Monday, June 24, 2024

मतदानासाठीचा उत्साह

Share

भारतीयांच्या नसानसात आता लोकशाही परंपरा भिनली आहे आणि याची अनेक उदाहरणे सांगता येतील. लोकसभेसाठी सुरू असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेत जे जे कोणी सहभागी आहेत, त्यांच्या सहभागातून अशी उदाहरणे समोर येत आहेत.

पाच पिढ्यांचे एकत्र मतदान
याचेच एक उत्तम उदाहरण छत्तीसगढमध्ये दिसते. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान तेथे सुरू होते. त्या वेळी एकाच कुटुंबातील पाच पिढ्या मतदानासाठी आल्या. या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणे, हे आपले कौटुंबिक नागरी कर्तव्य आहे. भारतीय नागरिक म्हणून आपल्याला मतदानाचा हक्क मिळाला आहे. तो हक्क बजावण्याची शिकवण एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिली. अशा पाच पिढ्या एकाच वेळी मतदान केंद्रावर आल्या होत्या. त्यामुळे भारतासारख्या विशाल देशात लोकशाही हा एक संस्कार म्हणून पुढे येतो. त्यातून लोकशाही सशक्त होते. भारताच्या लोकशाहीला धरुन असलेली नितीमत्ता त्यातून आपल्याला दिसून येते. यातील प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येकाचा अधिकार हा तितकाच महत्त्वाचा असतो.

निर्भय मतदान आणि मतदानातून निर्भयता
छत्तीसगढमधील बस्तर या नक्षलग्रस्त भागात भारताच्या स्वातंत्र्यापासून प्रथमच ऐतिहासिक घटना घडली. नक्षलवाद्यांचा प्रभाव असूनही तेथील ३२५ मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावला. त्यात १६२ महिलांचा समावेश होता. देशात कोणत्याही भागात निर्भयपणे मतदान करण्याचे वातावरण तयार झाल्याचे यातून दिसतेच, पण मतदानातून मतदारांमध्ये निर्भयता येते, हा संदेशही यातून मिळाला. कारण, मतदानाच्या काही दिवसांपूर्वीच बस्तर जिल्ह्यात २९ नक्षलवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले होते. त्यामुळे या भागातील नक्षलविरोधी कारवाईबाबत सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाल्याचे चित्र आहे. मतदानासाठी रांगेत उभे राहून स्थानिकांनी निर्भयता आणि आत्मविश्वास दाखवून उत्साहाने मतदान करणे हा तेथील मजबूत सुरक्षा यंत्रणेवरील नागरिकांचा विश्वास असल्याचे द्योतक असल्याचे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले.

ऐतिहासिक वास्तूंच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
पुणे लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणारा शिवाजीनगर हा एक विधानसभा मतदार संघ आहे. येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात जवळपास आठ हजार मतदारांच्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यातील एक ‘युनिक मतदान केंद्र’ होते. विद्यापीठातील एम.टेकच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी स्वप्नील क्षीरसागर आणि अन्य विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने या केंद्रावर पुण्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंच्या छायाचित्रांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते. याशिवाय विद्यापीठातील विविध विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या स्पोटर्स कारची मॉडेल्सही मतदारांना पाहण्यासाठी मतदान केंद्राबाहेर ठेवण्यात आली होती. ‘मतदारराजा’ला जागरूक करण्यासाठी संदेश फलकही लावण्यात आले होते.

मलेशियाहून खास मतदानासाठी पुण्यात
रघुनंदन शेंडे हे व्यावसायाच्या निमित्ताने गेल्या २५ वर्षांपासून मलेशियामध्ये स्थायिक झाले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या की, मायदेशी प्रवासाची तिकिटे ते बुक करतात. मतदानाच्या आधी दोन दिवस पुण्यात येतात आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा मलेशियाकडे उड्डाण करतात. या वर्षीही ते मतदानासाठी पुण्यात आले. सिंहगड रस्त्यावरील केंद्रात मतदान केले. त्या वेळी म्हणाले, “जगभरात देशाची प्रतिमा वेगाने बदलत आहे. भारतीयांकडे बघण्याची परदेशी नागरिकांची दृष्टी बदलली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमीका महत्त्वाची ठरते. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती दिलीच, पण देशातील नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. अनिवासी भारतीयांमध्ये देशाबद्दल आत्मीयता विकसित केली. त्यामुळे आता माझी मुलेही न चुकता प्रत्येक मतदानासाठी देशात येतात.”

‘वोट कर पुणेकर’ हॅशटॅगचे ट्रेंडिंग
पुण्यात मतदानाच्या दिवशी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मतदारांचा सळसळता उत्साह शहराच्या प्रत्येक केंद्रावर दिसत होता. प्रथमच त्यांच्या बोटावर मतदानाची शाई लागली होती. त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या काही मुला-मुलींनी एकत्र मतदान केले. तर काहींनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा अनुभव घेतला. त्यांची मतदान केल्याचे सेल्फी समाज माध्यमांवर टाकले. पुण्यातील मतदानाच्या दिवशी ‘वोट कर पुणेकर’ हा हॅशटॅग ‘एक्स’ या समाज माध्यमावर ट्रेंडिंगमध्ये असल्याचे दिसले.

पुण्याच्या शेजारी असलेल्या लोकसभा मतदारसंघ शिरूरमध्ये १०६ वर्षांच्या रखमाबाई शेळके आणि १०५ वर्षे वयाच्या अनसूया सोंडेकर यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यांनी निवडणूक आयोगातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी घरातील मतदानाची सुविधा नाकारली. हे भारतीय लोकशाहीचे खऱ्या अर्थी ऊर्जास्त्रोत आहेत. रखमाबाई, अनसूया यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला.

अन्य लेख

संबंधित लेख