मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चाललेला सस्पेन्स आज संपला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महायुती सरकारच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर मोठा महत्त्वाचा ठरत आहे.
आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईत होत असून, भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यांच्यासोबतच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा, यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, इतर राज्यांचे मुख्यमंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षांचे प्रमुख नेते, संत – महंत, महायुतीचे सर्व पदाधिकारी हजर राहणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथेने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे आणखी स्पष्ट होतील व नव्या सरकारच्या कामकाजात त्यांची महत्त्वाची भूमिका असेल असे मानले जात आहे. राज्याच्या विकासासाठी त्यांच्या नव्या भूमिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्रातील नव्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. शपथविधी सोहळा हा 5 डिसेंबर 2024, संध्यकाळी ०५:३० वाजता आयोजित होणार असून, या कार्यक्रमासाठी विविध प्रकारच्या सजावटी, सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आले आहे. महायुती सरकारच्या शपथविधीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 30 हजाराहून अधिक लोकांना बसविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्यासाठी विशाल मंडप बांधण्यात आला असून, मुख्य स्टेज भगव्या रंगाने सजवले गेले आहे.
या शपथविधीसाठी राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत, तर महाराष्ट्रातील सामान्य माणसांपासून ते राजकीय नेते, सर्वांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवीन पान लिहिणारा ठरणार आहे.