Sunday, May 26, 2024

‘नाच गं घुमा’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती..

Share

दोन महिलांची गोष्ट असणारा ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी लेखन केलेल्या या कथेचा विषय वास्तववादी असला तरी पटकथेत त्याची मांडणी ‘नाट्य’, ‘नृत्य’ आणि ‘संगीतमय’ अशी असलेली पाहायला मिळते. ‘तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना’ असं नातं असणाऱ्या मालकीण आणि मोलकरीण या दोघींचं एकमेकांवर रागावणं, रूसणं आणि भावनापूर्ण संवाद असे बरेच पदर पटकथाकारानं हाताळले आहेत. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव या दोन्ही अभिनेत्री अतिशय उत्तमरित्या मुख्य भूमिका साकारताना पाहायला मिळत आहेत.

ज्याप्रकारे नोकरी करणाऱ्या महिलेला समाजात मानसन्मान मिळतो. सामाजिक-आर्थिक पाठबळ मिळतं, तसाच मानसन्मान मोलकरीण, कामवालीबाई यांना का मिळत नाही? असे प्रश्न हलक्या आवाजात का होईना, पण ‘नाच गं घुमा’ हा सिनेमा विचारण्याचा आणि प्रेक्षकांना विचार करायला लावण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या या महिलांचे कष्ट कधी कुणाला दिसत नाहीत. त्या ‘वर्किंग वूमन’ नाहीत का? असा प्रश्न परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी लेखक म्हणून विचारला आहे.
नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला घरातील कामं करणं शक्य होत नाही. काही प्रसंगी कामं करण्याची वेळ आलीच तर ‘घरच्यांनी मला अगदी कामवालीबाईच बनवलं आहे’ असं कुत्सितपणे बोललं जातं. पण काम हे काम असतं, मग ते घरातलं कामं असो किंवा ऑफिसमधील. मात्र घरचं काम आणि कार्यालयातील काम या दोन्हींकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असतो.

मुक्ता आणि नम्रता यांच्या अभिनयाची जुगलबंदी सिनेमात विशेष रंगत आणते. या सिनेमातील मुक्ताचा पेहराव तिच्या चाहत्यांसाठी नवा आहे. तर नम्रतानं अगदी सचोटीनं आशाताई ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तिची देहबोली, लहेजा उत्तम जमून आला आहे. या सोबतच सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी आणि बालकलाकार मायरा वायकूळ यांची कामं उत्तम झाली आहेत. सिनेमाचा कपडेपट पूर्णिमा ओक यांनी उत्तमप्रकारे सांभाळला आहे.

माणूस म्हणून दुसऱ्या माणसाचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ‘कामवाली बाई’ अशा शेलक्या शब्दाचा उपयोग न करता ‘घरकाम करण्यासाठी ताई, काकू, मावशी येतात’, असं म्हणता येऊ शकतं. तसे झाल्यास त्या सर्व ‘घुमा’ आणि सर्व ‘आशाताई’ नक्कीच सुखावतील.

या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई यांनी सांभाळली आहे. तर दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेले आहे. चित्रपटाचे लेखन, अभिनय, दिग्दर्शन, विषय मांडणी ह्या सर्वांना प्रेक्षकांची अधिक पसंती मिळत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख