भारत आणि चीनसारखे देश युक्रेन संघर्ष मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं मत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी व्यक्त केलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सध्या सुरू असलेल्या या संघर्षावर तोडगा काढण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला होता.
त्यानंतर दोन दिवसांच्या आतच मेलोनी यांनी हे वक्तव्य केलं आहे. इटलीमधील सेर्नोबिओ इथं आयोजित अँब्रोसेट्टी फोरमच्या बैठकीच्या पार्श्र्वभूमीवर मेलोनी यांची काल युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी भेट झाली. या बैठकीत त्यांच्यात प्रत्यक्ष जमिनीवरील ताज्या घडामोडी आणि हिवाळा जवळ येत असल्यानं युक्रेनला निकडीनं आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल चर्चा झाली. या बैठकीनंतर मेलोनी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.