Saturday, July 27, 2024

भारतभूमीने विश्वाला दिलेला उज्ज्वल प्रकाश : भगवान गौतम बुद्ध

Share

प्रज्ञा, करुणा आणि शील जगाला अर्पण करणाऱ्या महाकारुणी तथागत गौतम बुद्धांची आज जयंती. प्रत्येक सत्कर्मात त्यांच्या विचारांचा वारसा आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करू या…

गौतम बुद्ध हे दोन शब्द सिद्धार्थाचा ‘गौतमत्वा’पासून ‘बुद्धत्वा’पर्यंतचा प्रवास दर्शवितात. सिद्धार्थाचा ‘गौतमत्वापासून ‘बुद्धत्वा’च्या दिशेने झालेला जीवनप्रवास अत्यंत अलौकिक असा आहे. त्यांचा जीवनसंदेश हा मानवतेच्या कल्याणासाठी आहे.

एकदा भगवान गौतम बुद्ध नगर प्रदर्शन करता करता नदीकाठी आले. नदीपात्रात एक साधक आला. तो हात जोडून उभा होता. प्रथम तो त्या दिशेने पाण्याची उधळण करत नंतर अक्षता, गंध, फुलांची उधळण करत नंतर तो नमस्कार करे. बुद्धदेवांनी त्याला विचारले, “सन्मित्रा, तू काय करतो आहेस?” त्यावर तो साधक म्हणाला, “माझ्यावर संकटे येऊ नयेत म्हणून मी दिशांची पूजा करतो आहे. या पूजेमुळे माझ्यावर येणारे माझ्या पितरांचे अरिष्ट टळेल.” साधकाला उपदेश करताना बुद्धदेव म्हणाले, “सहाही दिशांकडून तुला अरिष्ट येऊ नये, असे जर वाटत असेल तर सभोवतालच्या मनुष्यांशी त्या नीतीने वर्तन करावे. आपल्या माता-पित्याशी खऱ्या पुत्रधर्माने वर्तन करावे. त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतील, असे वर्तन करू नये, म्हणजे तुला पूर्व दिशा पूजन केल्याचे पुण्य प्राप्त होईल. आपले जे गुरुजन आहेत, त्यांच्याशी शिष्यधर्माचे वर्तन करत यथोचित सन्मान करावा आणि गुरुदक्षिणा द्यावी, म्हणजे दक्षिण दिशा पूजन केल्याचे समाधान तुला मिळेल. आपल्या सुविद्य पत्नीशी, मुलांशी वात्सल्याने, मायेने वागावे. त्यांच्या इच्छा, आकांक्षा कर्तव्य कर्तव्य भावनेने पूर्णत्वास न्याव्यात. आपली कर्तव्य पार पाडावीत, म्हणजे तुला पश्चिम दिशा पूजन केल्याचे भाग्य पदरात पडेल. आपले पै-पाहुणे, सगेसोयरे, आप्तेष्ट, इष्टमित्र, नातेवाईक यांच्याशी मैत्रीपूर्ण, स्नेहपूर्ण वर्तन करत त्यांचा यथोचित सन्मान करावा आणि त्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊन जावे, म्हणजे तुला उत्तर दिशा पूजन केल्याचे पुण्यकर्म प्राप्त होऊ शकेल. जे धर्मशास्त्रात पारंगत आहेत, अशांशी सन्मानाने वागावे, म्हणजे स्वमध्यास पूजन केल्याचे भाग्य मिळेल. जे आपले सेवक आहेत, श्रमिक आहेत, दलित आहेत, वंचित आहेत, त्यांच्याशी कर्तव्य भावनेतून प्रेमभावे वागावे, म्हणजे अधोबिंदूस पूजन केल्याचे पुण्य प्राप्त होईल.” भगवान गौतम बुद्धांचा हा उपदेश मानवतेच्या कल्याणासाठी होता. मानवतेच्या सेवेसाठी होता. मनुष्याचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. भगवान बुद्धदेव हे मानवतेचे महान पुजारी होते.

भगवान गौतम बुद्धांनी यज्ञकांडातील प्रस्थापित व्यवस्थेला कडाडून विरोध केला. यज्ञयागाला विरोध करण्यामागे अनेक कारणे होती. यज्ञातील प्राणिहत्या त्यांना मान्य नव्हती. त्यांनी आपल्या बोधातून अहिंसेचा सातत्याने पुरस्कार केला. यज्ञकांडात होणाऱ्या पशुहत्येला विरोध, गोहत्येला विरोध करणारे, आंदोलन करणाऱ्या प्राचीन भारतीयांमध्ये, भगवान गौतम बुद्ध हे अग्रस्थानी होते. यज्ञयागात होणाऱ्या पशुहत्यांबद्दल ते आपल्या उपदेशात सांगत की, आपल्या माता, पिता, भाऊ, बहीण या आप्तेष्टांप्रमाणेच गाई-बैल हे गोवंश आपले परममित्र असतात, हे प्राणिमात्र बहुजन समाजजीवनातील महत्त्वाचे साथीदार आहेत. त्यांच्या अमानुष हत्या या समाजजीवनातील दैनंदिन अनेक गोष्टी हिरावून घेणाऱ्या आहेत. गोवंशापासून अनेक उपयुक्त औषधे निर्माण होतात. शेतीची कामे, दुग्धजन्य पदार्थ, शेणखते, गोमूत्र यासाठी गोवंशाची समृद्धी आवश्यक आहे. गोवंश ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ती जतन केली पाहिजे. ही त्यांची चिंतनशील विचारधारा होती. त्यांचा उपदेश वैज्ञानिक सिद्धतेवर आधारित होता. गोहत्या, गोवंशहत्या, पशुहत्या याला त्यांनी कडाडून विरोध केला. गोधनाप्रति त्यांची अपार करुणा होती.

भगवान गौतम बुद्धांनी स्त्री ही धर्माचरण करण्यास सर्वतोपरी योग्य असल्याचे सांगितले. स्त्रियांच्याप्रति असणारी गुलामगिरीची भावना, एका पुरुषाने अनेक स्त्रियांशी विवाह करण्याची पद्धत त्या काळात रूढ होती, ही पद्धत अनीतीची आहे, असे प्रथम गौतम बुद्धांनी प्रतिपादित केले. स्वतःस संमत असलेला धर्मपंथ इतरांनी स्वीकारावा असा उपदेश करत फिरण्याचे तत्त्व सर्व प्रथमतः गौतम बुद्धांनी सुरू केले. धर्मप्रचारकाची व्यवस्था करत स्वधर्म प्रचारास साहाय्यभूत होतील, अशा दोन संस्था स्थापित केल्या. एक देशोदेशी फिरून धर्मप्रचार करणाऱ्यांची, तर दुसरी धर्मानुयायी जनास वेळोवेळी धर्मोपदेश करून त्यांची स्वधर्मावरील श्रद्धा दृढ करणाऱ्या उपदेशकांची. त्यांनी धर्मप्रचारार्थ देशोदेशी फिरून धर्मोपदेश करणारी एक संघटनात्मक पद्धत रूढ केली. प्रचारक, विस्तारक, संघप्रमुख आणि असंख्य भिक्षूनी गौतम बुद्धांचा बुद्धसंदेश जगाच्या नकाशावर सर्वदूर नेला आणि गौतम बुद्धांच्या धम्माला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि धम्माला नैतिकतेचे आणि यथार्थ विद्येचे अधिष्ठान दिले. त्याचबरोबर समाजरचनेला नैतिक व ज्ञानमय धम्माचा पाया दिला. धम्म आचरणामुळे मानवी जीवन निरामय आणि आनंदमय होते, असा बुद्धसंदेश समाजजीवनाला दिला.

भगवान गौतम बुद्धांचा धर्माचा प्रचार आज सगळ्या विश्वात झालेला आपणांस पहावयांस मिळतो. तथागतांचा धम्म जगभरात पसरविण्याचे काम गेल्या अडीच हजार वर्षात असंख्य व्यक्तींनी केले आहे. सम्राट अशोकांनी आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना धम्मकार्यासाठी श्रीलंकेला पाठवले. ही भावंडे भारतात परत कधीच आली नाहीत. श्रीलंकेच्या समाजजीवनाशी एकरूप होत त्या भूमीत विलीन झाली. भारतात निर्माण झालेले बौद्ध वाङ्मयही श्रीलंकेत जपले गेले जगाला उपलब्ध होऊ शकले आणि भारताला परत मिळू शकले.

भारतभूमीत संपूर्ण विश्वातील मानवजातीला दिलेला सर्वात उज्ज्वल प्रकाश म्हणजे भगवान गौतम बुद्ध होय. मन, दया, समता, अहिंसा, प्रज्ञा, करुणा ही पंचशिले म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी मानवास दिलेली दैवी देणगी होय. जगातील पहिला विश्वव्यापक धर्म स्थापन करून साऱ्या विश्वाला शांतीचा, अहिंसेचा, करूणेचा बुद्ध संदेश दिला. बुद्धसंदेशाचे पालन करण्यातच मानवाची जीवनसफलता सामावलेली आहे. हे गौतम बुद्धांच्या उपदेशाचे सार आहे. भारताच्या इतिहासावर भगवान गौतम बुद्धांचा प्रचंड प्रभाव निर्माण झाला आहे.

सम्राट अशोकानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धदूत होऊन बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. डॉ. आंबेडकर यांनी आपल्या ‘दि बुद्ध अॅण्ड हिज धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत या प्रसंगाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून भगवान गौतम बुद्ध हे आपल्या जीवनाचे श्रद्धास्थान असल्याचे नमूद केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारण्याचे क्रांतिकारक पाऊल उचलले आणि आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. भारताचा भूमिपुत्र असलेल्या गौतम बुद्धाचा धर्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वव्यापक केला. भारतभूमीत भगवान गौतम बुद्ध जन्माला आले. त्याच पवित्र, पावनभूमीत आम्ही जन्माला आलो. याबद्दल आम्ही कृतकृत्य आहोत. बुद्धांचे सदेह पुनरागमन अशक्य आहे. परंतु बुद्ध विचारांना या भारतभूमीत ताजी कोवळी पालवी फुटावी आणि मोहरून, बहरून यावी, यासाठी बुद्ध होता आले नाही तरी बुद्धफुल होता येईल का, असा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. यासाठी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करावा लागेल. आज बुद्ध पौर्णिमा निमित्ताने गौतम बुद्धांना अभिवादन करताना त्यांच्या विचारातून काही शोध आणि बोध घ्यावा, हीच अपेक्षा.

बुद्ध सरणं गच्छामि।
धम्मं सरणं गच्छामि।
संघ सरणं गच्छामि।

नंदकुमार राऊत
(लेखक सामाजिक समरसता मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संयोजक असून विविध सामाजिक कार्यांमध्ये ते गेली पन्नास वर्षे सक्रिय आहेत. विविध प्रसारमाध्यमांमध्ये ते सातत्याने लेखन करतात, तसेच ते उत्तम व्याख्यातेही आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख