Saturday, May 25, 2024

राममंदिर निर्माण कार्य आणि अफाट श्रद्धा…

Share

समर्पित भावनेने काम करणारे स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी अशा अनेकांबरोबर अयोध्येत काम करता आले. अगदी मोठ्या श्रद्धेने अयोध्येत येणाऱ्या रामभक्तापासून ते उद्योजकांपर्यंत प्रत्येकाचीच ही इच्छा आणि भावना असायची की, या कार्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात का होईना माझाही सहयोग असू दे.

अयोध्येत राममंदिर निर्माण कार्य सुरू असताना अयोध्येत आमचा प्रवासही खूप व्हायचा. असेच एकदा आम्ही भाड्याने घेतलेल्या कारमधून कामाच्या ठिकाणाहून परत जात असताना कुठल्या तरी संदर्भात माझे एक सहकारी बजेट, पैसे बघायला पाहिजेत असे काहीतरी म्हणले. चालकाला भाषा तितकीशी समजली नाही पण काहीतरी पैसे ह्या विषयाशी निगडित आहे एवढे मात्र कळले. आमचे संभाषण चालू असताना मध्येच त्याने आम्हाला आश्वस्त केलं. मेरे पेमेंट कि आप बिलकुल चिंता मत करो, आप मंदिर निर्माणकार्य में जुडे हुए हो, आपको किधर भी, कितना भी और कभीभी काम के लिये जाना है, जितना भी समय रुकना है, तो हम कुछ नही कहेंगे और पेमेंट के लिये रूकाने का पाप तो कभी नही करेंगे, हे त्याचे शब्द होते. खरोखरच तेथे प्रत्येकजण भक्तीने किती भारावलेला असतो, ते अशा वरवर छोट्या दिसणाऱ्या पण प्रत्यक्षात खूप मोठं काहीतरी व्यक्त करणाऱ्या अशा घटनांमधून समजत गेले.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि Construction Committee च्या वतीने जे सर्व अधिकारी, पदाधिकारी ह्या कार्यात कार्यरत आहेत त्यांनी दिवस रात्र, अखंड ह्याच कार्यात वाहून घेतलेले आहेत. निवृत्त सनदी अधिकारी अधिकारी, मा. पंतप्रधानाचे माजी प्रधान सचिव आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट Construction Committee चे अध्यक्ष श्री. नृपेंद्रजी मिश्रा स्वतः ह्या पवित्र निर्माण कार्याकरिता मला संधी मिळाली हे मी माझे परमभाग्य समजतो, असे म्हणतात. राममंदिर निर्माण कार्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन पुण्याचे श्री. जगदीश आणि सौ. माधुरीताई आफळे हे दाम्पत्य गेली तीन वर्षे इथे अखंड कार्यरत आहेत. श्री. आफळेजी हे ट्रस्टच्या वतीने प्रकल्प व्यवस्थापक ही महत्वाची भूमिका पार पडत आहेत आणि त्यांच्या पत्नी माधुरीताई ह्या ट्रस्टच्या वतीने अकाउंट्स आणि फायनान्सचे काम बघतात.

देणगीदारांचे अनुभव
मंदिराला देणगी देण्याकरता कुठून कुठून आलेले कित्येक भाविक अगदी सामान्य आर्थिक परिस्थितीतून आलेले असले तरी सुद्धा आपली आयुष्यभराची कमाई श्री रामचरणी अर्पण करतात. अशा अनेक देणगीदारांचे अनुभव माधुरी ताईंकडून ऐकताना डोळ्यात अक्षरशः पाणी येते. ट्रस्टच्या वतीने नेमणूक झालेले अन्य अभियंते, अधिकारीही दिलेल्या जबाबदाऱ्या स्वतःला झोकून देऊन तितक्याच समर्पित भावनेने पार पडत आहेत.

ह्या पवित्र कार्यातील सेवा
आणखी एक नमूद करण्यासारखा विषय म्हणजे, ह्या कार्याकरिता लागणारे साहित्य किंवा विविध उपकरणे ह्या करता जेव्हा विचारणा किंवा चौकशी केली जायची, तेव्हा अनेक नामवंत कंपन्यांनी आम्हाला हे दान करण्याची इच्छा आहे, ह्या पवित्र निर्माण कार्यात आमच्याकडून ही सेवा समजून हे साहित्य स्वीकारावे अशी विनंती केली जायची. सर्व विनंत्यांचा योग्य मान ठेवत, तरीही ते साहित्य Design Requirements प्रमाणे आहे आणि अपेक्षित गुणवत्तेचे देखील आहे, याची खात्री करून त्याच्याशी निगडित कागदपत्रे आणि नोंदी करणे हाही महत्त्वाचा विषय हाताळला गेला.

केवढी ही श्रद्धा…
रामजन्माचे जे मूळ ठिकाण आहे, तिथेच आता रामलल्ला पुन्हा विराजमान झाले आहेत. कित्येक विशेष अतिथी जेव्हा तिथे भेट द्यायला यायचे तेव्हा साईटवर भल्या उन्हात अथवा ओल्या काँक्रीटवर सुद्धा साष्टांग नमस्कार घालायचे आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असायचे. हे सगळं बघितलं, अनुभवलं की पुन्हा पुन्हा असं मनात येतं आणि अचंबित व्हायला होतं की माणसाच्या भौतिक स्वरूपातील तथाकथित शिक्षणाच्या, पदाच्या आणि संपत्तीच्या पलिकडे जाऊन प्रभू श्रीरामांवर श्रद्धा आणि ह्या निर्माण कार्याविषयीची आस्था ही केवढी अफाट आहे !

हे कार्य सुरू असताना असे कितीतरी खूप छान अनुभव येत गेले. त्यातील काही अनुभव सांगते पुढील भागात.

अश्विनी कविश्वर
(लेखिका स्थापत्य अभियंता असून त्या वरिष्ठ उप महाव्यवस्थापक या पदावर काम करतात.)

अन्य लेख

संबंधित लेख