Monday, December 2, 2024

राममंदिर निर्माणाचे हे कार्य अलौकिकच

Share

अयोध्येचा सारा परिसर आणि राममंदिर निर्माण कार्याची विशेषता ही आहे की, इथे प्रत्येकामध्ये समर्पणाची भावना जागृत होते. प्रत्येकजण इथे स्वतःकडे जे देण्यासारखे आहे, ते उत्तमात उत्तम पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत असतो.

अयोध्येत मंदिर निर्माण कार्य सुरू असताना संपूर्ण कालावधीत अनेक मोठ्यात मोठ्या पदावर काम करणारे पदाधिकारी प्रभुचरणी नतमस्तक होताना बघितले आणि त्याच बरोबर लौकिकार्थाने लहान असलेल्या भाविकांची महान श्रद्धाही बघितली. श्रीराम मंदिर निर्माण आणि त्याच बरोबर राष्ट्रमंदिर निर्माणाचे हे कार्यच इतके अलौकिक आहे की त्याच्याशी जोडलेला प्रत्येकजण स्वतःकडे जे देण्यासारखे आहे, ते समर्पित भावनेने उत्तमातल्या उत्तम पद्धतीने देण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. अत्यंत भारावलेले असे हे वातावरण होते. त्यातला प्रत्येक जण हा राममय झालेला आणि आत्यंतिक श्रद्धेने काम करणारा… असा हा वेगवेगळ्या गणवेशांच्या आणि भूमिकांच्या पलिकडचा माणूस आणि त्या प्रत्येक माणसातले देवपण मला इथे अनुभवायला मिळाले.

मी ३२ वर्षांपूर्वी सिव्हिल इंजिनीरिंगची पदवी प्राप्त करून Design Engineering Consultancy आणि Project Management (तांत्रिक आणि प्रकल्प सल्लागार) ह्या क्षेत्रामधील वाटचालीस सुरुवात केली. आतापर्य़ंत विविध प्रकारच्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली. सल्लागार म्हणून काम करतानाची क्षेत्रं बदलत गेली, परंतु त्यात मुख्यत्वे करून पायाभूत सुविधा निर्माण प्रकल्पांवर म्हणजेच Infrastructure Development प्रकल्पांवर काम केले. प्रत्येक प्रकल्प वेगळा असतो आणि त्यात काम करताना वेगवेगळे अनुभव मिळत असतात. पुढील प्रकल्पांकरिता अधिक व्यापक दृष्टीही त्यातून मिळते. पायाभूत सुविधांसारख्या प्रकल्पांचा अंतिम उपभोक्ता हा समाज असतो, हे सतत ध्यानात ठेवावे लागते. प्रकल्पनिर्मितीच्या क्षेत्रातील माझा असा हा अखंड सुरू असलेला नवनिर्मितीचा प्रवास. त्यात आतापर्यंतच्या प्रकल्पातल्या अनुभवांपेक्षा अतिशय वेगळे आणि संस्मरणीय अनुभव श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यात मिळाले. ते माझे काही अनुभव गेल्या चार भागांमधून सांगण्याचा मी प्रयत्न केला.

बघता बघता श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची शुभ घडी आता जवळ येऊन ठेपली होती. मंदिराचा तळमजला आणि परिसराचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. थोड्याच दिवसानंतर मंदिर भाविकांसाठी खुले होणार होते. २२ जानेवारी रोजी झालेल्या भव्य, आणि अलौकिक प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता शतकांची प्रतीक्षा संपली आहे आणि भाविक आपल्या श्रद्धेय भगवान श्री रामलल्लाचे डोळे भरून दर्शन घेत आहेत. पुढील हजारो वर्षे भाविक इथे परमेश्वराच्या सगुण भेटीचा आनंद आणि आध्यामिक अनुभूती घेतील. हे मंदिर जगातील हिंदूंमध्ये एकता आणि धर्माभिमान जागृत ठेवेल आणि भारताला परम वैभवाकडे नेणारे राष्ट्र मंदिर म्हणून ते नावलौकिक पावेल. अर्थातच ह्या सोनेरी कालखंडात मिळालेले हे अनुभव मात्र माझ्या दृष्टीने कायमचा जपून ठेवण्याचा अमूल्य ठेवा असेल.

अयोध्येतील श्रीरामांच्या मंदिरनिर्मितीचे अनेक अनुभव सांगतानाच प्रत्यक्ष मंदिरात गेल्यानंतरचा माझा अनुभव काय होता ते सांगते पुढील भागात.

अश्विनी कविश्वर
(लेखिका स्थापत्य अभियंता असून त्या वरिष्ठ उप महाव्यवस्थापक या पदावर काम करतात.)

अन्य लेख

संबंधित लेख