Saturday, July 27, 2024

डॉ. आंबेडकरांचा विचार वारसा नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी ‘सिग्नेचर पेन’

Share

‘पेन म्हणजे लेखणी हे सर्वांत मोठे शस्त्र आहे. स्वतः डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत विपुल लेखन केले. आज लेखनाची माध्यमे बदलली असली, तरी कागदावर पेनने लिहिणे ही आजही एक विशेष आनंद व समाधान देणारी गोष्ट आहे. हे लक्षात घेऊन डिक्कीच्या माध्यमातूनही बाबासाहेबांच्या सिग्नेचर पेनचा आणि त्यामागील विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे मनोगत दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून पुण्यातील ‘रायटिंग वंडर्स’ या संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेल्या विशेष पेनची निर्मिती करण्यात आली आहे. या सिग्नेचर एडिशनचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, रायटिंग वंडर्सचे सुरेंद्र करमचंदानी, डिक्कीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव विजय खरे, रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सदस्य ॲड. मंदार जोशी व प्रमोद करमचंदानी, मनोज खत्री यांच्या हस्ते पुण्यात झाले. याप्रसंगी आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या विशेष कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या विशेष पेनने स्वाक्षरी करून या पेनचे औपचारिक अनावरण केले.

विकसित भारतासाठी प्रेरणा मिळेल
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मौलिक विचारांचा वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वाचनाप्रमाणेच लेखन संस्कृतीच्या प्रसारासाठीही डॉ. बाबासाहेबांच्या सिग्नेचर एडिशन पेनचे विशेष महत्त्व आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले. नव्या शैक्षणिक धोरणातील विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी या उपक्रमातून प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या सिग्नेचर एडिशन पेनसाठी उच्च दर्जाच्या प्रिमिअम जर्मन रिफीलचा वापर करण्यात आला आहे. त्याला दोन टोन मेटल बाॅडी असून डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा आणि स्वाक्षरी या पेनवर कलात्मक पद्धतीने कोरली आहे. हे पेन ४५० रुपयांत तर डायरी २८० रुपयांत उपलब्ध करण्यात आली आहे. डायरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संक्षिप्त चरित्र आणि छायाचित्र आहे. हे विशेष पेन आणि डायरी एका सुंदर गिफ्ट सेटमध्ये देखील उपलब्ध असेल, अशी माहिती सुरेंद्र करमचंदानी यांनी दिली.

परशुराम वाडेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीचा अमृत महोत्सव नजिक आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सिग्नेचर एडिशन पेनची निर्मिती महत्त्वाची आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जावे.

डॉ. विजय खरे यांनी ‘नव्या पिढीसमोर बाबासाहेबांचे सर्व साहित्य तर उपलब्ध आहेच, आता सिग्नेचर एडिशनच्या रूपाने त्यांच्या लेखणीचा आदर्शही समोर ठेवता येणार असल्याचे सांगितले. ॲड. मंदार जोशी यांनी प्रज्ञासूर्य बाबासाहेबांच्या वैचारिक वारशाचे जतन आणि प्रसार होण्यासाठी या सिग्नेचर एडिशन पेनचे साह्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले.

प्रतिनिधी

(महाराष्ट्र नॉलेज सेंटर)

अन्य लेख

संबंधित लेख