Tuesday, December 3, 2024

…म्हणून देशाला पंतप्रधान पदावर पुन्हा मोदी हवे आहेत

Share

नुकतेच अयोध्या येथे जाणे झाले. १९९२ साली असलेली परिस्थिती आणि आता झालेले बदल अनुभवत होतो. जणू भारतमातेच्या आमच्या या विस्तीर्ण घरातील देवघराचा कोपरा ५०० वर्षांनी पुन्हा पवित्र होऊन संपूर्ण भारतीयांना एक आध्यात्मिक प्रेरणा देत मातृभूमीच्या दिग्विजयी वाटचालीसाठी सज्ज होत आहे. काशी विश्वेश्वरचे कॉरिडॉर, उज्जैन येथे निर्माण होत असलेले भव्य कॉरिडॉर, सर्वत्र हिंदू मंदिरांची होत असलेली भरभराट जणू भारताच्या आत्म्याचा नव्याने शोध होवू घातल्याची साक्ष देत आहे. या शोधाला अंतिम टप्प्यात नेण्यासाठी आम्हाला पुन्हा मोदी पंतप्रधान म्हणून हवे आहेत.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मत-मतांची रणधुमाळी दिसत आहे. दोन्ही बाजूने निवडणूक ‘मोदी’ केंद्रित झाली आहे. कारण विरोधी पक्षाला बोलायला एकमेव विषय मोदी हाच आहे आणि भाजपची पण मोदींवरच पूर्ण भिस्त आहे. अशा वेळी खरेच देशाला आणि लोकांना मोदी पुन्हा का हवे आहेत ? याचा विचार घेण्याची गरज आहे.

PM Modi

२०१४ साली निवडणुका होऊन मोदी यांचा शपथविधी झाला आणि ते पंतप्रधान झाले. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेचे माननीय अशोकजी सिंघल यांनी थेट पृथ्वीराज चौहान यांच्या नंतर प्रथमच हिंदू व्यक्ती दिल्लीत सत्तेवर आली आहे असे विधान केले होते. त्यांचा उल्लेख चक्रवर्ती राजा असाही त्यांनी केला होता आणि त्यावर नेहमीप्रमाणे जोरदार टीकाही झाली होती. पण स्वर्गीय अशोकजी यांचे विधान किती अचूक होते हे गेल्या १० वर्षात वेळोवेळी सिद्ध होत गेले आहे.

मतुआ समाजाची प्रतिक्रिया
अगदी अलीकडे सीएए कायद्याची अधिसूचना निघाल्यावर मतुआ या हिंदू समाजाच्या समुहाने दिलेल्या प्रतिक्रिया बघण्यासारखा होत्या. बांगला देशातून अत्याचारग्रस्त होऊन ज्यांच्यावर निर्वासित होऊन भारतात येण्याची वेळ आली तो हा मतुआ समाज! हिंदू समाजावर कुठेही अत्याचार झाले तर त्याने विस्थापित झाल्यावर जायचे कुठे? गेलीं अनेक वर्षे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगला देशातून विस्थापित झालेला हिंदू नागरिकत्व मिळण्यापासून वंचित होता. त्याला न्याय मिळाला तो मोदी यांच्या निर्णयाने, म्हणून मोदी पुन्हा पंतप्रधान हवे आहेत.

जम्मू, काश्मीरमधील बदल
श्रीनगर येथे मोदीजी यांची सभा झाली. ३५००० क्षमतेच्या मैदानाबाहेर २५००० खुर्च्या टाकाव्या लागल्या एवढी प्रचंड गर्दी जमली. प्रशासन आणि पोलिस यांचे अंदाज तर चुकलेच पण भाजप कार्यकर्त्यांनाही याचा अंदाज नव्हता. सुमारे ४० वर्षांपूर्वी ४० दिवस मोदी काश्मीरमध्ये होते. त्यावेळी जोडलेल्या व्यक्तींशी त्यांचा संपर्क होता. त्या आधारावर त्यांनी ही किमया घडवून आणली. त्या सर्वांच्या समोर ३७० आणि ३५ अ कायदा रद्द करताना घेतलेली भूमिका त्यांनी ठामपणे तर मांडलीच पण स्वर्गीय शामाप्रसादजी यांना त्यांनी विनम्र श्रद्धांजली वाहताना कुठलाही न्यूनगंड मनात ठेवला नाही. आज बदल झालेला जम्मू आणि काश्मीर आणि उद्याचा मिळवायचा पाक व्याप्त काश्मीर यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायला हवेत.

