Thursday, October 10, 2024

राज्य विधानसभा निवडणुकीत १६० जागा लढवण्याची भाजपाची तयारी

Share

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपानं १६० जागा लढवाव्या. त्यातल्या किमान १२५ जागा
जिंकण्याचं उद्दिष्ट पक्षानं ठेवावं यावर भाजपाच्या कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्तसंस्थेच्या
बातमीत म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री मुंबईत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची
बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेते या
बैठकीला उपस्थित होते.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी जागावाटपाची अनौपचारिक चर्चा सुरू झाली आहे. पण
त्यांना ७० हून अधिक जागा देण्यासंबधी निर्णय काळजीपूर्वक घ्यावा, अशी अपेक्षा राज्यातल्या
नेत्यांनी व्यक्त केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणि जिंकून येण्याची क्षमता
पाहूनच त्यांना जागा द्याव्यात, अशी चर्चा यावेळी झाली.

लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या चुका लक्षात घेऊन ही निवडणूक महायुतीमधल्या पक्षांनी
एकत्रितरित्या लढवावी. त्यात भाजपाची ‘मोठ्या भावाची’ भूमिका असावी, याचा पुनरुच्चार भाजपाच्या
नेत्यांनी अमित शहा यांच्यासमोर केला. एकमेकांवर सार्वजनिकरित्या टीका टाळण्याचा सल्ला अमित
शहा यांनी राज्यातल्या नेत्यांना दिल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.

अन्य लेख

संबंधित लेख