मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा मुंबईसाठी गेमचेंजर असा प्रकल्प असून यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकारक, जलद, दिलासादायक आणि वेळेची बचत करणारा असून मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासातील पुढचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी सांगितले. या प्रकल्पामुळे मरिन लाईन ते वांद्रे सी लिंक हा प्रवास केवळ 10 मिनिटात पूर्ण होणार असून यामुळे वेळ, इंधन वाचेल आणि प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईतील गेमचेंजर प्रकल्पाचे टप्पे पुढे जात असून यानंतर वर्सोवा, भायंदर, विरारपर्यंत हा प्रकल्प सुद्धा पुढे नेत आहोत. भविष्यात मुंबई ते वर्सोवा मधील 3-4 तासाचे अंतर हे केवळ 40 ते 50 मिनिटात पार करण्यात येईल. हा प्रकल्पाचा पूल पाहताना विदेशात असल्याची जाणीव होत असल्याची घडणावळ असून यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हा प्रकल्प बांधताना कोळी बांधवांचीदेखील काळजी घेण्यात आली आहे आणि त्यांनादेखील न्याय दिला आहे. हे प्रकल्प पुढे पालघरपर्यंत जाणार असून वाढवण बंदरालादेखील या कोस्टल रोडचा फायदा होणार आहे. मुंबई खड्डेमुक्त करण्याबरोबरच सर्व रस्ते काँक्रिटचे करण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक कोंडीमुक्त तसेच प्रदूषण कमी करण्यासाठीही सर्व उपाययोजना केल्या असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.