Friday, September 13, 2024

महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेला ‘भटकता आत्मा’

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत त्यांच्या भाषणामध्ये `महाराष्ट्रातील भटकता आत्मा’ असा एक उल्लेख केला. इच्छा अपूर्ण राहिल्या की, आत्मे भटकत राहतात, असे मोदी उपरोधाने म्हणाले होते. या भटकत्या आत्म्याने महाराष्ट्राचे राजकारण प्रदीर्घ काळ अस्थिर करून ठेवले, असा मोदी यांच्या टीकेचा रोख होता.

मोदी यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी ‘चोराच्या मनात चांदणे’ या न्यायाने शरद पवार यांचे बहुसंख्य अनुयायी चवताळले दिसतात. चवताळून त्यांनी मोदी यांच्यावर टीका करताना ताळतंत्र सोडला आहे. त्यांच्या प्रतिक्रियांवरून मोदी यांचा बाण वर्मी लागल्याचे दिसून येते. मोदी यांच्या वक्तव्यावरून शरदरावाविषयी सहानुभूति निर्माण करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. चिडचिड, त्रागा, वैफल्य, वगैरे भावनानी पछाडलेल्या शरद पवार यांचे अनुयायी मोदी यांच्यामुळे अजुनच सैरभर झालेले दिसतात. वास्तव असे आहे की, अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार स्वत: आणि त्यांचे बचेकूचे अनुयायी अजूनही सावरलेले नाहीत. भरीत भर म्हणून सुप्रिया सुळे यांच्यासमोर राजकीय अस्तितवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. साहजिकच अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या चाहत्यांकडून विवेकनिष्ठ परिक्षणाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

प्रश्न साधा आहे. मोदी चुकीचे काय बोलले? शरद पवारांचे अंधभक्त मान्य करणार नाहीत, परंतु, वास्तव असेच आहे की, शरद पवार यांनी महाराष्ट्राचे राजकारण स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी तब्बल ४६ वर्षे वेठीस धरले आहे. पवार प्रथम १९७८ मधे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘पाठीत खंजीर खुपसणे’ या म्हणीचा वापर होऊ लागला. शरद पवार यांनी कितीही आणि काहीही सांगितले तरी वसंतदादांसारख्या ज्येष्ठ नेत्याला धोबीपछाड देण्यामागे पवार यांची राजकीय मत्वाकांक्षा होती, हे उघडे नागडे सत्य आहे. किंबहुना या एकाच खेळीमुळे पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेपुढे आयुष्यभर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या एकाच खेळीमुळे पवार त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण करू शकले नाहीत. शरदरावांचे स्वप्न हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक टिंगलीचा विषय बनला आहे. या टिंगलीमुळे मतदार त्यांना एक राजकीय नेता म्हणून गंभीरपणे बघत नाहीत. जो माणूस वसंतदादां सारख्या ज्येष्ठ आणि पित्यासमान नेत्याशी गद्दारी करतो, त्याच्यावर सर्वसाधारण कार्यकर्त्याने आणि पक्ष नेत्यांनी विश्वास ठेवावा, अशी अपेक्षा करणे म्हणजे त्यांचा उपमर्द केल्यासारखेच आहे.

पवार यांच्यानंतर महाराष्ट्राने कॉँग्रेसचे तब्बल १४ मुख्यमंत्री झाले. त्यातील काही पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या साथीने झाले. त्यांची यादी बघितली आणि तेव्हाची वृत्तपत्रे वाचली तरी मोदींच्या विधानातील सत्यता दिसून येईल. पवार यांच्यानंतर झालेले मुख्यमंत्री असे – ए आर अंतुले, बाबासाहेब भोसले,वसंतदादा पाटील, शिवाजीराव निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार, सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण.

यातील सर्वात मुख्य बाब अशी की, यातील एकाही मुख्यमंत्र्याने आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला नाही. याचे एक आणि केवळ एकमेव कारण म्हणजे पवार यांनी कधीही त्यांच्या प्रतिस्पर्धी नेत्याला सुखाने राज्य करू दिले नाही. शंकरराव चव्हाण यांचा अपमान करण्याची एकही संधी पवार यांनी सोडली नाही. सुशीलकूमार आणि शरदराव यांनी आज कितीही एकमेकाच्या गळ्यात गळे घातले, तरीही त्यांनी एकमेकविरुद्ध केलेल्या कुरघोड्या सर्वांना ज्ञात आहेत. सुधाकर नाईक यांना मुख्यमंत्रिपदावरून हाकलून देण्यासाठी पवार समर्थक आमदारांनी पक्ष बैठकीत केलेली मारामारी महाराष्ट्र विसरलेला नाही. अगदी अलीकडे पृथ्वीराज चव्हाण यांना कोणी अडथळे निर्माण केले याचाही महाराष्ट्र साक्षीदार आहे. पृथ्वीराजबाबा स्वत: याबाबतचे अनेक किस्से सांगतात आणि ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत.

१९९४ ला कॉँग्रेसचा पराभव होऊन प्रथमच बिगर कॉंग्रेस सरकार सत्तेवर आले. यामागे पवार यांचेच कुकर्तुत्व कारणीभूत होते. भाजपने त्याचा पुरेपूर फायदा घेऊन पवार यांना पहिल्यांदा जोरदार दणका दिला. राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतरसुद्धा आपल्याच पक्षातील नेता मोठा होऊ नये म्हणून कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपद बहाल करणारे शरदरावच होते.

राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर पवार यांची पंतप्रधानपदाची आकांक्षा जागी झाली. वास्तविक, हा एक मोठा विनोदच होता. तथापि कायमच टाळकरी आणि झेलकऱ्यांनी वेढलेल्या शरदरावाना वास्तवतेची कधीच जाणीव झाली नाही. पवार यांच्या राष्ट्रीय महत्वकांक्षेला तत्कालीन राजकीय समीकरणे किंवा परिस्थिति कारणीभूत नव्हती. गुजराल, देवेगौडा या सारख्या दुय्यम नेत्यांना पंतप्रधानपदाची संधी अपघाताने मिळाल्यामुळे पवारांची महत्वकांक्षा प्रदीर्घ काळ जागी राहिली. परंतु पवार यांच्यावर दिल्लीतील नेत्यांचा मुळीच विश्वास नव्हता. त्यामुळेच त्यांच्या बरोबर कोणीही गेले नाही. शरदराव कायमच दिल्लीस्थित नेत्यांच्या काळ्या यादीत राहिले. राजीव गांधी यांच्यासारख्या नवख्या नेत्यानेसुद्धा शरदरावाना त्यांचा समाजवादी कॉँग्रेस पक्ष कॉँग्रेसमधे विलिन करण्यापासून प्रदीर्घ काळ ताटकळत ठेवले होते. राजीव गांधीसुद्धा पवार यांच्यावर सहजासहजी विश्वास ठेवायला तयार नव्हते. पवार यांना केंद्रातील मंत्रीपदावरून परत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पाठविले. यामागे बॉम्बस्फोटाचे कारण सांगितले जाते. मात्र पवार यांना त्यांची जागा दाखविण्याचा तो एक भाग होता. पवार यांना या खेळीद्वारे राष्ट्रीय राजकारणापासून अलगद दूर केले गेले.

शरदरवाना आज त्यानीच जोपासलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात स्वत:च्या मुलीसाठी घरोघर उंबरठे झिजवावे लागत आहेत. आयुष्यभर वैर धरलेल्या नेत्यांच्या घरी जाऊन लेकीसाठी त्यांचे पाय धरावे लागत आहेत. आयुष्याच्या या काळखंडात शरदरावर ही परिस्थिती उद्भवली. याला ते स्वत:च जबाबदार आहेत. मात्र पवार आणि त्यांचे अनुयायी याचे कधीही आत्मपरीक्षण करणार नाहीत. त्यांच्या मते महाराष्ट्राचे राजकारण पवार यांच्याजवळच सुरू होते आणि त्यांच्याजवळच संपते. वास्तविक तशी परिस्थिति कधीच नव्हती. पवार तांच्या तथाकथित प्रभावाचा फुगा गेल्या पाच दशकात अनेक वेळा फुटला आहे. पवार स्वत:च्या बळावर महाराष्ट्रात कधीही सरकार स्थापन करू शकले नाही. किंबहुना त्यांना मराठी माणसाने तेवढी कधी ही भरभरून साथ दिली नाही. शरदरावांच्या चाहत्यांनी ही बाब कधीच लक्षात घेतली नाही. पवार यांनी स्वत:च एका मोठ्या टोळीचे प्रमुख राहणे पसंत केले. त्यांच्या राजकारणाच्या याच मर्यादा होत्या आणि आहेत.

सत्यजीत जोशी
(लेखक जेष्ठ पत्रकार आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख