेलारांची कडक शब्दात टीका

Share

महाराष्ट्र : “तुम्ही हिंदुत्व, विचार आणि आचार सोडलात टिपू सुलतानाची जयंती करणे सुरु केलीत, औरंगजेब फँन क्लब उघडलात, अफजलखानाच्या कबर तुम्हाला प्रिय वाटू लागली, याकूब मेमनची कबर तुम्ही सजवलीत.. म्हणून तुम्हाला भिती वाटतेय, त्यामुळे भितीच्या पोकळ डोहाळ्यांच्या उलट्या बंद करा ! मर्दांसारखे लढायला समोर या,” असे आवाहन भाजपने शिवसेना ठाकरे गटाला दिले आहे. भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पोस्ट शेअर करत सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखावर कडक शब्दात टीका केली आहे. शेलार यांनी संजय राऊतांवर पण अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

दरम्यान, ‘महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी व मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शहा यांना शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या खतम करायचे डोहाळे लागले आहेत. हे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील,’ अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून अमित शाहांवर टीकास्त्र डागण्यात आलं होत.

आशिष शेलार म्हणाले कि, भितीच्या आणि पोकळ डोहाळ्यांच्या उलट्या ! एक काळ कणखर, मर्द आणि ज्वलंत विचारांनी ओतप्रोत भरलेला सामनाचा अग्रलेख असायचा. आज काल त्या जागेवर घाबरटांचे पानचट कथन पहायला मिळते आहे. जळजळ, मळमळ, थयथयाट यातून होणाऱ्या उलट्या आणि भय, भिती आणि घबराट यामुळे गाव गोळा करण्यासाठी केलेला नाच म्हणजे हा अग्रलेख असतो.

भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांनी महाराष्ट्र दौरा सुरु करताच हे घाबरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमिताभाई शाह यांना हे असेच घाबरतात. ते महाराष्ट्रात येऊ लागले की यांच्या “लुंग्या” ओल्या होतात. का? मर्दांचा पक्ष आहे म्हणून सांगताना ? या ना मर्दांसारखे समोर…!

महाराष्ट्राला काय देणार? याचा पत्ता नाही, अजेंडा नाही आणि विचार नाही. फक्त सत्तेसाठी कडबोळी केलेल्या पक्षात एकच चर्चा आणि स्पर्धा आहे ती म्हणजे “मुख्यमंत्री कोण होणार?” आमची लढाई मुख्यमंत्री पदासाठी नाही, सत्तेसाठी नाही. आमची लढाई विचारांसाठी आहे. हिंदूत्वासाठी आहे. होय आम्हाला महाराष्ट्र द्रोह्यांना हरवायचे आहे, होय तुमच्या महाराष्ट्र द्रोह्यांच्या काफिल्यात गुदमरलेल्या हजारो “एकनाथ शिंदे” यांना तुमच्यापासून वेगळे होण्याचे बळ द्यायचे आहे. आम्हाला महाराष्ट्र देशासोबत जोडायचा आहे. विकासाच्या वाटेवर वेगवान करायचा आहे. त्यासाठी आम्ही संघर्ष करीत आहोत. आमचे नेतृत्व त्यासाठी अहोरात्र झटत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाऱ्या आमच्या शिरस्त नेतृत्वाची तुम्हाला भिती का वाटते? कारण महायुतीचा विजय म्हणजे हिंदुत्वाचा विजय, महायुतीचा विजय म्हणजे तुमचे पोटभरू दुकान बंद… तुमचे कट कमिशन बंद म्हणून तुमचा थयथयाट चाललाय.

आम्ही सकाळी उठून नमस्ते सदा वत्सले मातृभूमे …. म्हणतो तुमच्या सारखे दुसऱ्यांना शिव्याशाप देत नाही. आम्ही या मातीला मातेसमान मानतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला नम्रता शिकवू नका? तुम्हाला नैतिक अधिकार आहे का? महिलेचा अपमान करुन शिक्षा झालेल्या आणि जामिनावर असलेल्या आरोपीच्या लेखणीतून आम्हाला कसले तत्वज्ञान शिकवताय? अग्रलेखातून तत्वज्ञान शिकवणाऱ्याकडे नैतिकता असावी लागते. रोज उठून खोटे बोलणाऱ्या, बदनामी करणाऱ्या बोरु बहाद्दरांचे वर्णन एका प्रसिद्ध व्यंगचित्रकाराने ” लग्नाच्या मांडवात नाचणारी करवली!” असा केले आहे.( खरं समाजातील प्रतिष्ठित, लेखिका आणि प्राध्यापिका असलेल्या महिलेची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला “करवली” ही उपमा ही देऊ नये. ) अशा माणसाच्या लेखणीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही धडे देणार? उपदेश करणार? हे म्हणजे अती झाले आणि हसू झाले यापेक्षाही भयंकर हास्यास्पद आहे.

अरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह निवडणूकीचा प्रचार करणार…हिंदुत्वासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढणार… तुम्ही हिंदुत्व, विचार आणि आचार सोडलात टिपू सुलतानाची जयंती करणे सुरु केलीत, औरंगजेब फँन क्लब उघडलात, अफजलखानाच्या कबर तुम्हाला प्रिय वाटू लागली… याकूब मेमनची कबर तुम्ही सजवलीत.. म्हणून तुम्हाला भिती वाटतेय…. ही भिती तुम्हालाच आतल्या आत सतावतेय. त्यामुळे भितीच्या पोकळ डोहाळ्यांच्या उलट्या बंद करा ! मर्दांसारखे लढायला समोर या !!, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख