Thursday, October 10, 2024

गणेशोत्सवाच्या आनंदात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेने भर घातली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राज्यातील भगिनींचा गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) आनंद द्विगुणित झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. गेले दहा दिवस राज्यात उत्सवाचे वातावरण आहे. हा राज्यातील एक महत्त्वाचा आणि मोठा उत्सव आहे. बळीराजावरील अरिष्ट टळू दे, राज्यातील शेतकरी सुखी होऊदे, राज्यातील जनता सुखी आणि समृद्ध होऊदे अशी प्रार्थना गणरायाला केली आहे. जनतेला सुखी करण्यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. जनतेचे कल्याण हेच शासनाचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी केली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंडपात आगमनापूर्वी सुवासिनींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांचे ओवाळून औक्षण केले. तसेच महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. गगराणी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

गिरगाव चौपाटीवर सायंकाळपासून भाविकांचा जनसागर जमला होता. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईत विविध ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून गिरगाव चौपाटी येथे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. मान्यवरांनी यावेळी उपस्थित असलेल्या विविध देशांच्या दूतावासाच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निर्माल्यापासून खतनिर्मिती उपक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यासोबतच इथे जमलेल्या श्री साधकांशी संवाद साधला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प अत्यंत स्तुत्य असून त्यात 10 हजार श्रीसाधक सहभागी झाले आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणाचे रक्षण होत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी त्यांनी या श्री साधकांसोबत आणि इतर नागरिकांसोबत मनसोक्त सेल्फी घेतले.

अन्य लेख

संबंधित लेख