Saturday, September 7, 2024

घरातील हिरवा कोपरा: बागेचे स्वप्न साकार झाले

Share

टीव्ही कॅबिनेट ठेवलेला कोपरा रिकामा झाला. त्या कोपऱ्याचा कल्पकतेने वापर करून सावलीत वाढणारी शोभेची छोटी छोटी रोपे तेथे लावली. छान हिरवा कोपरा तयार झाला. टीव्ही त्या कोपऱ्यावर मध्यभागी लावला. घराचे दार उघडल्यावर तो हिरवा कोपरा येणाऱ्याचे लक्ष वेधून घेऊ लागला.

बाल्कनीमध्ये हिरवाईला यश मिळाले. मग मोठ्या टेरेसची स्वप्ने पाहण्याची मला इतकी सवय झाली, की दिवसाढवळ्या मी बाग व्हिज्युलाईज करू लागले. दयाघन परमेश्वराने माझे स्वप्न पूर्ण करायचे ठरवले. आमच्या बँकेच्या एका प्रपोज हाऊसिंग सोसायटीत मी नाव नोंदवले. पुण्याच्या कोथरूड भागात ही हाउसिंग सोसायटी होणार होती. निवृत्त झाल्यानंतर पुण्याला शिफ्ट व्हायचे. बागकाम आणि प्रवास हे छंद मनसोक्त जोपासायचे. पुण्यात त्यावेळी तरी मुबलक जागा होती.

घरातला हिरवा कोपरा

अलीकडच्या काळात जुने टीव्ही जाऊन नवे स्लिम टीव्ही आले आहेत. त्यांना टीव्ही कॅबिनेट किंवा शोकेसची आवश्यकता नसते. ते भिंतीवरही लावता येतात. वरळीच्या छोट्या घरी आम्ही नवीन टीव्ही घेतला. टीव्ही कॅबिनेट ठेवलेला कोपरा रिकामा झाला. त्या कोपऱ्याचा कल्पकतेने वापर करून सावलीत वाढणारी शोभेची छोटी छोटी रोपे तेथे लावली. छान हिरवा कोपरा तयार झाला. टीव्ही त्या कोपऱ्यावर मध्यभागी लावला. घराचे दार उघडल्यावर तो हिरवा कोपरा येणाऱ्याचे लक्ष वेधून घेऊ लागला. चौथा मजला चढून येण्याने होणारी दमणूक सार्थकी लावायचा. हिरवाई पाहून झालेला आनंद येणाऱ्याच्या डोळ्यात दिसायचा.

इकडे कोथरूडच्या घराचे बांधकाम जोरात चालू झाले. कुठल्याही मजल्यावर घर मिळाले तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मोठे घर मिळतेय याचाच खूप आनंद होता. आम्हाला तिसरा मजला मिळाला.

माझ्या तीव्र इच्छाशक्तीचे फळ इतक्या लवकर मिळेल असे मला स्वप्नातही कधी वाटले नव्हते. माझ्या मिस्टरांची बदली पुण्याला झाली आणि मोठ्या घरात राहण्याचे स्वप्न अगदी हाकेच्या अंतरावर आले. मी पण बँकेकडे पुण्याला बदलीसाठी अर्ज केला. काही महिन्यांनी माझीही बदली पुण्याला झाली आणि पुन्हा एकदा परमेश्वरी कृपेचा अनुभव घेतला. मुलांच्या परीक्षा झाल्यावर पुण्याला शाळेत प्रवेश घेतला आणि आमचे बस्तान मुंबईहून पुण्याला हलवले. घर तयार होईपर्यंत आम्ही माझ्या आईकडे राहिलो. मला त्या काळात आईच्या सहवासाचा आनंद घेता आला.

पुढे फ्लॅटचा प्लॅन बदलला आणि आमचा फ्लॅट डुप्लेक्स केला. वरचा चौथा मजला व त्याला लागून असलेली टेरेस आम्हाला मिळाली, एकूण ५०० आणि २०० स्क्वेअर फुटाच्या दोन गच्ची मिळाल्या. ‘भगवान छप्पर फाड के देत आहे’ म्हणजे काय हे टेरेस पाहिल्यावर कळले.

वास्तुशांत झाली आणि आम्ही नव्या प्रशस्त घरात राहायला आलो. देवाने ७०० स्क्वेअर फुटाची टेरेस देऊन कृपेचे पुरेपूर दान पदरात टाकले होते. त्याचे सोने कसे करायचे याचे विचार मनात येऊ लागले. मिस्टरांची फिरतीची नोकरी, मुलांच्या शाळा आणि माझी सकाळी पावणे नऊची नोकरीची खूप धावपळ व्हायची, तरीसुद्धा बेसिक म्हणजे तुळस, कढीपत्ता, काही फुलझाडे म्हणजे जाई, जुई, कुंदा अशी रोपे आणून लावली. दिवसभर घरात कोणीच नसायचे. त्यामुळे जेमतेम पाणी घालणे होत असे. सुट्टीच्या दिवशी मात्र झाडांची निगा राखता येत असे. इतके असूनसुद्धा झाडांनी फुले द्यायला कधी हात आखडता घेतला नाही. बहर आला की भरपूर फुले मिळत. कधी कधी फुले काढताना मीच दमून जात असे. जाई आणि जुईची फुले अगदी अलगद काळजीपूर्वक काढावी लागतात. आमचा कढीपत्ता शेजारीपाजारी जायचा. कोणाकडे कांदेपोहे असतील, त्यात आमचा कढीपत्ता असायचा. थोड्या गडद हिरव्या कढीपत्त्याला खूप छान वास येतो. पावसाळ्यात तो इतका पसरायचा की छाटणी करावी लागायची. पाने वाळवून त्याची खमंग चटणी केली की ताटाची शोभा आणि जिभेची चव दोन्ही वाढत असे.

अपर्णा सावंत
(लेखिका घरगुती बागेविषयीच्या जाणकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख