Wednesday, December 4, 2024

सातपुड्यातील नवागावची होळी

Share

वनवासी समाजाच्या जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला सण म्हणजे होळीचा सण. वनवासी समाजजीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेला होळी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

खान्देशातील सातपुडा परीसरातील मानाची होळी म्हणून नवागावची होळी प्रसिद्ध आहे. वनवासी समाजाच्या जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला सण म्हणून होळीचा सण आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात तो पार पडतोय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांगेतील नवागाव येथे साजरा होणारा होलिकोत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये पुढील पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळते. वनवासी समाज जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेला होळी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्राचीन काळापासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील वैविध्याचे रंग आणि पारंपरिक स्वरूप कायम ठेऊन आहे.

सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील नवागावच्या होळीत रात्रभर ढोलाच्या तालावर वनवासी पारंपरिक नृत्य होते. जवळपास शंभर ढोल येथे असतात. या ठिकाणी ढोल वाजविण्याची स्पर्धा देखील आयोजित केली जाते. वनवासी बांधव ही होळी पारंपरिक पद्धतीने साजरी करतात. ढोल, बासरी, घुंगुरु या वाद्यांचे आवाज आणि वनवासी बांधवांचा पारंपरिक पेहराव येथे येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत असतो. स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपरिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणारे वनवासी बांधव पहाटे सूर्योदयाच्यापूर्वी ही होळी पेटवतात. यामागे वर्षभराच्या कष्टाचे बळ सोबत घेऊन येते अशी धारणा आहे. वनवासी संस्कृतीत पुरुष महिला असा भेदाभेद नाही. गरीब – श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते.

सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये मानाची होळी म्हणून लौकिक असलेली नवागावची होळी दरवर्षीप्रमाणे मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत आहे. कुणालाही आमंत्रण दिले जात नाही की कुणाला मानसन्मान दिला जात नाही. येथे सर्व समान असतात. या होळी उत्सवाला हजारो वनवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत काठीच्या होळी उत्सवात सामील होतात. रात्रभर रममाण होऊन नाचणारे वनवासी बांधव आणि त्यांच्यातली ऊर्जा पाहिल्यावर येथे येणारा प्रत्येक जण भारावून जातो. सामाजिक एकोपा आणि एकमेकांप्रती असलेला आदरभाव हा या समाजाला अजूनही एकत्र ठेवून आहे.

होळीचा पाच दिवसीय उत्सव
होळी हा सण वनवासी समाजातील सर्वात पवित्र सण मानला जातो. वनवासी समाजात महिलांना सन्मान दिला जातो. होळी ही कुठून तरी बांबू आणून रोऊन जाळत नाहीत तर ज्या गावाची होळी असते, तेथे लाकुड रचून अग्नी लावतात. त्या गावचे प्रमुख पाच पंच पाटील, पुजारा, डायला, वारती, कोतवाल असे पाच पंच मिळून त्या ठिकाणी सरळ व लांब बांबू असतात त्या ठिकाणी होळीच्या एक सव्वा महिन्याआधी जाऊन एका बांबूला दोरा बांधून येतात. नंतर त्या गावाच्या होळीच्या दिवशी पाच लोक जातात त्या बांबूला न तोडता तो मुळासकट काढून आणतात. रस्त्यात कुठेही खाली ठेवत नाहीत. सरळ ज्या ठिकाळी होळी असते त्या ठिकाणी आणतात. तो रोवल्या नंतर सर्व प्रथम तेंदूच्या फांद्या आजूबाजूला रचतात. नंतर काडी कचरा कमी स्वरूपात लाकडाचाही वापर करतात. रात्रभर त्या गावाचे, परिसरातील आजूबाजूचे लोक ढोल, घेर नृत्य पथक घेऊन रात्रभर नाचतात आणि पहाटे चार वाजले की, गावपाटील, गावडायला यांच्याच हस्ते होळी पेटवली जाते. जवळ जवळ सर्व गावाकऱ्यांचा उपवास असतो आणि होळीच्या दिवशी विशेष जेवण तयार केलेले असते. ते जेवणही सर्वजण थोडे थोडे होळीच्या ठिकाणी नेतात. होळी पूर्ण जळाल्यानंतर खाली पडते होळीचा शेंडा हा कोणत्याही परिस्थितीत खाली पडू देत नाहीत तर वरच्या वर त्याला झेलावे लागते. पूर्ण खाली पडल्यानंतर प्रत्येक गावाच्या प्रतिष्ठित व्यक्तीला सन्मान दिला जातो. एक व्यक्तीचे नाव पुकारून बोलावून तलवारीने किंवा फाव्याने फूट भर तुकडा तोडायला लावतात. सर्व तोडून झाल्यानंतर जो शेंडा असतो तो मान सन्मान म्हणून एखादे मोठे घेर नृत्य पथक आलेले असते त्यांना देतात. दोन मोठ मोठे तुकडे तोडून होळीच्या पश्चिमेला रोपतात. तेथून जे जेवण बनवलेले असते ते होळीला भोग म्हणून देतात. नंतर महिला, पुरुष, विवाहित, अविवाहित कोणीही असो एका टोपलीत दाळ्या, नारळ, गूळ असे ठेवून होळीच्या भोवती पाच फेर मारून ते साहित्य त्यात टाकत फिरतात. सर्व दुःख हे त्यामध्ये विसर्जन करतात, अशी भावना असते.

होळी कधी आणि कुठे असते…
दिनदर्शिकेत ज्या दिवशी होळी दर्शवलेली असते त्या दिवसाच्या आदल्या दिवसापासून होळी उत्सव सुरू होतो.
शिरपूर तालुक्यातील नवागाव, सामऱ्यापाडा येथे पहिली राव्वी होळी असते. या ठिकाणी सातपुड्यातून अनेक ठिकाणाहून लोक येतात. नंतर बोराडी, चोंदी पाडा, फत्तेपूर, चाकडू, बोरपाणी, मालपूर, मालकातर असे एकूण पाच दिवस होळी चालते. प्रत्येक दिवशी तीन, चार गावात होळी असते. होळी फाल्गुन महिन्यात येते म्हणून होळीला फाग मागणे असेही म्हणतात.

होळी नंतर ‘मेलादा’ उत्सव साजरा होतो. मेलादा म्हणजे एक प्रकारे पूर्ण गावाचा नवस. जळीत विस्तवावर चालून ग्रामस्थ नवस फेडतात. गावात सुख-शांती नांदावी, शेतातील उत्पादनात वाढ व्हावी, रोगराई होऊ नये यासाठी निर्सगदेवतेचे ऋण फेडण्याचा जणु हा नवस असतो.

(या लेखासाठीचे माहिती संकलन प्रा. दशरथ पावरा आणि प्रा. आर. जी. पावरा यांनी केले आहे.)

अन्य लेख

संबंधित लेख