सातारा : “महाराष्ट्र ही संतांची आणि मंदिरांची पावन भूमी आहे. ज्यांनी गड-दुर्ग किंवा मंदिरांच्या भूमीवर अनधिकृत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना हे शासन सोडणार नाही. ज्या धडाडीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण हटवण्यात आले, त्याच पद्धतीने राज्यातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे बुलडोझर लावून नष्ट केली जातील,” असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने २२ मार्च रोजी साताऱ्यातील ऐतिहासिक ‘स्वराज सांस्कृतिक भवन’ येथे आयोजित ‘चतुर्थ महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी आणि एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ म्हणून आपले विचार मांडले. या परिषदेला राज्यातील १ हजार १०० हून अधिक मंदिरांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री गोगावले पुढे म्हणाले की, “आमच्यासाठी मंदिरांचे रक्षण करणे हे राजकारण नसून तो आमच्या धर्म आणि श्रद्धेचा विषय आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला देव आणि देशासाठी कधीही तडजोड न करण्याची शिकवण दिली आहे. देवस्थानच्या जमिनींचा वापर केवळ देवकार्यासाठीच व्हावा, अशा स्पष्ट सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत.”
राज्याच्या वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने:
राज्यातील ५ ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी आणि समन्वयक नियुक्त केले आहेत.
५० निवडक धार्मिक स्थळांच्या आधुनिकीकरणासाठी ‘प्रादेशिक पर्यटन विकास योजने’तून निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंदिरांच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन भाविकांची गैरसोय दूर करण्याचा शासनाचा मानस आहे.
या परिषदेमुळे राज्यातील मंदिर विश्वस्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मंदिरांच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करण्यात येत आहे.