Saturday, July 27, 2024

स्मरण भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे

Share

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आज १६६ वी जयंती. पुण्यातील हिंगण्याच्या माळावर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रूपाने उभे असलेले आणि हजारो मुलींना शिक्षणातून आत्मनिर्भर करणारे त्यांचे स्मारक सर्वांना प्रेरणा देत आहे.

१९ व्या शतकाच्या अखेरीला म्हणजे दि. १४ जून १८९६ या दिवशी एका ३८ वर्षीय तरुण प्राध्यापकाने पुण्यात एका क्रांतिकार्याचा श्रीगणेशा केला. गणित विषयाच्या या प्राध्यापकाने केवळ अभ्यासक्रमातील गणितेच सोडविली असे नाही, तर तत्कालीन समाजातील विधवा बालिकांच्या हालाखीचे अत्यंत क्लिष्ट गणित ‘आधी केले, मग सांगितले’ या सूत्राच्या आधारे त्याने सोडवून दाखविले. अर्थात, बालविधवांना अजिबात सन्मान नसण्याच्या त्या काळात एका विधवेशी स्वत: विधिवत् पुनर्विवाह करून मग त्याने विधवा बालिकांचे अवघड गणित सोडवायला घेतले; म्हणजेच ‘अनाथ बलिकाश्रम’ या एका आगळ्या-वेगळ्या संस्थेची स्थापना या तरुण प्राध्यापकाने त्या दिवशी केली. भारताच्या इतिहासात या प्राध्यापकाची ओळख ‘भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे’ अशी आहे आणि त्यांनी त्या काळी सुरू झालेल्या ‘अनाथ बालिकाश्रम’ने आज ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ या नावाने आपल्या कार्याची १२७ वर्षे पूर्ण केली आहेत.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती: सामान्यत: अण्णा या घरगुती नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महर्षींचा जन्म दि. १८ एप्रिल १८५८ रोजी रत्‍नागिरी जिल्ह्यात मुरुड या गावी झाला. आपल्या शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. वर्ष १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.

Dhondo Keshav Karve

अण्णासाहेबांचे धाडस
बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन अशा घातक परंपरांनी त्या काळी कितीतरी मुलींच्या आयुष्याचे अक्षरश: मातेरे केले. त्यात असल्या परंपरांना धार्मिक आधार दाखवले की त्याबद्दल बोलताना भल्याभल्यांची वाणी निष्प्रभ होई; कारण या अन्यायाबद्दल काही बोलले की तो ठरणार पाखंडी – मग निंदा-नालस्ती, सामाजिक बहिष्कार हे ‘दगड-धोंडे’ आहेतच. नुसते बोलण्याची सुद्धा मारामार, मग कृती कोण करणार ? अशा वातावरणात सुधारकी विचार मांडून त्याप्रमाणे कृती करण्याला प्रचंड धाडसाची आणि कार्यातील सातत्याची आवश्यकता असते. हे धाडस अण्णासाहेब कर्वे यांनी केले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला होता. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७ व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. चिरंजीव रघुनाथ (प्रसिद्ध समाजसुधारक र. धों. कर्वे) यांच्या पालन-पोषणासाठी अण्णांनी दुसरा विवाह करावा असे सर्वच सुहृदांचे मत पडले. या प्रसंगी अण्णांनी एखाद्या विधवेशीच पुनर्विवाह करण्याचा निश्चय केला आणि पुढे आपल्याच एका मित्राची बालविधवा बहीण आनंदी तथा बाया यांच्याशी त्यांनी विवाह केलासुद्धा. तत्कालीन समाजासाठी हा मोठा धक्का होता.

ते व त्यांच्या पत्नी आनंदीबाई तथा बाया – या दोघांनीही आपल्या पुनर्विवाहामुळे समाजाकडून कटू निंदानालस्ती सहन केली, बहिष्कार अंगावर घेतले. मात्र हाती घेतलेले कार्य जराही क्षीण होऊ दिले नाही. उलटपक्षी, अनेक नवनवे सहकारी या कामी कौशल्याने जोडून घेत या कार्याचा मोठा विस्तार पुढे घडवून आणला. अनाथ आणि असहाय्य मुलींसाठी या दांपत्याने आपले सर्वस्व उधळून दिले.

कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना
सुरुवातीला पुणे शहरात स्थापन झालेला हा आश्रम पुढे – प्लेग साथीमुळे – हिंगण्याच्या माळरानावर रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी दान दिलेल्या जमिनीवर एका छोट्याश्या झोपडीत स्थलांतरित झाला. प्रथम ‘अनाथ बालिकाश्रम’, नंतर ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्था’ आणि नंतर ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ अशी संस्थेची नामाभिधाने बदलत गेली; अर्थात मूळ उद्देश तोच ठेवून, किंबहुना त्याचा काळानुरूप विस्तार करून !

Maharshi Karve Stree Shikshan Sanstha

सामान्यत: कुठल्याही कार्याचा प्रारंभ होत असताना उत्साह अधिक असतो. संवेदना तीव्र असतात. पण जसजसा काळ पुढे जाऊ लागतो तसे वास्तवाचे चटके बसु लागल्याने उत्साह कमी होत जातो, संवेदना बोथट होत जातात. प्रारंभी हाती घेतलेल्या कामाचा आकार हळूहळू आकुंचित होऊ लागतो. पण महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेली ही संस्था मात्र याला अपवाद ठरली. केवळ चार बालिकांपासून सुरू झालेला हा आश्रम आज ३०,००० हून अधिक बलिकांना एकावेळी सामावून घेण्याच्या क्षमतेचा बनलेला आहे. आजवर लाखो मुली येथून आत्मनिर्भर होऊन बाहेर पडल्या असून समाजाच्या विभिन्न क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा
उमटविला आहे.

भाऊबीज-निधीची अभिनव योजना
संस्थेत शिक्षण घेणाऱ्या बऱ्याच मुली सामान्य आर्थिक स्तरांतून येतात. आर्थिक अडचणीमुळे कुठलीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा तर संस्थेचा मूलमंत्र आहे. मग अशा गरजू मुलींचा शैक्षणिक खर्च भागावा कसा ? या गोष्टीचाही विचार संस्थेच्या तत्कालीन धुरीणांनी करून ठेवला होता; केवळ विचारच नव्हे तर या विचाराच्या पाठीशी एका समर्थ योजनेचे पाठबळ त्या वेळी उभे केले गेले. ‘आपल्या रक्ताच्या बहिणीखेरीज अन्य किमान एका बहिणीला भाऊबीज द्यायची’ असे जर सर्व भावांनी ठरवले तर ही गरज भागू शकेल, असा विचार संस्थेचे तत्कालीन आजन्म सेवक स्व. गो. म. चिपळूणकर यांनी १९१९ मध्ये मांडला; आणि मग सुरू झाली भाऊबीज-निधीची एक अभिनव योजना, जी गेली १०० वर्षे नियमितपणे चालू आहे. भाऊबीजेचा हा निधी जमविण्यात अनेक देणगीदार आणि स्वयंसेवकांनी सातत्याने हातभार लावला. नियमितपणे आणि श्रद्धेने प्रति वर्षी आपली भाऊबीज देणारे असंख्य लोक संस्थेशी जोडले गेले. या भाऊबीजेतून हजारो बहिणी सक्षम झाल्या.

कौशल्य विकासाचा प्रारंभ
‘कौशल्य विकास’ हा अलीकडचा शब्द वाटत असला तरी कर्वे संस्थेने १९७९ साली ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत ‘संपदा बेकरी’ची सुरुवात करून त्या काळी कौशल्य-विकास साधला होता. ही एक विलक्षण उत्क्रांती होती. हीच उत्क्रांती पुढेही सातत्याने होत राहिली. सन १८९६ ते १९९० पर्यंत पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व अध्यापक विद्यालय येथवर असलेल्या मर्यादा संस्थेने १९९० मध्ये श्री सिध्दीविनायक महिला महाविद्यालयाची स्थापना करून ओलांडल्या. त्यानंतर उच्च शिक्षणांतर्गत अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, व्यवस्थापन, माहिती/तंत्रज्ञान, व्यवसाय प्रशिक्षण, कौशल्य विकास, परिचारिका, प्रशिक्षण, अध्यापिका प्रशिक्षण अशा सर्व शाखांमध्ये संस्थेच्या नामांकित शाळा व महाविद्यालये यांच्या रूपात संस्था विस्तारतच गेली. आज पुणे, सातारा, वाई, नागपूर, रत्नागिरी व कामशेत या ठिकाणी एकूण ७४ शाखा सर्व स्तरांतील महिलांसाठी कार्यरत आहेत. आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना सक्षम करण्यासाठी दहावी-बारावीनंतर करता येतील, असे विविध अभ्यासक्रमही संस्थेत उपलब्ध आहेत.

संस्थेमार्फत पुण्यात विद्यार्थिनी, नोकरदार महिलांसाठी विविध वसतिगृहे चालविली जातात. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी ‘बाया कर्वे’ पुरस्कार दिला जातो. आजवर डॉ. मंदा आमटे, नसिमा हुरजूक, रेणू दांडेकर, गंगुताई पटवर्धन, सिंधुताई अंबिके, स्मिता कोल्हे, जया मोयोंग, किलांबी पंकजा वल्ली इ. राष्ट्रीय स्तरावरील कर्तृत्ववान स्त्रियांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल संस्थेलाही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

एकीकडे मोठ्या प्रमाणावर कार्यविस्तार होत असताना संस्थेची मूळ उद्दिष्टे आणि मूल्ये अढळ राखण्यात सर्व काळांतील संस्थेचे पदाधिकारी/संचालक यांचे मोठेच योगदान आहे. या अविचल ध्येयनिष्ठेमुळेच नवनवीन प्रकल्प उभे करण्यासाठी अनेक देणगीदारांचा सहयोग सातत्याने मिळाला. आजच्या काळातही स्त्रीच्या सर्व समस्या संपल्या आहेत असे नाही. सामान्य स्तरातील स्त्रीची अनेक शैक्षणिक स्वप्ने अद्याप पूर्ण व्हायची आहेत. ती जोवर पूर्ण होत नाहीत, तोवर महर्षी कर्वे यांचे स्वप्न पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही. या कार्यासाठी संस्था तर कटिबद्ध आहेच. पण आपला वेळ, बुद्धिमत्ता, निधी अशा माध्यमातून या सत्कार्याशी जोडून घेण्याचे काम तर सर्वच जण करु शकतात.

आज महर्षी कर्वे हयात नाहीत, पण हिंगण्याच्या माळावर संस्थेच्या रूपाने उभे असलेले आणि हजारो मुलींना शिक्षणातून आत्मनिर्भर करणारे त्यांचे स्मारक आजही सर्वांना प्रेरणा देत आहे. आज महर्षी कर्वे यांच्या १६६ व्या जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.

महेंद्र वाघ
(लेखक कवी, गीतकार असून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये सामग्री लेखक म्हणून ते काम करतात.)

अन्य लेख

संबंधित लेख