वारजे, पुणे : भारताच्या संविधानाचे सखोल ज्ञान असणे, ही प्रत्येक भारतीयाची गरज आहे. सर्व भारतीय एक आहोत हा भाव ठेवला आणि संविधान टिकवून ठेवणारा हिंदू समाज हा बहुसंख्य राहिला तरच संविधानाचे रक्षण होईल. याच विचारातून ‘भारतीय संविधान आणि त्याचे महत्त्व’ सांगणारे व्याख्यान नुकतेच “वारजे हायवे परिसर जेष्ठ नागरीक संघ” यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला नरेंद्र पेंडसे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
संविधान बनवण्यासाठी घटना समितीची निर्मिती केली होती. त्याअंतर्गत अनेक समित्या नेमल्या होत्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. समाजातील भेद नाहीसा व्हावा याच र्थाने डॉ आंबेडकरांनी घटनेची उद्देशिका लिहीली. भारतात एकी निर्माण करण्यासाठी जे हवे ते उद्दशिकेत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता संविधानातील ही मूल्ये आयात केलेली नसून भारताची मूल्ये आहेत, असे पेंडसे यांनी सांगितले.
संविधानाने व्यवसायाचे स्वातंत्र्य दिले, मत स्वातंत्र्य दिले. बंधुता, समरसता संविधानाने शिकवली. उदा – सफाई कामगारांबद्दल सुध्दा आपल्या बरोबरीचे आहेत ही भावना ठेवून आपुलकी वाटणे ही समरसता. स्वार्थासाठी लोक जातीपातीत भेद निर्माण करून मते मिळवतात. जातीचे विष पसरवले जाते. फाळणी होताना ज्यांनी पाकिस्तानच्या बाजूने मतदान केले ते इथेच राहिले. त्यांना इथे संविधानाप्रमाणे खटले न्यायालयात चालणे पटत नाही, त्यांच्या जमिनीचे खटले वक्फ बोर्डात चालवले जातात. संविधान वाचवून मूल्ये टिकवायची असतील तर सजगपणे मतदान केले नाही तर देश अयोग्य लोकांच्या हाती जाऊ शकेल. जातीपातीत भांडणे लावणारे आणि परकिय घुसखोरांना कागदपत्रे बनवून त्यांना इथे रहायला मदत करतात त्यांना मतदान करणे हे देशासाठी भविष्यात धोका निर्माण करतील, अशी परखड मते पेंडसे यांनी यावेळी मांडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष नंदकिशोर बोधाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष बाळासाहेब पानसे यांनी केले.