Saturday, September 7, 2024

नृत्यामुळे माझ्या आयुष्याला सकारात्मक दिशा मिळाली

Share

अनेक मुले-मुली नृत्य शिकत असतात. कोणी पारंपरिक नृत्य शिकते, कोणी वेस्टर्न.. प्रत्येकाचे उद्देश वेगळे असतात. त्यातून काय मिळवायचे हेही त्यांचे ठरलेले असते. यातही गंभीरपणे नृत्यसाधना करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आपण नृत्य का शिकलो आणि आता का शिकवतो आहोत, त्यातून आपल्याला काय मिळते याबद्दल स्पष्ट विचार करणाऱ्या राधिका बाग यांचे मनोगत. २९ एप्रिल या जागतिक नृत्यदिनानिमित्त.

मला नृत्याची आवड माझ्या आईमुळे लागली. माझी आई भरतनाट्यम नर्तिका असून उत्तम शिक्षिकाही आहे. त्यामुळे लहान असल्यापासूनच मला नाचाची ओढ लागली. ती शिकवत असताना मी तिथे जाऊन बसायचे. माझ्यावर नृत्याचे संस्कार तिच्यामुळेच झाले आहेत. ते बघून मी शाळेमधल्या प्रोग्रॅम्समध्ये किंवा एखाद वेळी घरी ते नाच करायचे. तेव्हा मी ४-५ वर्षांची होते. सहावीत असताना मी आईकडेच नृत्याचे शिक्षण घेऊ लागले. तेव्हापासून सुरू झालेला माझा नृत्यप्रवास अजूनही सुरूच आहे…

international dance day

नृत्यातून मला काय मिळाले
नृत्यातून मला काय मिळाले याबद्दल कधी कधी मी विचार करते तेव्हा जाणवते ते असे –

  • प्रत्येक दिवस आपला नसतो. रोज आपण १००% देऊ शकत नाही. त्यामुळे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन (positive approach) असणे आवश्यक आहे.
  • कारण बाहेरून दिसणारी प्रतिमा लखलखती असते. पण त्यामागचे कष्ट फार खडतर असतात. ते घेतल्यानंतरच लखलखत्या प्रतिमेमागचे वास्तव लक्षात येते. त्यामुळे केवळ प्रतिमेचाच विचार करण्यापेक्षा या कष्टांवर लक्ष केंद्रित करायला हवे.
  • सगळे दिवस अर्थातच सारखे नसतात. एखाद्या दिवशी मनासारखे झाले नाही तर नाराज न होता प्रयत्न करत राहायला हवे. सुधारणेला नेहमीच वाव असतो.
  • आपण नेहमीच विद्यार्थी राहातो. त्यामुळे शिकण्याची इच्छा कधी कमी होत नाही.
  • आपल्याकडे नुसत्या कलेवर उदरनिर्वाह करणे अवघड आहे. त्यासाठी नोकरी-व्यवसायाचे इतर मार्ग अवलंबावेच लागतात. मात्र ते करत असतानाही कलेची साधना आपण करू शकतो. यामुळे एकावेळी अनेक गोष्टी करण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते.
  • नृत्य आपल्याभोवती सकारात्मक लहरी निर्माण करायला खूप मदत करते.
  • आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करण्याची, त्यातून शिकण्याची सवय नृत्यामुळे लागते.

चांगल्या प्रेक्षकासाठी
माझी आई नेहमी म्हणते, सगळेच डान्सर्स उत्तम stage performers नसतात. काहींमध्ये शिकवण्याचीही कला असते. ती तेवढीच महत्त्वाची असते. कारण या शिकवण्यातून त्या केवळ नृत्य शिकवत नसतात, तर नृत्याकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोनही तयार करत असतात. त्यातून चांगला प्रेक्षक निर्माण होत असतो.

गेल्या पंधरा वर्षांहूनही अधिक काळ मी नृत्य शिकते आहे. नृत्य शिकणे – शिकवणे, सराव करणे, इतरांचे कार्यक्रम बघणे.. अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये माझे शिक्षण सुरूच आहे. नृत्य हा माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाचा भाग झाला आहे. मला या माध्यमाने नेहमी आनंदच दिला आहे. कुठल्याही तणावपूर्ण स्थितीतून बाहेर पडण्यासाठी Dance is the best cure. माझ्या डान्सच्या मैत्रिणी, आमचा ग्रुप आणि त्यांच्याबरोबर तास दोन तास practice session is the best stress relief.

dance group

मी आईकडे शिकायला सुरवात केली तेव्हा मी कधी माझे डान्स क्लासेस सुरू करीन, असे वाटले नव्हते. पण ते सुरू झाल्यापासून त्यातूनही एक वेगळा आनंद मिळतो आहे. स्वतःकडे काहीही राखून न ठेवता, अगदी निरपेक्षपणे गुरूने आपल्याला नृत्य शिकवले. आता माझ्या विद्यार्थ्यांना त्याच भावनेने शिकवताना मला जो आनंद मिळतो, त्याचे वर्णन कसे करावे!

नृत्य हे फक्त movement नाही तर एक emotion आहे. It is a way of expressing yourself in the best possible way – आपल्या भावना चांगल्या रीतीने व्यक्त करण्याचे हे खूप प्रभावी माध्यम आहे. नृत्यामुळे नकळत शरीर आणि मनाचे सिंक्रोनायझेशन होत असते. त्यातून आपल्या शरीराच्या क्षमता आणि कमतरता आपल्याला जाणवतात. त्यातून आपण आपल्या शरीरावर अजून किती ‘पुश’ करू शकतो, हे लक्षात येते.

क्लासमध्ये प्रवेश घेणाऱ्यांचे प्रश्न असतात – माझी मुलगी ‘गाण्यावर’ कधी नाचू शकेल? ती परीक्षा कधी देणार? आणि तिला डान्स कधी येणार? या धावत्या जगातही एखादी कला झटपट शिकता येत नाही. Learning art is not a quick process. त्याची उपासना करावी लागते. आपल्या शरीराचा वेग लक्षात घेऊन, जोपासलेली ही कला आहे. नृत्याची आराधना करताना त्यातील शिकलेले बारकावे, कौशल्य, त्यातून मिळालेला दृष्टिकोन, त्यावर घेतलेले कष्ट कायम उपयोगी पडत असतात. एखादीला पुढे नृत्य शिकता आले नाही, तरी ही शिकवण तिच्याबरोबर कायम राहाते. हे शिकलेले कधीच वाया जात नाही.

कोणतीही कला माणसाला समृद्ध करत असते. नृत्य त्याला अपवाद नाही. आईमुळे खूप लहानपणीच माझी ओळख या कलेबरोबर झाली आणि माझ्या आयुष्याला सकारात्मक दिशा मिळाली…

राधिका बाग

अन्य लेख

संबंधित लेख