Saturday, July 27, 2024

कर्नाटकातील व्हायरल व्हिडिओ: उडुपीच्या रस्त्यावर मध्यरात्री हिंसक टोळीयुद्ध; गाड्यांची धडक आणि तलवारीचा नंगा नाच

Share

उडुपी: कर्नाटकातील व्हायरल व्हिडिओ (Karnataka Viral Video) ने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीवरील शहर उडुपी येथील एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन गटांमध्ये जोरदार कार युद्ध पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये सार्वजनिक रस्त्यावर गुन्हेगारी टोळीतील दोन गटांचे भितीदायक दृश्य समोर आले आहे. कर्नाटकच्या उडपी भागातील कुंजीबेट्टू परिसरात हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 18 मे 2024 रोजी रात्री घडली. तिथल्या एका व्यक्तीने घडलेली ही घटना जवळच्या एका उंच इमारतीतून मोबाईलमध्ये चित्रित केली. या सगळ्या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या भागाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण केली आहे.

व्हिडिओमध्ये दोन मारुती स्विफ्ट कार – एक काळी आणि एक पांढरी – जाणूनबुजून एकमेकांना भिडताना दिसत आहे. पांढऱ्या रंगाची कार वेगाने उलटून काळ्या कारला धडकताना दिसत आहे, ज्याच्या खिडकीतून एक व्यक्ती तलवारीचा धाक दाखवताना दिसत आहे. संघर्ष वाढत असताना, पांढऱ्या कारमधील पुरुष जखमी माणसावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, परंतु काळ्या कारमधील एकाने त्यांचा पाठलाग केला.

व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भांडणात सहभागी असलेल्या सहा जणांपैकी, पोलिसांनी कापू शहरातील आशिक आणि रकीब या ‘गरुड’ टोळीतील दोन सदस्यांना ओळखले आणि त्यांना अटक केली. इतर चार जण अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी शोध पथक तयार करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन कार, दोन मोटारसायकल, एक तलवार आणि एक खंजीर जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना १ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेसाठी कर्नाटक भाजपाने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर टीका केल्याने या घटनेने राजकीय वादळ उठले आहे. सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात भाजपने आरोप केला आहे की, काँग्रेस सरकारने दहशतवादी, धर्मांध, गुंड आणि बदमाशांना मोकळे हात देऊन पोलिसांना आपले कठपुतळी बनवले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख