उदयोन्मुख बाजारपेठेच्या गुंतवणूकयोग्य निर्देशांकामध्ये भारतानं या महिन्यात चीनला मागं टाकलं असल्याचा निष्कर्ष मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनल या संस्थेनं काढला आहे. या निर्देशांकामध्ये चीनच्या 21 पूर्णांक 58 टक्क्यांच्या तुलनेत भारताचा निर्देशांक 22 पूर्णांक 27 टक्के आहे. चिनी बाजारपेठा त्या देशातल्या आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संघर्ष करत असताना, भारताच्या बाजारपेठांना अनुकूल स्थूल आर्थिक परिस्थितीचा लाभ झाला आहे. अलिकडच्या काळात, भारतीय अर्थव्यवस्थेच्या भक्कम आर्थिक मूलभूत तत्त्वांद्वारे तसंच कॉर्पोरेट्सच्या भरीव कामगिरीद्वारे भांडवली बाजारात भारतानं अतिशय चांगली कामगिरी केली आहे. यासाठी कारणीभूत प्रमुख घटकांमध्ये या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात थेट परकीय गुंतवणुकीत 47 टक्के वाढ, ब्रेंट क्रूड म्हणजे खनिज तेलाच्या किंमती कमी होणं आणि भारतीय कर्ज बाजारातील भरीव परदेशी गुंतवणूक यांचा समावेश आहे. विश्लेषकांच्या मते, निर्देशांकातील या बदलामुळे, भारतीय भांडवली बाजारात 4 अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक होऊ शकते.
दरम्यान भारताचं परकीय चलन भांडार ३० ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात दोन अब्ज डाँलरनं वाढून जवळपास ६८४ अब्ज डाँलर इतक्या उच्च पातळीवर पोचलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, परकीय चलन भांडारात मागील तीन आठवड्यात १३ कोटी ९० लाख डाँलरची वाढ नोंदवण्यात आली. या दरम्यान, सोने भांडार ८६ कोटी २० लाख डाँलरने वाढून ६१ अब्ज ८६ कोटी डाँलर इतका झाला आहे.