Sunday, August 16, 2026

क्रिकेटचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू हरपला – सर गॅरी सोबर्स यांना श्रद्धांजली

Share

१७ जुलै २०२६ रोजी क्रिकेट जगताने आपल्या इतिहासातील अत्यंत प्रतिभावान आणि अष्टपैलू खेळाडूला गमावले. वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर गारफिल्ड सोबर्स (सर गॅरी सोबर्स) यांचे वयाच्या ८९व्या वर्षी बार्बाडोस येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. येत्या २८ जुलै रोजी त्यांचा ९० वा वाढदिवस होता. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी प्रस्थापित केलेले निकष आजही जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोच्च मानले जातात.

प्रतिकूल बालपण आणि प्रखर संघर्ष
गारफिल्ड सोबर्स यांचा जन्म २८ जुलै १९३६ रोजी बार्बाडोसच्या सेंट मायकेल येथील एका अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत असलेल्या कुटुंबात झाला. ते त्यांच्या आई-वडिलांच्या सात मुलांपैकी सहावे अपत्य होते. ते अवघे पाच वर्षांचे असताना, त्यांचे वडील शमॉन्ट सोबर्स हे कॅनेडियन व्यापारी जहाजावर खलाशी म्हणून काम करत असताना, द्वितीय महायुद्धा दरम्यान जानेवारी १९४२ मध्ये त्यांच्या जहाजावर जर्मन यू-बोटने केलेल्या टॉर्पेडो हल्ल्यात मरण पावले. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्यांच्या आईने, थेलमा सोबर्स यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत गॅरी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ केला.

या अत्यंत गरिबीमुळे सोबर्स यांना बालपणी खेळाचे साहित्य खरेदी करणे शक्य नव्हते. गल्ली क्रिकेट खेळताना ते नारळाच्या झावळ्या किंवा लाकडी कुंपणाचे फळके बॅट म्हणून वापरत. तसेच, दगडावर चिंध्या गुंडाळून आणि त्यावर डांबर लावून तयार केलेल्या चेंडूने ते तासनतास सराव करत असत. केवळ खेळावरील प्रचंड निष्ठा आणि अफाट आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली.

प्रारंभिक क्रिकेट कारकीर्द आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण
सोबर्स यांच्यातील क्रीडा गुणवत्ता लहान वयातच दिसून आली होती. फुटबॉल, बास्केटबॉल आणि क्रिकेट अशा विविध खेळांमध्ये ते अत्यंत निष्णात होते. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्यांना स्थानिक क्रिकेट क्लब ‘केंट सेंट फिलिप’ आणि ‘वॉन्डरर्स’ कडून खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर वयाच्या १५ व्या वर्षी ते बार्बाडोस पोलीस संघाकडून खेळू लागले. वयाच्या १६ व्या वर्षी, म्हणजे १९५३ मध्ये, त्यांनी बार्बाडोस संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून पदार्पण केले.

त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर पुढील वर्षी, मार्च १९५४ मध्ये, वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी लेंन हटन यांच्या बलाढ्य इंग्लंड संघाविरुद्ध किंग्स्टन येथे कसोटी पदार्पण केले. आजारी असलेले खेळाडू अल्फ व्हॅलेंटाईन यांच्या जागी संघात समाविष्ट झालेल्या सोबर्स यांनी पदार्पणाच्या सामन्यात चार बळी घेत आणि उपयुक्त फलंदाजी करत आपल्या अष्टपैलू कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली.

खराखुरा अष्टपैलू खेळाडू
गॅरी सोबर्स यांना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात ‘परिपूर्ण खेळाडू’ मानले जाण्यामागे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांतील त्यांचे अफाट प्राविण्य कारणीभूत आहे. सुरुवातीला डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करत चेंडू हवेत अत्यंत वेगाने स्विंग करण्याची त्यांची क्षमता फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत असे. डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स स्पिन, डाव्या हाताने मनगटाच्या साहाय्याने टाकली जाणारी चायनामॅन स्पिन गोलंदाजी करण्यात ते अतिशय पटाईत होते. गोलंदाज म्हणून त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये २३५ गडी बाद केले आहेत.

क्षेत्ररक्षणातही सोबर्स यांची चपळाई चित्त्यासारखी होती. स्लिप किंवा शॉर्ट-लेग सारख्या फलंदाजाच्या अत्यंत जवळच्या आणि धोकादायक क्षेत्ररक्षण स्थानांवर उभे राहून त्यांनी अशक्य वाटणारे १०९ झेल अत्यंत सहजतेने टिपले. सोबर्स यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ९३ सामने खेळले. यामध्ये फलंदाज म्हणून त्यांनी ५७ पेक्षा जास्तच्या प्रभावी सरासरीने ८,०३२ धावा केल्या. त्यांच्या या धावसंख्येमध्ये २६ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे.

प्रथम श्रेणीतील क्रिकेट सामन्यातील कर्तबगारी
फलंदाजी : ३८३ सामन्यांत तब्बल २८,३१४ धावा; ज्यामध्ये ८६ शतके आणि १२१ अर्धशतके

गोलंदाजी : १,०४३ बळी मिळवले आहेत.

क्षेत्ररक्षण : ४०५ झेल टिपले आहेत.

३१ ऑगस्ट १९६८ रोजी नॉटिंग हॅमशायरकडून खेळताना ग्लॅमॉर्गनच्या माल्कम नॅशविरुद्ध सोबर्स यांनी एकाच षटकात ६ चेंडूंवर ६ षटकार मारण्याचा अद्भुत पराक्रम केला.

एकदिवसीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात, त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ १ सामना खेळला, ज्यामध्ये त्यांनी १ बळी घेतला आणि १ झेल टिपला.

पाकिस्तानविरुद्ध ३६५ धावांची नाबाद खेळी
१९५८ मध्ये किंग्स्टन येथे पाकिस्तानविरुद्ध खेळताना अवघ्या २१ वर्षांच्या गॅरी सोबर्स यांनी नाबाद ३६५ धावांची महाकाय ऐतिहासिक खेळी साकारली. हे त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक होते, ज्याचे त्यांनी थेट विश्वविक्रमी त्रिशतकात रूपांतर केले. त्यांनी इंग्लंडच्या लेन हटन यांचा ३६४ धावांचा २० वर्षे जुना जागतिक विक्रम मोडीत काढला. हा जागतिक विक्रम तब्बल ३६ वर्षे अबाधित होता, जो अखेर १९९४ मध्ये वेस्ट इंडिजच्याच ब्रायन लाराने ३७५ धावा करून मोडला.

जागतिक बहुमान
क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना जगभरातून अनेक सर्वोच्च नागरी आणि क्रीडा सन्मान बहाल करण्यात आले.

१९७५ – इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते ‘सर’ हा नाईटहूड सन्मान बहाल

१९९८ – बार्बाडोस सरकारच्या ११ राष्ट्रीय नायकांपैकी एक म्हणून घोषित

२००० – ‘विजडन क्रिकेटर ऑफ द सेंचुरी’ म्हणून निवड

२००४ – आयसीसी तर्फे ‘सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी’ या नावाने  वर्षातील ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटू’साठी पुरस्कार सुरू

भावपूर्ण श्रद्धांजली
गॅरी सोबर्स हे केवळ विक्रमांचे बादशाह नव्हते, तर क्रिकेटमधील सर्वांगीण कौशल्याचे प्रतीक होते.  त्यांच्या निधनानंतर केवळ कॅरेबियन देशांतच नव्हे, तर जगभरातील क्रीडा वर्तुळात प्रचंड शोककळा पसरली असून, क्रिकेट वेस्ट इंडिज आणि जगातील विविध देशांच्या क्रिकेट बोर्डांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या तिन्ही भूमिकांमध्ये त्यांनी निर्माण केलेले आदर्श आजही जगभरातील क्रिकेटपटूंना प्रेरणा देतात. त्यांच्या निधनाने क्रिकेटने एक महान खेळाडू गमावला, तरी त्यांचा वारसा अजरामर राहील.

अन्य लेख

संबंधित लेख