Saturday, July 27, 2024

…म्हणून हवे राममंदिर

Share

२२ जानेवारी २०२४ ला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरल्या गेलेल्या या क्षणाला आज एक महिना पूर्ण होत आहे. ‘राम’ नामात काय ताकद आहे, हे त्या दिवसाने जगाला दाखवून दिले. शहरे, गावे, अगदी गल्लीबोळ, घरे भगव्या पताकांनी उजळून निघाली होती. दसरा, दिवाळी, गणेशोत्सव हे सारे सण एकाच वेळी भूतलावर अवतरले आहेत असे वाटावे अशा आनंदमय जल्लोषपूर्ण वातावरणाने सर्वांनाच भारावून टाकले होते.

संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधण्याचे सामर्थ्य केवळ ‘राम’ या एका शब्दात आहे, याचा अनुभव साऱ्या जगाने त्या दिवशी घेतला. ‘धर्म’ ही अफूची गोळी आहे, असे म्हणणारे नतद्रष्ट आजही भारतात आहेत. ते प्रश्न उपस्थित करतात की, “राममंदिर बांधणे हे सरकारचे काम आहे का ?” जो ‘राम’ करोडो भारतीयांच्या मनात वास करतो, ज्या ‘राम’ या शब्दाच्या उच्चाराने नवी ऊर्जा निर्माण होते, मने प्रफुल्लित होतात, समाज संघटित होतो, त्या रामाचे मंदिर बांधणे हे सरकारचे कामच नव्हे तर कर्तव्य आहे, असे म्हटले पाहिजे.

मंदिर- सांस्कृतिक, सामाजिक ऐक्याचे प्रतिक

पाश्चात्य विचारांचा पगडा ज्यांच्यावर आहे ते मंदिराला उपासना स्थळ समजतात, पण मंदिरांकडे केवळ उपासना स्थळ म्हणून पाहणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. मंदिर हे सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचे प्रतिक आहे. दररोज लाखो रामभक्त राम मंदिराला भेट देत आहेत. कोण कुठल्या प्रांतातला, कुठल्या भाषेचा, कुठल्या जातीचा आहे हे कोणालाच माहिती नाही. सर्वजण केवळ ‘जय श्रीराम’ या जयघोषाने भारावलेले असतात. तेथे प्रत्येकाच्या हृदयात केवळ आणि केवळ फक्त ‘राम’च असतो. असंख्यांच्या मनातील भेदाची भावना क्षणार्धात नष्ट करणारे ‘राम’ हे केवळ आमचे दैवत नसून तो आमचा राष्ट्रपुरुष आहे. आपल्या राष्ट्रपुरुषाला भव्य मंदिरात विराजमान झालेला पाहणे, ही प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने निश्चितच अभिमानास्पद घटना आहे.

आपण परगावात गेल्यानंतर तेथे आपल्याला कोणी आपल्या गावातला भेटला, परप्रांतात आपल्या प्रांतातला भेटला किंवा परदेशात आपल्या देशातला भेटला की चेहऱ्यावर स्मितरेषा उमटते. तिथे ‘आपला’ हा एक भाव आत्मीयतेचे नाते जोडत असतो. मंदिरात येण्याने आपण एकाच भगवंताचे भक्त आहोत हा आत्मीयतेचा भाव समाजात जागृत होत असतो. म्हणून तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

काँग्रेसचा आजपर्यंतचा इतिहास असा आहे की, त्यांनी नेहमी हिंदू विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांचा राम मंदिराला विरोध असणे स्वाभाविक होते. सरकारने २०२४ ची निवडणूक समोर ठेवून २२ जानेवारीचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम ठेवला, मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले नसताना श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली हे चुकीचे केले, असा आरोप काँग्रेसने केला होता. यावर श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक आहे. ते म्हणाले की, “एखादी व्यक्ती अनेक वर्षे भाड्याच्या किंवा साध्या घरात रहात असेल आणि त्याने मोठा बंगला बांधायला घेतला असेल तर तो दोन चार खोल्या बांधून झाल्यावर तिथे लगेच रहायला जातो. बंगल्याचे बांधकाम पूर्ण होण्याची वाट पहात बसत नाही. बाकी बांधकाम नंतर होत राहील असे तो म्हणतो. आमचे प्रभू श्रीराम तर पाचशे वर्षे घराशिवाय होते. त्यामुळे स्वाभाविकपणे सर्व रामभक्तांची इच्छा असणार की प्रभू श्रीरामांनी लवकरात लवकर मंदिरात विराजमान व्हावे.”

राम मंदिर उद्ध्वस्त करून तेथे बाबराने मशीद उभी केली. पुन्हा त्या जागी मंदिर उभारण्यासाठी हिंदूंनी पाचशे वर्षे संघर्ष केला. लक्षावधी हिंदूंनी प्राणार्पण केले. ज्यांच्या डोक्यावर सर्वधर्मसमभाव या विचारांचे भूत स्वार आहे, ते म्हणतात की, “त्यांनी तेव्हा चूक केली म्हणून आपणही पुन्हा मंदिर बांधून तीच चूक करायची का ?” एक लक्षात घेतले पाहिजे की त्यांनी मंदिरे पडून त्याच जागेवर मशिदी का बांधल्या ? त्यांना अन्य जागेवर मशिदी बांधता येत नव्हत्या का ? पण त्यांना तुमच्या स्वाभिमानावर, तुमच्या अस्मितेवर आघात करायचा होता. आम्हाला आमचा स्वाभिमान परत मिळवायचा असेल तर पुन्हा त्या जागेवर मंदिर उभारण्याशिवाय पर्याय रहात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा समजले की, समेत्तिपेरूमलच्या मंदिराचे माशिदीत रुपांतर करण्यात आले आहे, तेव्हा त्यांना हिंदूंवर होणारा अन्याय सहन झाला नाही. त्यांनी ती मशीद पडून तेथे पुन्हा मंदिर उभारण्याची आज्ञा दिली होती.

भारतातील हजारो मंदिरे पडून मशिदी बनवण्यात आल्या आहेत. हिंदू समाज त्यातील केवळ तीन मंदिरांच्या जागा परत मागत आहे. हिंदूंच्या भावनांचा आदर करणे त्यांना जमत नसेल. ‘बाबरी थी, बाबरी है और बाबरी रहेगी’ अशी भाषा आणि हाच त्यांचा भाव असेल तर त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की, महाभारतात दुर्योधनाने सुद्धा अशीच भाषा वापरली होती आणि त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले होते.

समाजहिताची ज्यांना फार चिंता असते, त्यांचे म्हणणे असते की, मंदिराऐवजी हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय बांधावे. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, अयोध्येत राम मंदिर उभारले गेल्यामुळे तेथील अनेक क्षेत्रांना विकासाची द्वारे खुली झाली आहेत. अयोध्येचा एक रहिवासी वसईमध्ये नोकरी करीत होता. राम मंदिर बनणार हे समजल्यावर त्याने नोकरी सोडली. आता तो दोन वर्षांपासून अयोध्येत रिक्षा चालवत आहे. तो सांगतो, “२२ जानेवारीपासून माझी कमाई चांगलीच वाढली आहे. नोकरीत मिळवत होतो त्याच्या पाचपट उत्पन्न झाले आहे. नोकरीत असताना वर्षातून एक महिना घरी यायला मिळायचे. आता घरच्यांबरोबर राहून मी कमाई करू लगलो आहे.”

पर्यटनाच्या जागतिक नकाशावर

सन २०२१ मध्ये साधारण सव्वा तीन लाख लोक अयोध्येत आले होते. जी संख्या २०२२ मध्ये आश्चर्यकारकरित्या वाढून २.३९ कोटी झाली. नंतर २०२३ मध्ये ती संख्या वाढत ३१.५ कोटी झाली. त्यामुळे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्यातील सत्यता लक्षात येते, त्यांच्या म्हणण्यानुसार, “२२ जानेवारीला झालेल्या श्री रामलला प्राणप्रतिष्ठेनंतर पर्यटनाच्या जागतिक नकाशावर अयोध्या हे सर्वात विकसित व भव्य टूरिस्ट डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाणार आहे.”

अयोध्येतील राम मंदिरामुळे केवळ अयोध्येचीच नव्हे तर संपूर्ण देशाची प्रगतीच्या दिशेने होणारी घोडदौड आता कोणीही रोखू शकणार नाही. प्रत्येकाच्या हृदयात बसलेला राम म्हणजे जिथे राम आहे तिथे आनंद, समृद्धी आणि सामर्थ्य आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही.

मिलिंद शेटे
(लेखक सांस्कृतिक वार्तापत्र या पाक्षिकाचे संपादक आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख