Saturday, May 25, 2024

कोल्हापूरकर आणि ओवैसी

Share

पुरोगामी वगैरे शब्दांचा वापर करीत लोकांची दिशाभूल करण्याचे दिवस आता संपले आहेत. देशभर डाव्या विचारांची जी धूळधाण झाली आहे, तशीच अस्वस्था कोल्हापूरमध्ये आहे.

असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयआयएम) पक्षाने कोल्हापूरचे काॅंग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा अनपेक्षित नाही. शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा वापर करत हिंदू समाजात फूट पाडण्याची एकही संधी मुस्लिम समाजाचे नेते सोडत नाहीत. खरी गंमत काॅंग्रेस पक्षाची झाली आहे. काॅंग्रेस पक्षाने एआयआयएम या पक्षाचे वर्णन नेहमीच भाजपची ‘बी’ टीम असे केले आहे. भाजपच्या बी टीमचा पाठिंबा काॅंग्रेसला चालणार आहे का? आजपर्यंत तरी काॅंग्रेस पक्षाने या विषयावर सोयीस्कर मौन पाळले आहे. थोडक्यात एआयआयएमचे समर्थन घेण्यात काॅंग्रेसला काही गैर वाटत नसावे.

मुस्लिम पक्षांना काॅंग्रेस हा पक्षच जवळचा का वाटतो, हा कळीचा प्रश्न आहे. अर्थात काॅंग्रेस पक्षाचा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास पहिला तर या प्रश्नाचे उत्तर सहज सापडते, काॅंग्रेसच्या मुस्लिमधार्जिण्या धोरणाची परिणती देशाच्या फाळणीत झाली. गेली सत्तर वर्षे काॅंग्रेस पक्षाने याच धोरणाचा पाठपुरावा केला. पक्ष नेस्तनाबूत होत असतानासुद्धा काॅंग्रेस नेत्यांना या धोरणात बदल करण्याची गरज वाटत नाही. मुस्लिम लांगूलचालन हा काॅंग्रेसचा डीएनए असल्यामुळे त्या पक्षाकडून काही वेगळी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

एआयआयएमशिवाय काॅंग्रेसला केरळमधे सोशालिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या पक्षाने बिनशर्त पाठिंबा दिला आहे. नावावरून हा पक्ष डाव्या विचारांचा वाटतो. मात्र एसडीपीआय ही प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या अतिरेकी मुस्लिम संघटनेची राजकीय शाखा आहे. २०४७ पर्यंत भारत हा मुस्लिमबहुल देश बनविण्याचे पीएफआयचे उद्दिष्ट आहे. अशा संघटनेकडून पाठिंबा घेताना काॅंग्रेस पक्षाला कोणतीही लाज वाटली नाही. अशी मानसिकता असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांकडून राष्ट्रीय विचारांची अपेक्षा करणे म्हणजे गाढवाकडून शास्त्रीय संगीताची अपेक्षा करण्यासारखे आहे.

प्रश्न श्रीमंत शाहू छत्रपती महारांजाचा आहे. मुळात श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी निवडणूक लढविणे काहीसे औचित्याला धरून नाही. त्यांनी राजकारणापासून दूर राहून गादीचा सन्मान राखावा, असे मानणारा मोठा वर्ग कोल्हापुरात आहे. ते हे हिंदवी स्वराजाची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. त्यांनी मुस्लिम लांगूलचालन करणाऱ्या काॅंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणे अनेकांना रुचलेले नाही. तथापि, लोकशाहीमधे त्यांच्या निर्णयाला विरोध करण्याचे कारण नाही. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर त्यांनी सर्व प्रकारच्या प्रसंगांना तोंड देणे आवश्यक आहे. काॅंग्रेस पक्षाने ज्या पक्षाला दूर ठेवले, त्या पक्षाचा पाठिंबा श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना चालणार आहे का, असा प्रश्न कोल्हापुरातील मतदारांना पडला आहे. एआयआयएमने कलम ३७० बरखास्त करायला विरोध केला होता. या पक्षाने अयोध्या राम मंदिर आंदोलनाबाबत कायम अतिरेकी आणि हिंदुविरोधी भूमिका घेतली होती. किंबहुना या आंदोलनाच्या काळात त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. सीएएला याच पक्षाने तीव्र आक्षेप घेतला होता. तलाक विषयावर या पक्षाने घेतलेली भूमिका महिलाविरोधी होती. एआयआयएमचे नेते सातत्याने हिंदुविरोधी भूमिका घेऊन आपल्या `रझाकारी’ मानसिकतेचे प्रदर्शन घडवित असतात. श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना हे मान्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. मतदार हा प्रश्न त्यांना हमखास विचारल्याशिवाय राहणार नाहीत.

पुरोगामी वगैरे शब्दांचा वापर करीत लोकांची दिशाभूल करण्याचे दिवस आता संपले आहेत. कोल्हापूर हे एके काळी डाव्यांचे शक्तीकेंद्र मानले जायचे. मात्र गेल्या तीन दशकात यामधे बराच बदल झाला आहे. हिंदुत्वाने डाव्यांच्या या पीठाला भरपूर धक्के दिले आहेत. त्याचे प्रकटीकरण निवडणुकीतसुद्धा वेळोवेळी झालेले आहे. त्यामुळे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज किंवा अन्य कोणीही मतदाराला गृहीत धरू नये. देशभर डाव्या विचारांची जी धूळधाण झाली आहे, तशीच अस्वस्था कोल्हापूरमध्ये आहे. पुरोगामी आणि प्रागतिकतेचा वारसा सांगताना मुस्लिम लांगूलचालनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे काय?

सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख