Wednesday, August 13, 2025

‘संस्कृतला केवळ राजाश्रय नव्हे तर जनाश्रयही मिळावा’ – डॉ. मोहन भागवत

Share

भारताने आपल्या सामर्थ्यावर प्रगती साधली पाहिजे. सर्व प्रकारच्या शक्तींनी आपण समृध्द व्हायला हवे. पण, जर आपण आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आहे, तर आधी आपलं ‘स्व’ पूर्णपणे ओळखणं आवश्यक आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हणलं आहे. सध्याच्या परिस्थिती आणि देशाचं नेतृत्व हे स्पष्टपणे सूचित करत आहे की, आता भारताने आत्मनिर्भर व्हायला हवं.

सरसंघचालक डॉ. भागवत रामटेक येथील कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वारंगा येथील अभिनव भारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुलात डॉ. केशव बळिराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कुलगुरु डॉ. हरेराम त्रिपाठी, माजी कुलगुरु डॉ. पंकज चांदे, डॉ. उमा वैद्य आणि संचालक कृष्णकुमार पांडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सरसंघचालक म्हणाले की, जिथे स्वत्व असतं तिथे बल, शक्ती आणि लक्ष्मी यांचं वास्तव्य असतं. पण जिथे स्वत्व नसेल, तिथे बलही नष्ट होतं. आत्मनिर्भरता आल्यावर बल, शक्ती आणि लक्ष्मी आपोआप येतात. भारताची परंपरा अतिशय प्राचीन आहे. इ.स. १ ते १६०० या काळात भारत जगात सर्वात पुढे होता. कारण आपण आपल्या स्वत्वावर ठाम होतो. पण जेव्हा आपण ते विसरायला लागलो, तेव्हा आपली अधोगती सुरू झाली आणि आपण परकीय आक्रमणांचे बळी ठरलो. इंग्रजांनी तर आपल्या बुद्धीला गुलाम बनवण्याचंही तंत्र विकसित केलं. त्यामुळे आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आपलं खऱ्या अर्थानं स्वरूप समजून घेतलं पाहिजे.

भाषा म्हणजे ‘स्व’भाव व्यक्त करण्याचं माध्यम

ते म्हणाले की, भाषा ही आपल्या ‘स्व’भावाची अभिव्यक्ती असते. लोकांची जीवनपद्धती ह्याच्यावर आधारित असते. समाजाचं जसं भान असतं, तशीच त्याची भाषा असते. पाश्चिमात्य राष्ट्रांनी ‘जागतिक बाजार’ या संकल्पनेचा प्रसार सोपेपणे केला, पण तो विचार यशस्वी ठरला नाही. त्याउलट आपण जगाला ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार दिला.

संस्कृत भाषा जीवनात व्यवहारात यावी

संस्कृत समजणं म्हणजे भारत समजणं. ज्याला संस्कृत येते, तो कुठलीही भाषा सहज शिकू शकतो. आपली परंपरा, भावना आणि मूल्यसंस्था संस्कृत भाषेतून विकसित झाली आहे – हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. जर ती व्यवहारात आली, तर संस्कृत भाषेचाही विकास होईल. शब्दसंपत्तीचा सर्वात मोठा खजिना संस्कृतमध्ये आहे आणि ही अनेक भाषांची जननी आहे. भारतातल्या जवळपास सर्व भाषांचं मूळ संस्कृतमध्ये आहे. भाषा ही देश, काळ, परिस्थितीनुसार विकसित होते. म्हणून संस्कृतला बोलचालीत आणून ती सामान्य माणसाला सहज बोलता यावी यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

संस्कृत ही केवळ शास्त्रांची भाषा नाही; तर संवादाचीही भाषा आहे. तिचा उपयोग केवळ शास्त्रीय ग्रंथांपुरता मर्यादित न ठेवता संवादासाठीही केला पाहिजे. यासाठी संस्कृत विद्यापीठाची पदवी मिळवणं आवश्यक नाही. अनेक घरांमध्ये संस्कृत परंपरेने पाठ करून आत्मसात केलेली आहे. संस्कृत घराघरात पोहोचवणं आणि तिला संवादमाध्यम म्हणून वापरणं आवश्यक आहे. संस्कृत भाषेला केवळ राजाश्रय नव्हे, तर जनाश्रयही मिळायला हवा. भारतीय अस्मिता जागवण्यासाठी देशातील सर्व भाषांचा आणि त्यांची जननी असलेल्या संस्कृतचा विकास होणं गरजेचं आहे. यासाठी संस्कृत विद्यापीठांची मोठी जबाबदारी आहे आणि त्यांनी संस्कृतला जनाश्रय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

अन्य लेख

संबंधित लेख