काठमांडू (नेपाळ) : नेपाळमधील कपिलवस्तू जिल्ह्यात ईदच्या दिवशी एका धक्कादायक घटनेत मंदिरावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महाराजगंज परिसरातील बरगदी घाटाजवळील काली मंदिरात ध्वनीक्षेपकावरून भजन सुरू असल्याच्या कारणावरून मुसलमानांच्या जमावाने मंदिरावर आक्रमण केले. या हल्ल्यात मंदिराची तोडफोड करण्यात आली असून पुजाऱ्यालाही गंभीर मारहाण करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी सकाळी काली मंदिरात चैत्र नवरात्रानिमित्त पूजा आणि भजन-कीर्तन सुरू होते. याच वेळी जवळच नमाजपठण सुरू होते. भजन सुरू असल्याचा राग धरून एका जमावाने मंदिर परिसरात घुसून तोडफोड केली आणि मंदिराचा ध्वनीक्षेपक फोडून टाकला. मंदिर वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुजाऱ्यालाही जमावाने बेदम मारहाण केली.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने निषेधासाठी रस्त्यावर उतरले. बुटहानियाँ परिसरात जमावाने आरोपींच्या अटकेची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. काही ठिकाणी संतप्त जमावाने टायर जाळून रस्ते अडवले, त्यामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी सुरुवातीला लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, जमाव अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांना अखेर गोळीबार करावा लागला. या संघर्षात पोलीस आणि नागरिक मिळून एकूण ८ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सध्या कपिलवस्तू प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बरगदी, महाराजगंज बाजार, हरदौना आणि बहादुरगंज या चार प्रमुख परिसरात तात्काळ प्रभावाने संचारबंदी (Curfew) लागू केली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नेपाळमधील या घटनेचे पडसाद सीमेलगतच्या भागातही उमटण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.