मुंबई/परभणी : महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू नेतृत्व आणि राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित U.S. India SME Council, Washington DC तर्फे ‘आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवन बदलण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे.
महिला सक्षमीकरणाचा ‘परभणी पॅटर्न’
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी विशेषतः परभणी जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. यामध्ये,
लखपती दीदी योजना: महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
सिल्क अँड मिल्क उपक्रम: ग्रामीण महिलांना शाश्वत रोजगाराची संधी मिळवून देणे.
एकल महिला सशक्तीकरण अभियान: निराधार आणि एकल महिलांना आधार देणे.
यांसारख्या प्रभावी योजनांमुळे हजारो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नवी दिल्लीत होणार सोहळा
१४ मार्च २०२६ रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता नवी दिल्ली येथील ‘भारत मंडपम’ मध्ये आयोजित एका भव्य समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
U.S. India SME Council बद्दल
ही संस्था भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी कार्यरत असून आरोग्य, ऊर्जा, ग्रामीण विकास आणि लघु उद्योगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जागतिक नेतृत्वांना प्रोत्साहित करते.
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.