शास्त्रज्ञांना प्रोत्साहन
मध्यंतरी मिशन दिव्यास्त्र अंतर्गत संपूर्ण स्वदेशी अग्नी ५ मिसाईलची यशस्वी चाचणी केली गेली. त्या पाठोपाठ पोखरणमध्ये भारताच्या तिन्ही दलांनी आपली प्रात्यक्षिके सादर केली. एका अर्थाने भारताच्या संरक्षण सिध्दतेचे ते शक्ती प्रदर्शन होते. आमची संरक्षण सिद्धता ही स्वातंत्र्य मिळाल्या पासून परावलंबीच होती. त्यातील दलाली आणि त्या दलालीवर पोसलेले एजंट हीच आमची संरक्षणसिद्धतेची उपलब्धी होती. बोफोर्स प्रकरण तर शरमेने मान खाली घालावी असेच होते. आज त्यातून या क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत चालला आहे. ४० देशांपेक्षा जास्त देशात आम्ही क्षेपणास्त्रे निर्यात करत आहोत. पूर्वीचीच प्रयोगशाळा, तेच शास्त्रज्ञ पण त्या सर्वांना प्रोत्साहित करणारे मोदी यांच्या नेतृत्वाचे परिणाम आपल्यासमोर आहेत. संरक्षण ते अंतराळ ही जी भरारी आहे, चांद्रयान ते आदित्य ही मोहीम आणि पुढील वर्षी अंतराळ वीरांचा सुमारे ५० वर्षानंतर होऊ घातलेला प्रवास याच्या यशस्वीतेसाठी मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून हवे आहेत.

अयोध्येतील भावविभोर अवस्था
नुकतेच अयोध्या येथे जाणे झाले. १९९२ साली असलेली परिस्थिती आणि आता झालेले बदल अनुभवत होतो. शरयूचे घाट, लता मंगेशकर चौक आणि प्रत्यक्ष रामलल्ला मंदिर. डोळ्यातून आनंद अश्रूंचे बांध सर्व मर्यादा सोडून अखंड वाहत होते. हीच भावविभोर अवस्था येणार्‍या प्रत्येक भाविकांची होती. जणू भारतमातेच्या आमच्या या विस्तीर्ण घरातील देवघराचा कोपरा ५०० वर्षांनी पुन्हा पवित्र होऊन संपूर्ण भारतीयांना एक आध्यात्मिक प्रेरणा देत मातृभूमीच्या दिग्विजयी वाटचालीसाठी सज्ज होत आहे. काशी विश्वेश्वरचे कॉरिडॉर, उज्जैन येथे निर्माण होत असलेले भव्य कॉरिडॉर, सर्वत्र हिंदू मंदिरांची होत असलेली भरभराट जणू भारताच्या आत्म्याचा नव्याने शोध होवू घातल्याची साक्ष देत आहे. या शोधाला अंतिम टप्प्यात नेण्यासाठी आम्हाला पुन्हा मोदी पंतप्रधान म्हणून हवे आहेत.

ram mandir temple

समस्त हिंदू समाजाची मागणी आहे ती अयोध्या, काशी, मथुरेच्या मुक्तेतीची. हिंदूंची आराध्य दैवते असलेल्या या मंदिरांची उद्ध्वस्त अवस्था पाहून स्वतः छत्रपती शिवरायही खंत व्यक्त करायचे आणि या मंदिरांची मुक्ती, जीर्णोद्धार त्यांच्या स्वराज्याच्या मूलभूत धोरणाचा भाग होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी ही खंत कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या काळात केला पण अयोध्या व्यतिरिक्त उर्वरित दोन मंदिरांची मुक्ती अजून बाकी आहे. या लढ्याला राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेचा पाठिंबा गरजेचा आहे. हिंदू धर्मस्थळांच्या मुक्तीसाठी मोदी पंतप्रधान पुन्हा हवे आहेत.

एका अमृतकाळाची नांदी ठरणार्‍या लोकशाहीच्या या उत्सवासाठी योग्य मतदान करण्यास सिद्ध होऊ या. हे मतदान पाच वर्षासाठी असेल पण त्याचा परिणाम पुढील काही शतकांवर होणार आहे. चला तर मग पुन्हा लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करू या, भारताला विश्वगुरु बनवू या.

भारत माता की जय !

रवींद्र मुळे
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी असून नगरमधील प्रथितयश उद्योजक आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख