Friday, November 29, 2024

शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा सर्व क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं आहे

Share

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर – महिलांच्या सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरुपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर आहे. राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे सरकारचे ध्येय्य आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित बहिणींना आश्वस्त केले.

सिल्लोड येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे आज आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरणाच्या विविध योजनांचे लाभ महिलांना प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. दोन लाख महिलांना लाभ मंजूर झाल्याची घोषणाही करण्यात आली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी इतके दिवस म्हणायचो की मला एक बहीण आहे; पण मुख्यमंत्री झाल्यापासून तुमच्या रूपाने राज्यातल्या लाखो बहिणी मला मिळाल्या, हे माझं भाग्य आहे. मी जिथे जातोय तिथे बहिणी राखी बांधायला येतात. इतकं नशीबवान भाऊपण मिळायला भाग्य लागतं. तुमच्या या भावाची जबाबदारीपण आता वाढली आहे. या योजनेमुळे देशपातळीवरही राज्याचे कौतुक झाले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय हा देश महासत्तेकडे जाऊ शकत नाही. आपण महिलांना दुर्गा म्हणतो, लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो पण फक्त फोटोत पूजा करून भागणार नाही. प्रत्यक्षात महिलांचे हात बळकट करणं महत्वाचे आहे. त्यांना त्यांच्या पायावर उभे केले पाहिजे म्हणून शासनाने या योजना सुरू केल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, एक स्त्री म्हणजे एक आख्खं कुटुंब. राज्यातीलं प्रत्येक कुटुंब सुखी – समाधानी करणं हे सरकारचं पहिलं आणि अंतिम ध्येय आहे. महिला सक्षमीकरण हे सरकारच्या प्रत्येक निर्णयात ते दिसलं पाहिजे. शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा सर्व क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये एका बहिणीला मिळतील. बहिणींना आता फक्त रक्षाबंधन किंवा भाऊबिजेलाच ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा माहेरचा आहेर देणारी ही योजना कायमस्वरूपी आहे,अशा शब्दात त्यांनी उपस्थित महिलांना आश्वस्त केले.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लाडकी लेक योजना, मुलींचे उच्च शिक्षणही मोफत करणे, एस.टी. प्रवासात 50 टक्के सवलत, महिला सशक्तीकरण अभियान अशा विविध योजनांमधून एका वर्षांत दोन कोटींपेक्षा जास्त माता भगिनींना याचा लाभ झाला, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, फक्त बहिणींसाठी नव्हे तर लाडक्या भावांसाठीसुध्दा मुख्यमंत्री युवा अप्रेंटिंसशीप योजना आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रत्येक गावातून, प्रत्येक शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात 45 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अन्य कल्याणकारी योजनांसाठी जवळपास एक लाख कोटी रुपयांची तजवीज केली आहे. जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी अटी कमी केल्या आहेत. राज्यातील महिलांच्या चेहऱ्यावर या योजनेमुळे आनंद निर्माण झालाय हे सत्य आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन लाख अर्ज मंजूर झाले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी बहिणींचे अभिनंदनही केले.

अन्य लेख

संबंधित लेख