अयोध्या : श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरातील मुख्य शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, आता परिसरातील इतर सहा उप-मंदिरांवरही धर्मध्वजा फडकवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत टप्प्याटप्प्याने हे ध्वजारोहण सोहळे पार पडणार आहेत.
यात सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर होणार आहे. या दिवशी हनुमान मंदिराच्या शिखरावर विधीवत ध्वजारोहण केले जाईल. तत्पूर्वी, २२, २३, २४, २५, २९, ३० आणि ३१ मार्च या दिवसांमध्ये सूर्यदेव, माता भगवती, शिवजी, गणपती आणि शेषावतार या पाच उप-मंदिरांवरील ध्वजारोहण विधी पूर्ण केले जातील.
अयोध्येतील राम मंदिर परिसरातील चार मुख्य प्रवेशद्वारांपैकी तीन प्रवेशद्वारांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही द्वारे जगद्गुरु रामानंदाचार्य, आदि शंकराचार्य आणि रामानुजाचार्य या महापुरुषांच्या नावाने ओळखली जातील. चौथ्या ‘जगद्गुरु मध्वाचार्य’ प्रवेशद्वाराचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच सर्व द्वारांचे ऑनलाइन लोकार्पण करून पंचायतन मंदिरांमध्ये भाविकांना दर्शन देण्याची योजना आखली जात आहे.
हे सर्व कार्यक्रम कोणत्याही मोठ्या जनसभेविना संपन्न होणार असून, प्रत्येक विधीला सुमारे ५० संत आणि २०० निमंत्रित उपस्थित राहतील. यामध्ये मंदिर आंदोलनात सक्रिय राहिलेले वरिष्ठ कार्यकर्ते जसे की विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, जयभान पवैया आणि केशव मौर्य यांना आमंत्रित करण्याचा मानस न्यासाने व्यक्त केला आहे.
संपूर्ण मंदिर परिसर भाविकांसाठी खुला करण्याबाबत चंपत राय म्हणाले की, “अयोध्या हे सध्या अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे. संपूर्ण संकुल पाहण्यासाठी चार तासांहून अधिक वेळ लागतो, त्यामुळे गर्दीचे नियोजन आणि सुरक्षा यावर सध्या चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.” मंदिर बांधकामाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून एक विशेष पुस्तिकाही तयार केली जात आहे.